0
जीवघेण्या माहुलमधून सुटका करा या मागणीसाठी ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरू झालेले प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन महिना उलटूनही सुरूच आहे. राज्य शासनाने कुर्ला येथे पुनर्वसन करण्याचे आश्वासन देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आंदोलकांशी चर्चा करायलाही वेळ नाही. त्यामुळे आंदोलकांनी आता राज्याच्या सर्व आमदारांना ‘एसएमएस’ करून ‘आम्हाला जगण्याचा अधिकार द्या’ असे साकडे घालण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून पालिकेच्या विविध विकासकामांमधील प्रकल्पग्रस्तांचे चेंबूरजवळच्या माहुलमध्ये पुनर्वसन केले जात आहे. मात्र या ठिकाणी राहिवाशांना मूलभूत सुविधाही दिल्या जात नाहीत. विशेष म्हणजे, या परिसरातील रिफायनरीच्या विषारी प्रदूषणामुळे शेकडो जणांना जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने पालिका आणि राज्य शासनाला आदेश देऊन माहुलवासीयांचे पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करा असे सांगितले आहे. मात्र या आदेशाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. असे असताना प्रदूषणामुळे टीबी, अस्थमा, कॅन्सरसारख्या आजारांनी राहिवाशांचे जीव जाण्याचे सत्र सुरूच आहे. सरकार आणि पालिकेच्या या अन्यायकारक भूमिकेविरोधात शेकडो प्रकल्पग्रस्त माहुलवासीयांनी विद्याविहार स्टेशनजवळील तानसा पाइपलाइनजवळ संसार मांडले आहेत. जोपर्यंत सुरक्षित जागी पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असे आंदोलनकर्त्या रेखा घाडगे यांनी सांगितले.
सात जणांचे प्राण गेले तरीही…
माहुलच्या प्रदूषणामुळे विविध आजारांनी ग्रासलेले आंदोलकही विद्याविहारच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. मात्र याठिकाणीही आजारग्रस्तांचे मृत्यू होण्याचे सत्र सुरूच आहे. गेल्या तीस दिवसांत सात जणांना प्राण गमवावा लागला आहे. रविवारीदेखील एकाचा मृत्यू झाल्याचे आंदोलक रेखा घाडगे यांनी सांगितले. सरकारला जाग आणण्यासाठी रॅली, पोस्टकार्ड, साखळी आंदोलन, पत्रकार परिषदा, काळी दिवाळी, मशाल रॅली काढण्यात आली, मात्र अद्याप आंदोलनाची सरकार किंवा पालिकेने दखल घेतली नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

Post a Comment

 
Top