0
नाशिकमधील स्थानिक राजकीय नेत्यांसोबत आता राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांनीही नाशिककडे त्यांचा मोर्चा वळवला आहे.

नाशिक- गडगडणाऱ्या कांद्याच्या भावामुळे नाशिकच्या शेतकऱ्यांमध्ये धुमसत असलेला असंतोष आणि कांदा विकून आलेली तुटपुंजी रक्कम शेतकऱ्याने थेट पंतप्रधानांना मनीऑर्डर केल्याने सुरू झालेल्या राष्ट्रीय चर्चा या पार्श्वभूमीवर नाशिकमधील स्थानिक राजकीय नेत्यांसोबत आता राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांनीही नाशिककडे त्यांचा मोर्चा वळवला आहे.

नोव्हेंबरमध्ये दिल्लीत झालेल्या किसान मुक्ती मोर्चाचे संयोजक, स्वराज इंडियाचे संस्थापक आणि अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे सदस्य योगेंद्र यादव यांच्यासह प्रहार संघटनेेचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू हे दोघे येत्या आठवड्यात कांदाप्रश्नी नाशिकमध्ये येत आहेत.

कांद्याच्या गडगडणाऱ्या किमती थोपवण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा या मागणीसाठी नाशिकमधील लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आल्यावरही शासकीय यंत्रणा फारशी हललेली दिसत नाही. उलट, शेतकऱ्यांचा कांदा कमी दर्जाचा असल्याने त्यास भाव मिळत नसल्याचे कागदी घोडे सरकारी पातळीवरून नाचवण्यात येत आहेत. या वेळकाढूपणात चाळीतील कांद्याचे नुकसान वाढत असल्याने शेतकऱ्यांमधील अस्वस्थता आणि सरकारविरोधी असंतोषही वाढत आहे. या तापलेल्या वातावरणात शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी स्थानिक पक्षांतर्फे कांदाफेक आंदोलने झाली. आता राज्य आणि राष्ट्रीय नेतेही कांद्याच्या प्रश्नावर मैदानात उतरत आहेत. शेतकरी नेते योगेंद्र यादव येत्या २१ डिसेंबरला नाशिकमध्ये येत असून पिंपळगाव बाजार समितीच्या नवीन मार्केटमध्ये कांदा उत्पादकांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. त्यांच्यासोबत स्वराज इंंडियाचे प्रदेशाध्यक्ष ललित बाबर, राज्य सरचिटणीस सविता शिंदे आणि राष्ट्रीय नेते सुभाष लोमटे हे नेते असणार आहेत.

आमदार बच्चू कडू यांचा प्रशासनाने घेतला धसका
प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनीदेखील २६ डिसेंबरला नाशिकमध्ये कांदा आंदोलन जाहीर केले आहे. कडू चांदवडला मुक्काम मोर्चा काढणार आहेत. त्यांच्या आंदोलनांच्या आक्रमक शैलीमुळे प्रशासनापुढेही आव्हान उभे केले आहे. कांद्याच्या कोसळणाऱ्या किमतींमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळावी या मागणीसाठी कडू हे आंदोलन करत आहेत.
politics in Nashik's Onion

Post a comment

 
Top