0
सत्यजित रे मानवतावादी होते, पण सेन हे चांगल्या अर्थाने अराजकवादी होते असे म्हणता येईल.

७०च्या दशकातील 'समांतर चित्रपट' ही भारतीय चित्रपटसृष्टीतली घडवून आणली गेलेली सांस्कृतिक चळवळ नव्हती. ती आसपासच्या राजकीय-सामाजिक-आर्थिक घडामोडींना प्रतिक्रिया देणारी तीव्र संवेदना होती. महागाई, दुष्काळ, दारिद्ऱ्य, नक्षलबारी, अन्नटंचाई, राजकीय अस्थिरता, बांगलादेश युद्ध यांनी देश ढवळून गेला होता. नवभांडवलवादाने कुटुंब व्यवस्थेला हादरे देण्यास सुरुवात केली होती. शहरीकरणामुळे खेड्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले होते. त्यातून नवा मध्यमवर्ग उदयास येत होता. या वर्गाच्या जगण्याच्या इच्छा-आकांक्षा व्यक्तिकेंद्रित स्वरूपाच्या होत्या. अशा काळाची स्पंदने टिपत भारतात समांतर चित्रपट तयार होऊ लागला. आजपर्यंत हिंदी चित्रपटांनी केवळ तीन तास प्रेक्षकांचे मनोरंजन करणे वा प्रेक्षकाला थिएटरमध्ये आल्यानंतर त्याच्या धकाधकीच्या, तणावाच्या आयुष्याचा विसर पाडणे अशी एक स्थितीबद्ध चौकट तयार केली होती. त्या चौकटीला हादरे देण्याचे काम समांतर चित्रपटांनी केले. मृणाल सेन हे त्यातील आघाडीचे दिग्दर्शक. सत्यजित रे, ऋत्विक घटक व मृणाल सेन अशा त्रयीतले ते एक महत्त्वाचे दिग्दर्शक. सत्यजित रे मानवतावादी होते, पण सेन हे चांगल्या अर्थाने अराजकवादी होते असे म्हणता येईल.

४०-५० च्या दशकात युरोपात जी 'न्यू वेव्ह सिनेमाची' (नववास्तववादी चित्रपट) लाट निर्माण झाली त्याचा प्रभाव असणारे ते दिग्दर्शक होते. चित्रपट माध्यम हे राजकीय माध्यम आहे (नंतर त्यांची भूमिका बदलत गेली), प्रेक्षकांची राजकीय मते मला बदलायची आहेत अशा भूमिकेतून चित्रपट करणारे ते दिग्दर्शक होते. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांचे सर्व चित्रपट धाडसी, प्रयोगशील व मूर्तिभंजक होते. आपला चित्रपट पाहणारा वर्ग निमशहरी, संख्येने कमी आहे याची जाणीव त्यांना होती. बॉक्स ऑफिसवर आपले चित्रपट गल्लाही गोळा करू शकणार नाहीत याचे त्यांना पूर्ण भान होते, पण त्याला शरण न जाता त्यांनी वास्तवाशी फारकत घेणाऱ्या पॉप्युलर सिनेमाची वाट चोखाळली नाही. साहित्यात जसा जीवनाचा पसारा मांडता येतो, तसा पसारा दृश्य प्रतिमांच्या माध्यमातून मांडता येतो यावर ते ठाम होते. ४० च्या दशकात बंगाल हा स्वातंत्र्य चळवळ, फाळणी, स्थलांतर यांनी धगधगत होता. त्या काळात ते कम्युनिझमकडे वळले. त्यांची कम्युनिझमविषयीची निष्ठा वादातीत होती, पण ते पोथीनिष्ठ कधीच झाले नाहीत. तरुणपणात रवींद्रनाथ, विवेकानंद, शरदचंद्र, कार्ल मार्क्स, ब्रेख्त, चेकॉव्ह यांच्या साहित्याचा प्रभाव असल्याने कलेचा जीवनव्यापार त्यांना माहिती होता. युद्ध, यांत्रिकीकरणाने हरवलेले माणूसपण, मध्यमवर्गीय समाजाचे आपमतलबी-स्वकेंद्रित जगणे, पितृसत्ताक कुटुंबाला बसणारे हादरे या संवेदना जशा साहित्यात मांडता येतात तशा त्या चित्रपटातूनही मांडता येतील का, अशा मानसिक द्वंद्वात ते अडकले होते. अशा परिस्थितीत व्लादिमीर नेल्सन यांच्या 'सिनेमा अॅज ए ग्राफिक आर्ट' या पुस्तकाने त्यांना चित्रपट ही कला असल्याची दृष्टी दिली आणि पुढे सेन यांनी एकापेक्षा एक उत्तम, आशयघन, वास्तववादी चित्रपट दिले. अतिरेकी अभिनय, दीर्घ पल्ल्याचे संवाद वगैरे पारंपरिक हिंदी चित्रपटांची मांडणी त्यांनी पूर्णपणे नाकारली. उलट प्रतिमा गोठवणे, जंपकट्स, पडद्यावर अचानक अक्षरे येणे, नि:शब्दपणा अशा तंत्रातून त्यांचा चित्रपट पुढे सरकत होता. त्यांची १९६९ सालची 'भुवन शोम' अत्युत्कृष्ट कलाकृती होती. या चित्रपटाने वास्तववादी चित्रपटाचे सारथ्य त्यांच्याकडे आले.


मृणाल सेन आपल्या चित्रपटातून गरिबी, दुष्काळ, प्रेम, मत्सर, आशा, भूक मांडत असताना त्यांच्यावर भारतातील दारिद्ऱ्याचे जगाला प्रदर्शन करून पुरस्कार मिळवत असल्याची एक प्रकारची छद्मी टीका केली जात होती. या टीकेला उत्तर देण्यापेक्षा दारिद्ऱ्याला वस्तूच्या किमतीत विकता येतं का, असा प्रतिप्रश्न ते करत असत. जीवनाचा पसारा हा कलेपेक्षा मोठा आहे. त्यामुळे संपूर्ण जीवन कलाकृतीत मांडण्याची आमची झेप नसते. पण जर कला प्रामाणिक असेल तर जीवन त्या मार्गाने जाते, असे ते म्हणत असत. मृणाल सेन सुमारे सहा दशके चित्रपट करत राहिले. त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातील बहुतेक चित्रपटांत मनाचा खोल वेध घेणाऱ्या कथा होत्या. त्यात परिपक्व मानवी दर्शन होते. जगण्याविषयीची त्यांची जिज्ञासा होती व मनाचा खुलेपणा होता. पूर्वीच्या चित्रपटात आवेशातून मांडला जाणारा आशावाद ओसरू लागला होता. राजकीय भूमिकांचा आग्रह थांबला होता, पण चित्रपटाची त्यांची मांडणी वास्तववादी अशीच राहिली. मौनाचे, विरामाचे सामर्थ्य त्यांना उमगले होते. आजच्या काळात भारतीय चित्रपटाला अनेक मृणाल सेनची गरज असताना ते आपल्यातून निघून गेले. त्यांच्या निधनाने नववास्तववादी चित्रपटाचा एक वृक्ष कोसळला. उद्या नव्या वर्षात पदार्पण करत असताना एक पर्व मात्र मोठा वारसा सोडून गेले.
Article About 'Mrunal Sen's movies

Post a Comment

 
Top