0
डॉ. विखे म्हणाले, वडील ज्या पक्षात, त्याच पक्षात मुलानेही राहिले पाहिजे असे नाही. मला स्वतंत्र मत आहे.

रहाता- माझे आई-वडील काँग्रेसमध्ये असले म्हणजे मी काँग्रेसमध्येच असलो पाहिजे असे नाही. राजकारणात प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी माझा निर्णय घेण्यास समर्थ आहे. मला स्वतंत्र मत आहे. मान्य असेल त्या नेतृत्वाकडे मी जाईन, भले मग कुटुंबीयांचा विरोध असला, तरी मी थांबणार नाही, असे विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अकोले तालुक्यातील निळवंडे कालव्यांची बंद पडलेली कामे सुरू करण्यासाठी राहाता तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीने डॉ. विखे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विखे कुटुंबीयांचे असलेले जवळचे संबंध लक्षात घेता डॉ. विखे भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

डॉ. विखे म्हणाले, माझे वडील काँग्रेस पक्षात आहेत. ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. आईही काँग्रेस पक्षात असून ती जिल्हा परिषदेची अध्यक्ष आहे. काँग्रेस हा माझ्या आई-वडिलांचा पक्ष आहे. आपण कोणत्या पक्षात असावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो. वडील ज्या पक्षात, त्याच पक्षात मुलानेही राहिले पाहिजे असे नाही. मला स्वतंत्र मत आहे. मला जे नेतृत्व मान्य असेल, त्याकडे मी जाईन. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी पक्ष सोडावा लागला तरी चालेल, पण मी निवडणूक लढवणारच, असे त्यांनी स्पष्ट केले.


नगर दक्षिणेत गेल्या पंधरा वर्षांपासून एकही विकासकाम झालेले नाही. लोकांनी संधी दिल्यास त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक मी शंभर टक्के करेन. काँग्रेस व राष्ट्रवादीत जागावाटप होईल तेव्हा होईल, पण माझी भूमिका स्पष्ट आहे. हा विषय खासदारकीचा नाही. वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवीधर (न्यूरोसर्जन) व पुढारी म्हणून माझी ओळख आहे.

भाजपमध्ये जाण्याबाबत काँग्रेस नेत्यांची सावध भूमिका
माझ्या नावापुढे एखादी राजकीय पदवी नाही. ती लागेल की नाही मला काही फरक पडत नाही. मात्र, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यासाठी एखाद्या माणूस प्रामाणिक प्रयत्न करत असेल, तर कुठल्याही परिस्थितीत जनतेने त्याला साथ दिली पाहिजे. जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे डॉ. विखे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, डॉ. विखे यांच्या या विधानावर काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. डॉ. विखे यांना लोकसभा लढवायची असून ते भाजपत प्रवेश करण्याचा कोणताही संकेत त्यांनी दिलेला नाही, असे काहीजणांनी सांगितले.Dr. Sujay Wikhe Decision

Post a Comment

 
Top