0
कमिशनचे आमिष दाखवत वर्षा सत्पाळसह इतरांनी जमवल्या हजारो कोटींच्या ठेवी

बीड- साखळी पद्धतीने एजंटांमार्फत कोट्यवधींच्या ठेवी गोळा करून नंतर ठेवीदारांना चुना लावून पसार झालेल्या मैत्रेय प्रकरणात संचालक वर्षा सत्पाळसह इतर संचालकांच्या मालमत्तांची विक्री करून ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात येणार आहे. या अनुषंगाने हालचाली सुरू झाल्या असून ठेवीदारांची माहिती पाठवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मैत्रैय कंपनीच्या माध्यमातून साखळी पद्धतीने एजंट नेमून त्यांना कमिशनचे आमिष दाखवून नाशिकच्या वर्षा सत्पाळ आणि इतरांनी राज्य आणि परराज्यातून हजारो कोटींच्या ठेवी गोळ्या केल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी ही कंपनी बंद पडली आणि हजारो कोटींच्या ठेवी घेऊन अध्यक्ष, संचालक फरार झाले. बीड जिल्ह्यातही सुमारे २०० कोटींच्या ठेवी या मैत्रेय प्रकरणात अडकल्या होत्या. २०१६ मध्ये या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत होती. शिवाय, मुंबईसह राज्यभरात २० गुन्हे नोंद करण्यात आल्याने एकत्रित सर्व गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. यामध्ये पोलिसांनी ठेवीदार गुंतवणूक हित संरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) कारवाई प्रस्तावित केली होती. पोलिसांनी वर्षा सत्पाळ आणि इतर संचालकांच्या संपत्तीची माहिती जमा केली आहे.
६०० ठेवीदारांचे जबाब नोंदवले
बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत जिल्ह्यात फसवणूक झालेल्या सुमारे ६०० ठेवीदारांचे कागदपत्रे जमा करून त्यांचे जबाब नोंद केले आहेत. मेहनतीने बचत केलेला पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होत असल्याने हा ठेवीदारांना दिलासा आहे.
नमुन्यामध्ये अर्जदारांची माहिती भरून देण्याचे काम सुरू
मैत्रेय प्रकरणात वरिष्ठ कार्यालयाने मागितल्याप्रमाणे नमुन्यामध्ये अर्जदारांची माहिती भरून देण्याचे काम सुरू आहे. संपत्तीचा लिलाव करून एमपीआयडी प्रमाणे ठेवीदारांना पैसे मिळू शकतात. प्रशांत शिंदे, पोलिस निरीक्षक,आर्थिक गुन्हे शाखा,बीड.
दोघांना केली होती अटक
या प्रकरणात वर्षा सत्पाळ, प्रसाद परुळेकर, लक्ष्मीकांत नार्वेकर, भरत मैय्यर, नितीन चौधरी, विजय तावरे यांच्या विरोधात गुन्हा नोंद होता. यातील लक्ष्मीकांत नार्वेकर आणि विजय तावरे यांना बीड पोलिसांनी अटक करून त्यांची चौकशी केली होती.
News about 'Maitreya Case'

Post a Comment

 
Top