0
व्यापारी युवकांचा परभणीत उपक्रम, गरजूंना मदत मिळण्याची भावना

परभणी- गारठून टाकणाऱ्या थंडीत कुडकुडत फुटपाथवर झोपलेल्या गोरगरिबांच्या अंगावर रात्रीतून आलेले उबदार कपड्याचे ब्लँकेट त्यांना थंडीपासून सुरक्षित ठेवणारे तर ठरलेच, पण ते अंगावरही कोठून आले याचेच कोडे त्यांनाही उलगडले नाही. परभणी शहराच्या मध्यवर्ती भागातील व्यापारी युवकांचा हा उपक्रम फक्त त्या युवकांनाच माहीत असावा, अशी स्थिती समोर आली.

कडाक्याच्या थंडीने शहर गारठले असताना व्यापारी मित्रांचा हा परिवार मोटारसायकलवर घराबाहेर पडला. प्रामुख्याने सार्वजनिक ठिकाणे शोधण्यास व तेथे झोपलेल्या लोकांवर लक्ष केंद्रित करण्यास त्यांनी सुरुवात केली. १५ ते २० जणांचा हा गट. प्रत्येकाच्या गाडीवर नवीन ब्लँकेटचा गठ्ठा हातात घेऊन निघालेला होता. साधारणत: रात्री ११ ची वेळ स्टेडियम परिसर, रेल्वेस्थानक परिसर, बसस्थानक, जिल्हा शासकीय रुग्णालयातील इमारती परिसरातील रुग्णांचे नातेवाईक व कक्षातील रुग्ण ज्यांच्या अंगावर साधे पांघरूणही नव्हते. अशा लोकांना शोधून त्यांच्या अंगावर हे ब्लँकेट टाकण्याचे काम या युवक व्यापाऱ्यांनी केले.मित्रांनीच जमा केलेल्या मदतीतून २५० ब्लँकेट वाटपाचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. यातून त्यांना खरे गरजू ११६ जण आढळले. या ११६ जणांना ब्लँकेट देताना ही कोणत्या संस्थेची, व्यक्तीची मदत आहे, याची माहिती देखील दिली जात नव्हती. गरजूंना न बोलता व त्यांची झोप न मोडता त्यांच्या अंगावर हे ब्लँकेट टाकण्यात आले. शहरातील सुपर मार्केट, शिवाजी काॅम्प्लेक्स परिसर, स्टेडियम संकुल आदी ठिकाणांसह सार्वजनिक रस्त्यावर कोठेतरी झोपलेल्या मंडळींच्या अंगावर या व्यापारी मित्रांनी ही मायेची मदत पांघरली.

ना नाव ...ना गाव... मदत मात्र लगेच
व्यापारी मित्रांचा हा गट प्रत्यक्षात परस्परांशी जिव्हाळ्याचे व मित्रत्वाचे नाते जपणार आहे. एका मित्राने परिस्थितीप्रमाणे मदतीचे आवाहन केल्यानंतर सर्वच जण अगदी हिरीरीने पुढाकार घेऊन आपापल्या परीने मदत जमा करतात. उपक्रमाची वेळ, तारीख काहीही निश्चित नसते. प्रसिद्धीचा कोणताही सोस नाही. ना संस्था, ना नाव, ना गाव अशा स्थितीत हा मित्र परिवार अडचणीच्या प्रसंगात केवळ गरजूपर्यंत मदत पोहोचावी याच उद्देशाने एकत्र येतो, असे या मित्र परिवाराला जोडणाऱ्या व्यापाऱ्याने स्वत:चे नाव देऊ नका या सबबीवर सांगितले.

यापूर्वी आैषधींचेही वाटप
व्यापारी मित्रांचा हा परिवार प्रसंगानुरूप मदतीसाठी पुढे येतो. यापूर्वीही साथीच्या काळात गरजू रुग्णांना आैषधी मिळावी या उद्देशाने जिल्हा शासकीय रुग्णालयात आैषधी वाटपाचे काम त्यांनी केले. दिवाळीतही अनाथांची दिवाळी साजरी करण्यासाठी मिठाई, कपड्यांचे वाटप त्यांनी केलेे. या परिवारातील काही मित्र हे अभियंते असून ते बाहेरगावी असताना येथील मित्रांच्या माध्यमातील अावाहनाला मदतीच्या स्वरूपात दाद देतात.
Example of Humanity in Parbhani

Post a Comment

 
Top