येथील राजोपाध्येनगरातील एका विवाहितेने मंगळवारी दुपारी राहत्या घरी पॅनला ओढणीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. रिता गजानन शिरोडकर ( वय 38) असे तिचे नाव आहे. या विवाहितेने पती, सासू, दोन नणंदा याच्याकडून होणाऱया शारिरीक व मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप करीत, पती, सासू, नणंदेना चांगलीच धक्काबुकी केली. याप्रकाराने सीपीआर आवारात काही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांच्यातून व घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, मृत रिता ही बेळगांव शाहुनगरातील सोमेश्वर नारायणआप्पा सेजेकण यांची मुलगी आहे. तिचा कोल्हापूरातील गजानन शिरोडकर याच्याबरोबर 2002 साली विवाह झाला होता. गेल्या काही महिन्यापासून मृत रिता हिचा छळ सुरु केला होता. या छळा कंटाळून तिने आत्महत्या करण्यापूर्वी भाऊ संदिप याच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला. सासरच्या मंडळीच्या छळाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. त्यावरुन संदीपने लहान भाचा, दाजी गजानन, त्याची आई याच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्याशी त्याचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्याने दाजी गजानन याच्या मित्राशी संपर्क साधला असता रिता हिने गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याबाबत सांगितले.
यावरुन मृत रिताचे आई-वडील, बहिण, भाऊसह नातेवाईक मोठय़ा संख्येने सीपीआर हॉस्पीटलमध्ये आले. त्याना रिताचा मृत्यु घरीच झाल्याचे समजल्याने ते संतप्त झाले. त्यानी रिताचा पतीसह सासू, नणंदेला धक्काबुकी केली. मृत रिताने पतीसह सासू, नणंदेच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याने त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करीत तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. याप्रकाराने सीपीआरच्या आवारात काही काळ तणाव निर्माण झाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला.

Post a Comment