0

सीसीटीव्हीत चोरटा कैद 48 हजार रुपयांची रोकड लांबवली; आला त्या रस्त्याने पसार

जळगाव- चोरी करताना कोणी बाहेर येऊन पकडू नये म्हणून चोरट्याने रुग्णालयाच्या मुख्य दरवाजा बाहेरून दोरी बांधून बंद केला. यानंतर शेजारील मेडिकल दुकानाचा कडीकोयंडा तोडून ४८ हजार रुपयांची रोकड लंपास केली. शनिवारी मध्यरात्री २.३७ वाजता रिंगरोडवरील अंकुर हॉस्पिटलच्या शेजारील साईप्रसाद मेडिकल दुकानात ही घरफोडी झाली.

संदीप निवृत्ती पाटील (वय ४८, रा.भागीरथी अपार्टमेंट, गिरणा टाकीजवळ) यांच्या मालकीचे हे मेडिकल दुकान आहे. शनिवारी रात्री नऊ वाजता मेडिकल दुकानातील कर्मचारी जितेंद्र नामदेव मोतीराळे (रा.मामळदे, ता.चोपडा) याने दुकान बंद केले. रविवारी सकाळी ९.१५ वाजता तो पुन्हा दुकान सुरू करण्यासाठी आला तेव्हा कडीकोयंडा तुटलेला दिसला. मालक संदीप पाटील यांना बोलावल्यानंतर दुकानात चोरी झाल्याचे उघडकीस आले. तर अंकुर हॉस्पिटलच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद झाला आहे. या प्रकरणी संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
१६ मिनिटांत रोकड घेऊन चोरटा पसार 
चोरटा मध्यरात्री २.३७ वाजता अंकुर हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळ आला. सुरुवातीला त्याने दोरीच्या साह्याने हॉस्पिटलचा दरवाजा बाहेरून बांधून बंद केला. यानंतर शेजारील साईप्रसाद मेडिकलचा कडीकोयंडा तोडून ड्रॉवरमधून ४८ हजार रुपयांची रोकड लंपास केली. यानंतर पळून जात चोरट्याने हॉस्पिटलच्या दरवाजाची दोरी सोडून सोबत नेली. १६ मिनिटांत चोरटा आला त्याच रस्त्याने तो पसार झाला. अंकुर हॉस्पिटलच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात हा प्रकार कैद झाला आहे. चोरट्याने अंगात जॅकेट व डोक्यावर माकड टोपी घातलेली होती.
हातांचे ठसे घेण्यास अडचणी 
मेडिकल दुकानातील ड्रॉवरवरील चोरट्याच्या बोटांचे ठसे घेण्यासाठी रविवारी दुपारी ३ वाजता पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले; परंतु या ड्रॉवरचे सनमायका डॉटेड असल्यामुळे ठसे घेता आले नाहीत. परिणामी चोरट्याच्या बोटांचे ठसे उपलब्ध होऊ शकले नाही.
चोरट्याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान
शहरात चोरी, घरफोडी, मोबाइल व सोनसाखळी लांबवण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मावळत्या वर्षाला अत्यंत वाईट पद्धतीने निरोप दिला जातो आहे. नागरिकांच्या मालमत्तांची मोठ्या प्रमाणात चोरी झाली आहे. अशात फक्त रामानंदनगर पोलिसांच्या हाती केवळ दोन चोरटे लागले आहेत. त्यांनी फक्त एक मोबाइल लांबवल्याची कबुली दिली आहे. या शिवाय शहरात सुमारे १० मोबाइल, सहा सोनसाखळ्या डिसेंबर महिन्यात चोरीस गेल्या आहेत. तर घरफोड्याही झाल्या आहेत. त्यातील चोरटे अद्याप मोकाट फिरत असून, पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.Crime news in Jalgoan

Post a Comment

 
Top