0
 • Sharad Pawar Meets Former CM of Maharashtra Narayan rane in Konkanमुंबई - सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी अचानक कणकवली येथे स्वाभिमानी महाराष्ट्र पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपशी घरोबा केलेल्या राणेंनी थेट पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शिवसेना आणि भाजपची जवळीक वाढत असल्याने अस्वस्थ झालेले राणे आगामी निवडणुकीत भाजपव्यतिरिक्त वेगळ्या पर्यायाची चाचपणी करत असल्याचे बोलले जाते. त्यासाठी थेट राष्ट्रवादीशी संधान बांधत कोकणातून लोकसभा आणि विधानसभेसाठी प्रत्येकी एक जागा पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा अाहे.
  शरद पवार गेल्या दोन दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर अाहेत. साेमवारी आंबोली, मालवण, वेंगुर्ला येथील बैठका आटोपून मुंबईकडे परतताना त्यांनी अचानकपणे नारायण राणे यांच्या कणकवलीतील आेम गणेश निवासस्थानी साेमवारी दुपारी दोन वाजता भेट दिली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा खुलासा दोन्ही नेत्यांनी केला. 'राणे हे आमचे जुने सहकारी आहेत. आमच्या पक्षाच्या बैठका आटोपून परतत असताना त्यांचा फोन आल्याने आपण त्यांच्या भेटीला अालाे,' एवढेच पवार यांनी सांगितले.
  राणेंच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेची जवळीक वाढत असल्याने राणे अस्वस्थ आहेत. लोकसभेत शिवसेना - भाजप युती झाल्यास आपल्याला वेगळा पर्याय शोधावा लागेल, हे नारायण राणे जाणून आहेत.
  मुलासाठी जागेचा प्रयत्न 
  त्यामुळे ऐनवेळी धावाधाव करण्यापेक्षा राष्ट्रवादीशी संधान बांधून सिंधुदुर्ग - रत्नागिरीची लोकसभेची जागा मुलासाठी मिळवण्याचा राणेंचा प्रयत्न आहे. सध्या या मतदारसंघात शिवसेनेचा खासदार असून त्यापूर्वी राणेंचे पुत्र नीलेश यांनी या मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते. मात्र, आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसच्या कोट्यातील असल्याने राष्ट्रवादीने तो काँग्रेसकडून सोडवून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. दिवाळीपूर्वी या दोन्ही पक्षांच्या जागावाटपावरील चर्चेत राष्ट्रवादीने तशी मागणीही काँग्रेसकडे केली. मात्र, राष्ट्रवादीने राणेंसाठी हा मतदारसंघ साेडल्यास त्याला काँग्रेसचा विरोध असल्याचे समजते. त्यामुळे तूर्तास तरी राणेंनी 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आहे.
  दरम्यान, राणे यांनी काँग्रेस साेडताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि काँग्रेस नेतृत्वावर चांगलेच तोंडसुख घेतले हाेते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस राणे यांच्या बाजुने उभी राहिल्यास त्याला काँग्रेसकडून तीव्र विरोध होऊ शकतो. आता येणाऱ्या काळातच राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
  भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न 
  खरे तर शरद पवार आणि राणे यांची मैत्री असली तरीही त्यांची विचारधारा काहीशी भिन्न आहे. मात्र देशात आणि राज्यात बदललेली राजकीय गणिते पाहता राणेंच्या कोकणातील राजकीय ताकदीचा फायदा आपल्या कोट्यातील एक खासदार वाढवण्यासाठी होऊ शकतो, ही बाब पवारांनी हेरली आहे. शिवाय एकेकाळी तळकोकणात वाढत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या काही वर्षांत पीछेहाट होत असून पक्षवाढीसाठी तूर्तास राणेंची साथ घेण्याची पवारांची रणनीती असू शकेल. दुसरीकडे, भाजपशी जवळीक करत राणेंनी स्वत:ची राजकीय कोंडी करून घेतली आहे. ती कोंडी फोडण्यासाठी राणेंनाही पवारांची मदत होऊ शकेल. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राणे आणि पवार यांची जवळीक वाढत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी कुडाळ येथील राणेंच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उदघाटनही पवार यांच्या हस्ते झाले होते. आजच्या भेटीतूनही भाजपवर दबाव टाकण्याचा राणेंचा प्रयत्न असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

Post a Comment

 
Top