0
वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील सुरेश रामचंद्र पाटील (74) यांच्या वडिलांची पॉलिसीची रक्कम मिळवून देतो, असे आमिष दाखवून दिल्लीच्या तिघांनी सुमारे पावणे सहा लाख रुपये ऑनलाईन मागवून घेऊन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली. दि. 17 मे 2017 ते दि. 30 ऑक्टोबर 2017 पर्यंत ही रक्कम त्यांनी विविध खात्यावर मागवून घेतली.
प्रियांका पाठक, आकाश जोशी, राहुल श्रीवास्तव (सर्व रा. दिल्ली) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या तिघांनी पाटील यांच्या वडिलांच्या पॉलिसीची रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला. व वेगवेगळया बँकेचे खाते नंबर देऊन त्यांनी ही रक्कम मागवून घेतली. सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा राजापुरी व्दारका दिल्ली, आरआयटी सेंट्रल बँक ऑफ नौरंगाबाद, इटावा, आय.सी.आय.सी.आय. बँक शाखा भोगल, नवी दिल्ली यांच्यासह अन्य शाखांमधील पाटील यांनी वेळोवेळी 10 हजार रुपयांपासून 95 हजार रुपयांपर्यंत 17 ते 18 वेळा रक्कम भरली. कालांतराने त्यांनी पाठपुरावा केला असता, संबंधीतांकडून प्रतिसाद कमी झाला. त्यामुळे पाटील यांनी शनिवारी रात्री इस्लामपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन वर्दी दिली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता 419, 420 सह तंत्रज्ञान कायदा 66 (ड) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

Post a Comment

 
Top