0
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली.

मुंबई- अंधेरी एमआयडीसीत असलेल्या कामगार रुग्णालयात सोमवारी झालेल्या अग्नितांडवात आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आठवर पोहोचली. यात दोन महिन्यांच्या चिमुकलीचाही समावेश आहे. तर १५७ जण जखमी झाले. केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख, गंभीर जखमींना २ लाख रुपये तर किरकोळ जखमींना १ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मरोळ भागात असलेल्या या कामगार रुग्णालयात नवीन इमारतीचे काम सुरू आहे. आगीच्या कारणांचा शोध घेण्यात असला तरी प्राथमिक अहवालानुसार नव्या इमारतीच्या तळमजल्यावरच्या गोदामात भंगार साहित्य ठेवले जात असून त्यामुळेच शॉर्टसर्किट होऊन सोमवारी रात्री आग लागली. या रुग्णालयात १७७ रुग्ण होते. त्यांना इतर रुग्णालयांत हलवण्यात आले असून त्यांच्यापैकी २८ रुग्णांना घरी पाठवण्यात आले. दरम्यान, या आगीची केंद्र सरकारने गंंभीर दखल घेतली. केंद्रीय कामगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी सोमवारी कामगार आणि एसआयएस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावत तत्काळ मदत देण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली आणि चौकशीचे आदेशही दिले.

रुग्णालयात चौथी घटना
कामगार रुग्णालयात मागील ६ महिन्यांत तीन वेळा किरकोळ प्रकारची आग लागली. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला वारंवार लेखी तक्रारी करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही. रुग्णालयाच्या ढिसाळ कारभाराबद्दल रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आवारात निदर्शने केली. या उपाययोजना अगोदरच झाल्या असत्या तर एवढी मोठी आगीची दुर्घटना टाळता आली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना राज्यसभा सदस्य आनंद शर्मा यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर यावर मार्ग काढू, असे आश्वासन दिले.

सात बालकांना वाचवले
येथील परिचारिका ज्योती कांबळे यांनी सांगितले, आम्ही ४ वाजता जेवण करत होतो. तितक्यात नवजात शिशू विभागात एक महिला आपल्या बालकाला स्तनपान करण्यासाठी येत असताना तिला आग लागल्याचे दिसल्यावर ती ओरडली. बाहेर धुराचे साम्राज्य व अंधार पसरल्याने काहीच दिसत नव्हते. बाळांना सोडूनही जाऊ शकत नव्हतो इतक्यात एक डॉक्टर आणि दोन नर्स त्या ठिकाणी आल्या. त्यांच्या मदतीने या विभागातील ७ बालकांना घेऊन गच्चीवर गेलो. त्या धुरातच मागच्या बाजूने जाण्याचा रस्ता दिसला आणि त्यांना सुखरूप खाली आणले.

दोन महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू
या अग्निकांडात मरोळमध्ये राहणाऱ्या यादव कुटुंबातील २ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. तिची आई रुक्मिणी या रुग्णालयात १४ तारखेपासून उपचार घेत होती. आग लागल्यानंतर तिची आत्या डिंपल बालिकेला घेऊन बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होती. पण त्यातच तिचा मृत्यू झाला. आई रुक्मिणी यांना सेव्हन हिल रुग्णालयात तर आत्या डिंपल कूपर रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
News about labor hospital fire

Post a comment

 
Top