0
भारतात चित्ते सुरक्षित राहणार नाहीत म्हणून नाकारण्यात आली होती परवानगी; अभ्यासक डॉ. प्रज्ञा गिरडकर यांचा लढा

नागपूर- बादशहा अकबराच्या काळात १० हजारांच्या घरात असलेला चित्ता नंतर संस्थानिक आणि राजे-रजवाड्यांच्या शिकारीच्या नादामुळे नामशेष झाला. भारतातील गवताळ प्रदेशातील वातावरण चित्त्यांसाठी पोषक असल्याने १८ चित्ते भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु सर्वोच्च न्यायालयात खटला चालवण्यासाठी भक्कम आर्थिक पाठबळ हवे. त्यासाठी समाजातील दानशूर तसेच वन्यजीवप्रेमींनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन 'वाइल्ड लाइफ कन्झर्व्हेशन अँड रुरल डेव्हलपमेंट' संस्थेच्या अध्यक्षा आणि ख्यातनाम चित्ता अभ्यासक डाॅ. प्रज्ञा गिरडकर यांनी सांगितले.

२००८ मध्ये चित्त्यांचा अभ्यास करण्यासाठी डाॅ. प्रज्ञा गिरडकर यांनी दक्षिण आफ्रिकेतील नामिबिया येथे जाऊन ५२ चित्त्यांचा अभ्यास केला. भारतातील नैसर्गिक अधिवासात चित्त्यांना ठेवण्यासाठी त्यांचा स्वभाव, सवयी, आरोग्य आदींचा तपशीलवार अभ्यास आवश्यक होता. त्यासाठी डाॅ. गिरडकर नामिबिया येथे जाऊन राहिल्या. सोनेरी ठिपक्यांच्या कातड्यांसाठी तसेच संस्थानिकांच्या शिकारीच्या शौकामुळे चित्त्यांची शिकार झाली. १९४७ च्या सुमारास मध्य प्रदेशच्या महाराजाने शेवटच्या तीन चित्त्यांची शिकार केल्यानंतर भारतातील चित्ता नामशेष झाला. भारतात चित्ते येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु २०१२ मध्ये त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्या वेळी सर्वोच्च न्यायालयात विरोधी वकिलाने अचूक माहिती दिली नाही. त्यामुळे भारतात वाघ सुरक्षित नाही तर चित्ते कसे राहतील, असा सवाल करीत परवानगी नाकारण्यात आली. आफ्रिका अाणि आशियातील चित्ते पूर्णत: भिन्न आहेत. आफ्रिकेतून आणलेले चित्ते भारतात कसे जगू शकतील हा न्यायालयातील एक महत्त्वाचा मुद्दा होता. आता त्यावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याचे प्रयत्न आहे.

दानशूरांनी द्यावा आर्थिक पाठिंबा
सर्वोच्च न्यायालयात खटला लढवणे हे खूप खर्चिक आहे. त्यासाठी समाजातील दानशूर तसेच वन्यजीवप्रेमींनी नैतिक तसेच आर्थिक पाठिंबा देण्याची अपेक्षा आहे. आपल्या देशात व्याघ्र पर्यटन प्रसिद्ध आहे. पण चित्ता आल्यास वन्यजीव पर्यटन खूपच वाढेल. दक्षिण आफ्रिकेत खास चित्ता पाहण्यासाठी पर्यटक येतात. तसे ते भारतातही येतील. त्यामुळे हाॅटेल इंडस्ट्रीसह गाइड, ट्रॅव्हल इंडस्ट्रीतही वाढ हाेईल. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, असे गिरडकर म्हणाल्या.

भारतीय गवताळ प्रदेशात चित्ता राहू शकतो
ख्यातनाम आॅस्ट्रेलियन चित्तातज्ज्ञ लाॅरी मार्कर यांनी नामिबियातील चित्त्यांच्या वसाहतीसारखेच वातावरण भारतात असल्याचे स्पष्ट केले आहे. येथील गवताळ प्रदेशात चित्ता आरामात राहू शकतो. मध्य प्रदेशातील कुणोलपूर, नौरदोही अभयारण्य तसेच राजस्थानातील जैसलमेरजवळील शहागड येथील गवताळ प्रदेश चित्त्यांच्या अधिवासासाठी उपयुक्त असल्याने चित्त्याला भारतात परत आणण्याचे प्रयत्न झाले. केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने त्या वेळी ७०० कोटी मंजूर केले. या योजनेचा खूप गाजावाजा झाला. पहिल्या टप्प्यात नामिबियातून १२ चित्ते आणण्यात येणार होते, परंतु प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने परवानगी नाकारली.

प्राचीन संस्कृत ग्रंथात उल्लेख, चित्रकाया म्हणजेच चित्ता
प्राचीन संस्कृत ग्रंथात उल्लेख असलेला "चित्रकाया' नावाचा प्राणी म्हणजेच चित्ता असल्याचे डाॅ. गिरडकर यांना संशोधनात आढळून आले आहे. "चित्रकाया'चा अपभ्रंश चिताह असा झाला. त्याचे पुढे चित्ता झाला. शांत आणि मिसळून राहणारा चित्ता लवकर माणसाळतो. नामिबियन आणि पुरातन काळातील भारतीय चित्त्याच्या अनुवंशात नगण्य फरक आहे. हे लक्षात घेता भारतात चित्ता सहज राहू शकतो. आपल्याजवळ भक्कम पुरावे आहेत. सर्वोच्च न्यायालयात आपण ते ठेवू, असे गिरडकर यांनी सांगितले.

Post a comment

 
Top