0
एफडीआय वाढवण्याचा उद्देश- क्लस्टर विकसित करणाऱ्या देशांच्या कंपन्याच पाहतील त्याचे व्यवस्थापन.

नवी दिल्ली- सरकार जपान, दक्षिण कोरिया, चीन आणि रशियासारख्या देशांसाठी विशेष औद्योगिक क्लस्टर स्थापन करण्यावर काम करत आहे. या ठिकाणी या देशांच्या कंपन्या गुंतवणुकीसोबतच त्याचे व्यवस्थापनदेखील करणार आहेत. यामुळे दोन वर्षांत १०० अब्ज डॉलर (७ लाख कोटी रुपये) प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (एफडीआय) येण्याची अपेक्षा आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी विशेष चर्चेदरम्यान ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ज्या क्षेत्रांचा आणि देशांचा यामध्ये समावेश होऊ शकतो किंवा सर्वाधिक संधी असलेल्या क्षेत्रांची आणि देशांची निवड करण्यात आली आहे. हे देश भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकतात. त्यांना गुंतवणुकीसाठी तयार करण्याच्या दृष्टीने या देशांमध्ये “रोड शो’ आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाणिज्य मंत्र्यांनी सांगितले की, चीन भारतामध्ये आैद्योगिक पार्क स्थापन करण्यासाठी तयार झाला आहे. तेथील अधिकाऱ्यांना भारतात प्रकल्प उभा करणाऱ्या कंपन्यांची यादी मागण्यात आली आहे. युरोप आणि अमेरिकेतील ज्या कंपन्या प्रामुख्याने निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्यास तयार आहेत त्या कंपन्यांचेही भारत स्वागत करत असल्याचेही ते म्हणाले. त्यासाठी त्यांना विशेष दर्जाही दिला जाऊ शकतो.


अलीकडच्या वर्षांमध्ये अनेक क्षेत्रांत विदेशी गुंतवणुकीचे नियम सोपे करण्यात आले आहेत. याच वर्षी जानेवारीमध्ये विदेशी हवाई वाहतूक कंपन्यांना भारतीय कंपनीमध्ये ४९ टक्क्यांपर्यंत भागीदारी खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सिंगल ब्रँड रिटेल, बांधकाम आणि ऊर्जा क्षेत्रातील विदेशी गुंतवणुकीचे नियमही सोपे करण्यात आले आहेत. सिंगल ब्रँड रिटेल आणि पॉवर एक्स्चेंजमध्ये ऑटोमॅटिक मार्गाने १०० टक्के एफडीआयची परवानगी दिली गेली आहे. या आधी जून २०१६ मध्ये अनेक क्षेत्रांतील प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीचे नियम सोपे करण्यात आले आहेत.

सर्वाधिक एफडीआय मॉरिशस आणि सिंगापूरमधून
भारतात विशेषकरून मॉरिशस, सिंगापूर, जपान, इंग्लंड, नेदरलँड्स, अमेरिका, जर्मनी, सायप्रस, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरातीमधून विदेशी गुंतवणूक होते. २०१९ मध्ये भारत विदेशी गुंतवणुकीसाठी अव्वल क्रमांकाचा देश ठरणार असल्याचा विश्वासही प्रभू यांनी व्यक्त केला.

गेल्या वर्षी झाली ६१.९६ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक
२०१७-१८ मध्ये भारतात एकूण ६१.९६ अब्ज डॉलरची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक झाली. २०१६-१७ मध्ये ६०.२२ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली होती. यामध्ये भारतात मिळणाऱ्या उत्पन्नाला पुन्हा गुंतवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या रकमेचा ही समावेश आहे. या वर्षी एप्रिल ते जून या कालावधीत १६.८६ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक झाली आहे.

Post a comment

 
Top