0
भूतबाधा असल्याच्या संशयावरून नातेवाइकांनी तरुणाला उपचारासाठी विदर्भातील सैलानीबाबा देवस्थानात नेण्याचे सांगितले.

पिंपळगाव रेणुकाई- भूतबाधा असल्याच्या संशयावरून नातेवाइकांनी तरुणाला उपचारासाठी विदर्भातील सैलानीबाबा देवस्थानात नेण्याचे सांगितले. त्यामुळे आईवडिलांनी त्यास तेथे नेले. परंतु तरुणाला तेथे घेऊन थांबलेले आई-वडील चहा घेण्यासाठी बाहेर गेले असता त्याच वेळात तो तरुण बेपत्ता झाला. याबाबतची तक्रार बुलडाणा जिल्ह्यातील रायपूर पोलिस ठाण्यात बेपत्ता तरुणाच्या पत्नीने दिली असून या तक्रारीनुसार तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. कोमलसिंग सुरतसिंग राजपूत (२८, रेलगाव, ता. भोकरदन) असे बेपत्ता असलेल्या तरुणाचे नाव आहे.

कोमलसिंग सुरतसिंग राजपूत (२८) या तरुणाला आठ दिवसांपूर्वी घरात झटके आल्याने त्याला पिंपळगाव रेणुकाईतील खासगी दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आले होते. १० डिसेंबर रोजी त्याच्यावर उपचार करून त्याला घरी आणल्यानंतर हा तरुण घरात रात्रभर वेड्यासारखा वागत होता. दरम्यान, काही नातेवाइकांनी त्याला भूतबाधा झाल्याचा संशय त्याच्या आई-वडिलांकडे व्यक्त करत विदर्भातील सैलानी येथे भूतबाधेवर उपचार होत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी, नातेवाइकांनी कोमलसिंगला रिक्षा करून मंगळवारी सकाळी ६ वाजता बुलडाणा जिल्ह्यातील सैलानीबाबा संस्थानात नेले.

हातापायात बेड्या घातल्या :
सैलानीबाबा देवस्थानात मांत्रिकाने त्याच्यावर उपचारही केले. प्रथम त्याच्या हातापायात बेड्या टाकून सैलानीबाबाच्या दर्ग्यात बांधून ठेवण्यात आले. अंगातील भूत निघेपर्यंत कोमलसिंगला येथेच ठेवावे लागेल, असे सांगितल्यावरून आई-वडीलवगळता इतर नातेवाइक गावाकडे परतले. मात्र, त्याच दिवशी आई-वडील चहा घेण्यासाठी हॉटेलवर गेले असता तेथून कोमलसिंग बेपत्ता झाला. त्याची सर्व ठिकाणी शोधाशोध केली. मात्र, रात्र होऊनही मुलगा सापडत नसल्याने गावाकडे, नातेवाइकांकडे चौकशी केली. त्यांनीही शोधाशोध करूनही तो सापडत नसल्याने गावातील मित्र, नातेवाइक दुचाकीद्वारे संस्थानात पोहोचले. त्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, तीन दिवस होऊनही कोमलसिंग सापडत नसल्याने गुरुवारी रायपूर पोलिसांत तक्रार दाखल केली.

नातलगांनी भूतबाधा सांगितल्याने उपचारासाठी नेले होते
सोमवारला माझ्या पतीला झटके आल्याने त्यांना पिंपळगाव रेणुकाई येथील खासगी दवाखान्यात नेले होते. सोमवारी रात्री त्यांनी घरात गोंधळ घातला. नातेवाइकांनी हा भूतबाधेचा प्रकार असल्याचे सांगितल्यानंतर मंगळवारी सैलानी येथे उपचारासाठी नेले होते. मात्र, ते त्या ठिकाणाहून बेपत्ता झाले आहेत. -रूपाली कोंमलसिंग चंदनसे, रुग्णाची पत्नी

रायपूर पोलिसांकडून शोध चालू

कोमलसिंग मिसिंग झाल्याची तक्रार आमच्याकडे त्याच्या नातेवाइकांनी गुरुवारी दिली आहे. त्या पद्धतीने रायपूर पोलिस हे त्याचा तपास करीत आहेत. Cheacking of suspicion of ghosts of young man

Post a comment

 
Top