0
दारिद्रय़रेषेखालील महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन देण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या उज्वला योजनेकडे महिलांनी पाठ फिरवली आहे. सुरूवातीचे कनेक्शन घेवून मिळणाऱया मोफत सिलिंडरनंतर महिलांना दुसरा सिलिंडर आहे त्या किंमतीत घ्यावा लागत असल्याने या योजनेची वाटचाल एकाच सिलिंडरवर येवून थांबली आहे.
सातारा जिह्यातील एकूण 77 गॅस एजन्सीज प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना गॅस कनेक्शन देण्याची कार्यवाही करत आहेत. पूर्वीच्या योजनेप्रमाणे सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय सर्वेक्षणातील छाननी केलेल्या यादीतील पात्र लाभार्थींना फक्त उज्वला गॅस योजनेंतर्गत गॅस जोडणी देणेत येत होती.
परंतु दिनांक 1 एप्रिल 2018 पासून सुधारित तत्वांनुसार अनुसुचित जाती-जमाती, अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिका धारक, वनरहिवासी, व प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मधील लाभार्थींना उज्वला गॅस योजनेतर्गंत गॅस जोडणी देण्याची कार्यवाही सुरू आहे. यामध्ये बीपीसीएल, एचपीसीएल, आयओसी या गॅस कंपनीकडून गॅस जोडणी देण्याचे काम सुरू आहे. मात्र ही योजना गॅस जोडणी आणि त्यासोबत मिळणाऱया पहिल्या मोफत सिंलेडर यांचा लाभ महिला घेत आहेत. त्यानंतरचा सिलिंडरचे पैसे द्यावे लागत आहेत. इतर ग्राहकांना मिळणाऱया सिलिंडरच्या किंमतीपेक्षा 150-200 रूपये कमी किंमत या सिलिंडरची आहे. मात्र तेवढे पैसेही महिलांकडे नसल्याने ही योजना सुरूवातीच्या मोफत सिलिंडरवर येवून थांबली आहे. यांनतर यांचा लाभ बंद करण्यात आल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे.
योजना उरली नावापुरती…
घरोघरी ग्रामीण भागातील महिलांना चूल पेटवून स्वयंपाक करताना धुराचा त्रास सोसावा लागत होता. तो बंद करण्याच्या हेतूने फक्त महिलांसाठी उज्वला योजना सुरू करण्यात आली. पण महिलांकडे पैसे नसल्याने सिलिंडरच सोडाच तर गॅस कनेक्शन घ्यायलाही पैसे नाहीत. यामुळे या योजनेतर्फे फक्त एका सिलिंडर वापर करून महिला समाधान मानत आहेत. दुसरा सिलेंडर घेण्यापेक्षा पुन्हा चूलीचा धूर घरातून निघत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे ही योजना फक्त नावापूर्ती राहिली आहे.

Post a Comment

 
Top