0
महाग इंधन आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्याने जेट एअरवेजला सलग तीन तिमाहींत तोटा

मुंबई- आर्थिक संकटाचा सामना करत असलेली हवाई वाहतूक कंपनी जेट एअरवेजच्या अडचणींत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने कंपनीच्या खात्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत एप्रिल २०१४ पासून मार्च २०१८ पर्यंतच्या खात्यातील सर्व व्यवहाराची तपासणी होणार आहे. बँकेने ऑडिटची जबाबदारी यासंबंधी सेवा देणारी संस्था अर्न्स्ट अँड यंगला दिली आहे. या संस्थेने फॉरेन्सिक ऑडिटचे काम सुरूदेखील केले आहे. बँकेतील सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली

.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फॉरेन्सिक ऑडिटचा निर्णय एका व्हिसलब्लोअरकडून जेट एअरवेजच्या खात्यात आर्थिक अनियमिततेची तक्रार आल्यानंतर घेण्यात आला आहे. एसबीआय जेट एअरवेजला कर्ज देणाऱ्या बँकांच्या समूहातील प्रमुख बँक आहे. एसबीआयने जेटला ८,००० कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे कर्ज दिलेले आहे. नरेश गोयल प्रवर्तित जेट गुंतवणूक जमा करण्यासाठी गुंतवणूकदारांशी चर्चा करत असताना एसबीआयच्या वतीने घेण्यात आलेल्या या निर्णयाला प्रयत्नांना धक्का बसला आहे. या तपासासंदर्भात माहिती विचारण्यासाठी संपर्क केला असता एसबीआयच्या प्रवक्त्यांनी आणि ईवायने तत्काळ याविषयी माहिती देण्यास नकार दिला. जेट एअरवेजमध्ये नरेश गोयल व त्यांच्या कुटुंबाची ५१ टक्के भागीदारी आहे, तर एतिहाद एअरलाइन्सची भागीदारी २४ टक्के आहे. आर्थिक अडचणीत आल्यानंतर गुंतवणूक जमा करण्यासाठी जेट अमिरातीच्या या एअर लाइनला २५ टक्के भागीदारी विक्री करण्यासंदर्भात चर्चा करत आहे. ऑगस्टमध्ये विमान नियामक डीजीसीएने जेटच्या खात्यांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. या संदर्भातील अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र, काही वृत्तानुसार संचालकांनी ५,००० कोटी रुपये इतर जागी हस्तांतरित केले असल्याचा आरोप आहे.

सलग तीन तिमाहींत बाजार भांडवलापेक्षा जास्त तोटा :
महाग इंधन आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्याने जेट एअरवेजला सलग तीन तिमाहींत तोटा सहन करावा लागला. तीन तिमाहींत एकूण तोटा ३६५६ कोटी रुपयांवर असून जेटच्या सध्याच्या बाजार भांडवलापेक्षा (२९५३ कोटी रुपये) जास्त आहे.

कर्मचाऱ्यांना हप्ते पाडून मिळते आहे वेतन :
निधी उभारणी व खर्च कमी करण्याच्या उपायांवर कंपनी विचार करते आहे. कंपनीकडे पैशांची चणचण एवढी आहे की, गेल्या काही महिन्यांपासून जेटच्या कर्मचाऱ्यांना हप्ते पाडून पगार मिळत आहे. गुंतवणूकदारांकडून दीर्घकालीन निधी मिळण्यासाठी बोलणी सुरी आहे.

Post a comment

 
Top