0
2014 मध्ये वेगळे राज्य बनल्यानंतर तेलंगणामध्ये ही दुसरी विधानसभा निवडणूक आहे

हैदराबाद - तेलंगणात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झालेली आहे. तेलंगणात 119 विधानसभा जागांसाठी 7 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. 2014 मध्ये वेगळे राज्य बनल्यानंतर तेलंगणामध्ये ही दुसरी विधानसभा निवडणूक आहे.
सध्याच्या निवडणूक मतमोजणीवरून टीआरएस बहुमतापेक्षा जास्त जागांवर पुढे आहे. काँग्रेस आणि तेदेपाची पीछेहाट झालेली आहे, तर एमआयएमचे नेते अकबरुद्दीने ओवेसी हे चंद्रयान गुट्टा मतदारसंघातून विजयी घोषित झाले आहेत. राज्यात कोण सत्ता स्थापन करणार याचे चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
असे आहे सध्याचे चित्र....
एकूण जागा - 119 बहुमतासाठी 60 आवश्यक
पक्ष आघाडी विजय एकूण जागा 2013
टीआरएस 91 0 38 63
काँग्रेस+ 16 0 15 37
एआयएमआयएम 5 1 4 7
भाजप 4 0 5 5
अन्य 3 0 3 7
तेलंगणात वेळेआधीच झाल्या निवडणुका...
2014 मध्ये वेगळे राज्य बनल्यानंतर तेलंगणात पहिली विधानसभा निवडणूक लोकसभेसोबतच झाली होती. येथे 2019 च्या लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा होणार होती, परंतु मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी निश्चित वेळेपेक्षा 9 महिन्यांपूर्वीच विधानसभा भंग केली. यापूर्वी 2014 च्या निवडणुकीत केसीआर यांचा पक्ष तेलंगण राष्ट्र निर्माण पार्टी (टीआरएस) ला बहुमत मिळाले होते. पक्ष 63 जागांसोबत पहिल्या क्रमांकावर होता. दुसरीकडे, काँग्रेसला 21 आणि तेदेपाला 15 जागा मिळाल्या होत्या.

ओवेसी म्हणाले- तेलंगणात टीआरएस स्वबळावर सत्ता स्थापन करणार...
तेलंगण राष्ट्र समिती तेलंगणात स्वबळावर सरकार स्थापन करेल, असे भाकीत एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले. केसीआर यांची आपण भेट घेणार असून राष्ट्र उभारणीतील हे आमचे पहिले पाऊल असेल, असे ओवेसी यांनी सांगितले.

तेलंगणचे नवे मुख्यमंत्री केसीआर यांची मी भेट घेणार आहे. ते स्वबळावर सरकार स्थापन करतील आणि मजलिस त्यांच्या बाजूने उभे असेल. हे आमचे राष्ट्र उभारणीतील पहिले पाऊल असेल, असे टि्वट हैदराबादचे खासदार असलेल्या आेवेसी यांनी केले.

असे होते तेलंगणाचे एक्झिट पोल...
पक्ष इंडिया टूडे टाइम्स नाऊ सीएनएक्स रिपब्लिक टीव्ही 9
टीआरएस 79-91 66 50-65 75-85
काँग्रेस 21-33 37 38-52 25-35
भाजप 1-3 7 4-7 2-3
तेलंगणमध्ये मराठी मतदारांनी दिली टीआरएस पक्षाला पसंती

तेलंगणा राज्यात जवळपास अडीच लाख मराठी मतदार आहेत. यात सर्वाधिक राजधानी हैदराबादसह निझामाबाद आणि आदिलाबाद जिल्ह्यात आहेत. येथील मराठी मतदारांच्या आवडीचा पक्ष भाजप आहे. मात्र, या निवडणुकीत भाजप सत्तेपर्यंत पोहोचण्याची शक्यता न दिसल्याने मराठी मतदारांनी तेलंगण राष्ट्र समिती अर्थात टीएसआरलाच पसंती दिली आहे. तेलंगणात समरस झालेली ही मराठी माणसं आपलं मत वाया जाऊ नये, याचीही खबरदारी घेताना या निवडणुकीत दिसून आली.

तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीचा मंगळवारी निकाल आहे. या पार्श्वभूमीवर 'दिव्य मराठी'ने तेलंगणातील मराठी मनाचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. निझामाबाद आणि आदिलाबाद या दोन सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये मराठी मतदार निर्णायक आहे. राजधानी हैदराबादमधील तीन मतदारसंघांतही मराठी मतदारांची संख्या मोठी आहे. त्यातल्या त्यात मराठी लोकांमध्ये ब्राह्मण समाजातील कुटुंबांची संख्या सर्वाधिक आहे. तेलंगणामध्ये मराठी माणसांसाठी मराठी ग्रंथ संग्रहालय, महाराष्ट्र मंडळ आणि विवेकवर्धिनी नावाची एक शिक्षण संस्थाही आहे. प्रकाश फडणवीस हे ग्रंथ संग्रहालयाच्या माध्यमातून तेलंगणात मराठी नागरिकांचे संघटन करतात.

राष्ट्रवादी, शिवसेनेचेही उमेदवार :

ष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेनेही तेलंगणातील काही मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले होते. अर्थात या दोन्हीही पक्षांचा महाराष्ट्रातील एकही नेता प्रचारासाठी गेला नाही. केवळ अस्तित्व दाखवण्यापुरते या पक्षांनी तिथे उमेदवार दिले. हे दोन्ही महाराष्ट्राचे पक्ष असले तरी तेथील मराठी माणूस मात्र 'आपल्या गावचा पक्ष' म्हणून या पक्षांकडे वळला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमुळे काँग्रेसच्या उमेदवारांना, तर शिवसेनेच्या उमेदवारांमुळे भाजपच्या उमेदवारांना किंचित फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टीआरएसला पसंती देण्याचे कारण 
भाजप सत्तेपर्यंत जाऊ शकत नाही, भाजपला मतदान केले तर ते मत वाया गेल्यासारखे आहे, हे गृहीत धरून सुरुवातीला भाजपला मतदान करायचे नाही, या निर्णयापर्यंत मराठी माणूस पोहोचला. यानंतर टीडीपीने भाजपची सोडलेली साथ व लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत जाण्याची शक्यता पाहता टीडीपीलाही मतदान न करण्याचा निर्णय घेतला. अखेर केसीआर मराठी लोकांना कायम जवळ करत आल्याने टीआरएसलाच पसंती देण्याच्या निर्णयावर मराठी मतदार पोहोचले.


महाराष्ट्रातील नेत्यांनी ऐनवेळी दिला 'हात' 
राष्ट्रवादी काँग्रेसने तेलंगणात 22 उमेदवार दिले होते. यासंदर्भात राष्ट्रवादीचे तेलंगणा प्रदेशाध्यक्ष अॅड. समाला रविंदर म्हणाले, अर्ज भरण्याच्या केवळ 15 दिवस अगोदर श्रेष्ठींनी निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय कळवला. कमी दिवसांत 22 उमेदवार उभे केले. पवार साहेबांनी प्रचारासाठी येण्याचा शब्द दिला होता. मात्र, ते आले नाहीत. ते आले असते तर हमखास आमचे दोन ते तीन आमदार निवडून आले असते. करीमनगर, मुधोळ आणि महेबूबनगर या तीन मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बऱ्यापैकी मते घेतील, कदाचित एखादा उमेदवार निवडूनसुद्धा येऊ शकतो, असा विश्वास अॅड. रविंदर यांनी व्यक्त केला.Telangana Assembly Election Result 2018 Live Updates


.

Post a comment

 
Top