0
 • Javed akhtar in aurangabad divya marathi programऔरंगाबाद - प्रख्यात गीतकार, पटकथा लेखक पद्मविभूषण जावेद अख्तर यांनी मंगळवारी औरंगाबादकरांशी मुक्त संवाद साधला. जगद््गुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृहात ‘जो डर गया... समझो मर गया’ ही त्यांची मैफल गाजली. त्यांच्या शेर-शायरीने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
  आजकाल जगातील कोणत्याही देशातील सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती स्वत:लाच देश समजू लागते. मुळात ती व्यक्ती म्हणजे देश नसते, ते त्याला मिळालेला पद असतो. जेंव्हा त्या व्यक्तीविरुद्ध आपण काही बोलतो तेव्हा देशाविरुद्धच बोलतोय, असे भासवले जाते. आपल्यालाच देशद्रोही ठरवले जाते. आम्हाला देशाबद्दल प्रचंड प्रेम आहे. मुळात, आम्ही देशाविरुद्ध नाही, व्यक्तीविरुद्ध बोलत असतो. जगात ज्या ज्या देशांत धर्म ही संकल्पना आहे त्याच देशांत जास्त अत्याचार होत आहेत, अशा शब्दांत जावेद अख्तर यांनी सद्यस्थितीवर भाष्य केले.
  उर्दू भाषा बोलणाऱ्यांना पाकिस्तानशी जोडले जाते. मात्र, असे करणे चुकीचे आहे. धर्माला भाषेशी जोडता येत नाही. भाषेला धर्म नसतो. तर ती प्रांतानुसार ठरते. ती कोणत्या लिपीत लिहिली जाते, यास महत्त्व नाही. उलट भाषा टिकत आहे, हे महत्त्वाचे, असे मत विख्यात पटकथाकार,गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.

  दैनिक दिव्य मराठीच्या वतीने २३ ते २५ नाेव्हेंबर दरम्यान मराठी लिटरेचर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. याचा समाराेप मंगळवारी (४ डिसेंबर) रोजी प्रख्यात गीतकार, पटकथा लेखक आणि विचारवंत पद्मविभूषण जावेद अख्तर यांच्यासोबत 'जो डर गया, समझो मर गया' या मुक्त संवादाच्या कार्यक्रमाने झाला. संत तुकाराम नाट्यगृहात १ तास ४० मिनिटे रंगलेल्या या संवादामध्ये जावेद अख्तर यांनी चित्रपटापासून राजकारण, समाजकारण, धर्म, आस्था अशा विविध विषयांवर मत मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक प्रा.डॉ.मुस्तजीब खान आणि रूपांकन संस्थेचे अरविंद मंडलोई यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.
  राजकारणापेक्षा देश मोठा 
  देशातील आजची स्थिती पाहता ६ डिसेंबरला परत दंगली होतील का, यावर जावेद अख्तर म्हणाले, या प्रकरणाचे संदर्भ आता बदलले आहेत. शाहबानो खटल्यातील निकालाला तत्कालीन सरकारने मानण्यास नकार देत याविरुद्ध कायदा करण्याची तयारी केली. कट्टरपंथी मुसलमान कानशिलावर बंदूक ठेवून भारताचे संविधान वाटेल तसे बदलू शकतात, हे कसे सहन केले जाईल. सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाला मानणार नसाल तर देश कसा चालेल? असा प्रश्न सर्वसामान्य हिंदूंना पडला. त्यालाच बाबरीच्या विध्वंसातून प्रत्युत्तर देण्यात आले. ही प्रतिक्रिया योग्यच होती. काही लोक आता परत त्यास जिवंत करण्याचा प्रयत्न करताहेत. पण ते शक्य नाही. मंदिर बांधा किंवा मशिदी सर्वसामान्यांना फरक पडत नाही. ज्याप्रमाणे साठीच्या दशकातील सुपरहीट चित्रपटाचा रिमेक हीट होऊ शकत नाही. त्याप्रमाणेच १९९२ च्या या घटनेची पुनरावृत्ती शक्य नाही. फार तर थोडी दगडफेक होईल.
  धार्मिक पक्षाचा नेता नास्तिक
  खुदाला सवाल करताना भीती वाटत नाही का ? यावर अख्तर म्हणाले, आपल्याला धार्मिक आणि जातीय शक्तीतील फरक समजला पाहिजे. जे स्वत:ला धार्मिक म्हणवतात ते धार्मिक नसतात. उलट धार्मिक पक्षाचे नेते सर्वाधिक नास्तिक असतात. मोहंमद अली जिना नास्तिक होते. जे खरे धार्मिक असतात, त्यांच्यात एवढे मोठे नेते होण्याची अक्कलच नसते.
  भाषेला धर्माशी जोडू नका 
  उर्दू भाषा बोलणाऱ्यांना पाकिस्तानशी जोडले जाते. मात्र, असे करणे चुकीचे आहे. धर्माला भाषेशी जोडता येत नाही. उलट उर्दूत ३००-४०० वर्षांपूर्वी कृष्ण, शीख, जन्माष्टीवर खूप लिखाण झाले आहे. पाकिस्तानचे लोक पश्तूनी भाषा बोलतात. पाकिस्तान काश्मीर मागतो. तो आपण देतोय का? मग उर्दूवर हक्क सांगत असेल तर कसा देता येईल? भाषेला धर्म नसतो. तर ती प्रांतानुसार ठरते. ती कोणत्या लिपीत लिहिली जाते, यास महत्त्व नाही. उलट भाषा टिकणे महत्त्वाचे.
  लिटरेचर फेस्टिव्हल पुस्तिका, रीडरशिप सर्व्हेचे प्रकाशन कार्यक्रमप्रसंगी दैनिक भास्करचे नॅशनल ब्रँँड हेड विकास सिंग, दैनिक दिव्य मराठीचे निवासी संपादक दीपक पटवे आणि स्टँडर्ड सिल्क मिलचे संचालक आरेफ खान यांनी जावेद अख्तर यांचे स्वागत केले. या वेळी लिटरेचर फेस्टिव्हलची माहिती देणारी पुस्तिका आणि रीडरशिप सर्व्हेचेही प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डेप्युटी एडिटर रूपेश कलंत्री यांनी केले. रूपांकन यांच्या सहयोगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी औरंगाबाद महानगरपालिका, विवंता ग्रुप, श्री सरस्वती भुवन महाविद्यालय, शेळके समूह, डॉ. विजय चाटोरीकर यांचे "भाग्य विजय', रेऑन इल्युमिनेशन, ९४.३ माय एफएम, ड्रीम्स क्रिएशन, स्टँडर्ड स्किल्स मिल्स, भोज आणि मोबीसॉफ्ट यांचे सहकार्य लाभले.
  रिकामटेकड्या लोकांचे काम 
  समाजातील विविध प्रश्नांवर आपण परखड मत मांडतात. त्यावर खूप ट्रोल होतो. यावर ते म्हणाले, आजकाल रिकामटेकड्या लोकांच्या हातात फोन आहे. समाजात खूप बेरोजगारी आहे. कोठेतरी राग काढायचा असतो. कमजोर लोकं गर्दीत सामील होऊन स्वत:ला सुरक्षित करून घेतात. सोशल मीडियावर ट्रोल करणारेही त्याच पठडीतील आहेत, असे त्यांनी सांगितले.
  मोदी म्हणजे देश नाही
  पूर्वी 'इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा' असे म्हटले जायचे. आता 'मोदी इज इंडिया' झाले आहे. दरवेळी कोणी व्यक्ती 'इंडिया' बनून जातो. पण ना कोणी इंडिया होती ना हे इंडिया आहे. हे लोकं राजकारणी आहेत. येतात आणि जातात. इंडिया होते आणि भविष्यातही राहणार. हे लोक स्वत:ला देश म्हणतात. पण तुम्ही देश नाही. तुम्ही आलात तर परत जाणारच. ३-४ वर्षापूर्वी मोदी देशाचे पंतप्रधान नव्हते. कदाचित काही महिन्यांनी राहणारही नाहीत. आम्ही त्यांच्या विरोधात बोलतो. ते म्हणतात, देशाच्या विरोधात बोलतोय. अाम्ही देशभक्त आहोत. आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलत राहणार, मग वाटल्यास आम्हाला देशद्रोही ठरवा.
  दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये आयोजित पत्रलेखन स्पर्धेतील इयत्ता आठवी ते दहावीच्या गटात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या श्रावणी अनंत दावणगावे, मोठ्या गटात प्रथम क्रमांक पटकावणारे प्रकाश नारायण घेवारे यांना दिव्य मराठीचे निवासी संपादक दीपक पटवे, युनिट हेड महेश वसिष्ठ यांच्या हस्ते बक्षीस, प्रमाणपत्र देण्यात आले.
  अनसेन्सर्ड अमान्य : नेटफ्लिक्स, अमेझॉन, हॉटस्टार ही बदलत्या काळाची नांदी आहे. पण त्यावर बऱ्याचदा 'अनसेन्सर्ड कंटेट' टाकला जातो. शिव्या असतात. हे मलाही अमान्य आहे. पण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाजोगी होत नाही. मधल्या काळात हिंदी चित्रपट युरोपवारी गेले हाेते. गेल्या २-३ वर्षात परत भारतीय प्रसंग, घर दाखवू लागले अाहेत.
  अपयशाचे मेडल कशाला? 
  दौलत, नाव, पदाचा गर्व नसावा, त्याप्रमाणेच संघर्ष, अपयशाचेही गौरवीकरण करण्याची गरज नाही. आयुष्य रमीच्या पत्त्यासारखे आहे. कोणते पत्ते येतील हे आपल्या हातात नाही. जो खेळत राहील, तो खेळात जिंकतो
  .

Post a Comment

 
Top