0
उद्योग क्षेत्रात एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न : देसाई

मुंबई- राज्यात उद्योग क्षेत्रात एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न सुरू असून सर्व मार्गांनी गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी दिली. मुंबई शेअर बाजारात शनिवारपासून नवउद्यमींच्या कंपन्यांची (स्टार्टअप) अधिकृत नोंदणी करण्यात आली.

सुभाष देसाई म्हणाले की, स्टार्टअप क्षेत्रासाठी महाराष्ट्राची भूमी सर्वात पोषक आहे. केंद्र शासनाने जारी केलेल्या आकडेवारीत महाराष्ट्र अव्वल असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय आयटी क्षेत्रात महाराष्ट्र प्रचंड झेप घेत आहे. शासनाने आयटी क्षेत्रासाठी विशेष धोरण राबवले. त्यामुळे सुमारे १०९ आयटी पार्क सुरू झाले असून त्याद्वारे साडेपाच लाख तरुण-तरुणींना नोकरी मिळाली आहे. आयटी क्षेत्रासोबत लघु-मध्यम उद्योगांतून मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे राज्य शासन या क्षेत्राला विशेष सवलती देत आहे. रिझर्व्ह बँक, मुंबई शेअर बाजार तसेच इतर प्रमुख अर्थविषयक संस्था एकत्र आल्यास येत्या काळात भारत जगातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्था म्हणून नावारूपास येईल, असा विश्वासही सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
एसएमईचे सातशे कोटींचे भांडवल 
या वेळी उद्योगमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हेंचर कॅपिटॅलिस्ट, कॉर्नर स्टोन या कंपन्यांचा मुंबई शेअर बाजारासोबत सामंजस्य करार झाला. या वेळी अनुज गोलेजा, अजय ठाकूर, आशिष कुमार, हरीश मेहता, अतुल निसर आदी उपस्थित होते. मागील सहा वर्षांपासून सूक्ष्म व लघु (एसएमई) कंपन्यांची मुंबई शेअर बाजारात नोंदणी सुरू झाली असून आतापर्यंत सातशे कोटी रुपयांचे भांडवल गुंतवल्याची माहिती अजय ठाकूर यांनी दिली.
सर्व कंपन्यांसाठी बाजार खुले व्यासपीठ 
गुंतवणुकीसाठी पर्याय उपलब्ध झाल्यास रोजगार निर्मितीसोबत अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी मदत होईल. त्यामुळे ही संधी म्हणून गुंतवणूक करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असा सल्ला हरीश मेहता यांनी दिला. मुंबई शेअर बाजार सर्व कंपन्यांसाठी खुले व्यासपीठ असून एसएमईने यात गुंतवणूक केल्यास काही काळात भागभांडवल व नफ्यात नक्कीच फायदा होईल, असा विश्वास अतुल निसर यांनी व्यक्त केला.New Startup Business registration in Mumbai Share market

Post a Comment

 
Top