0
औरंगाबाद- शहरात ठिकठिकाणी अनेक भंगार वाहने धूळ खात पडलेली आहेत. ती हटवण्यासाठी मोहीम सुरू करण्यापूर्वी मनपाने अशा वाहनांची विल्हेवाट लावण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. मात्र, पथक येईल तेव्हा पाहू, या विचाराने अनेकांनी या आवाहनाकडे दुर्लक्ष केले. मात्र, शनिवारी सकाळीच भंगार वाहने हटवण्यासाठी पथक पोहोचताच अशा नागरिकांची पाचावर धारण बसली. थोडे थांबा, गाडी भंगारात विकतो, काही पैसे तरी येतील, असे म्हणत त्यांनी कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची समजूत काढत पथकाने दिवसभरात १०२ वाहने हटवली. त्यामुळे गाडी तर गेलीच, शिवाय कारवाईच्या खर्चापोटी दंडाचा भुर्दंड बसणार हे लक्षात येताच मनपाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले.

शहरातील रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा ठरणारी भंगार वाहने हटवण्याच्या महापालिका, पोलिस व आरटीओच्या संयुक्त मोहिमेस शनिवारी सुरुवात झाली. तत्पूर्वी मनपाने वॉर्ड अधिकारी आणि नागरिक मित्र पथकाच्या माध्यमातून सर्वेक्षण करून घेतले. शहरभरात ३५० वाहने रस्त्यावर असल्याचे दिसून आले होते. ही वाहने हटवावीत, असे आवाहनही करण्यात आले. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. जाहीर केल्याप्रमाणे शनिवारी सकाळपासून संयुक्त मोहीम राबवत अशी वाहने उचलून गरवारे क्रीडा संकुलाच्या मोकळ्या जागेत लावण्यात आली. आणखी दोन दिवस मोहीम सुरू राहणार आहे. शहरातील रस्त्यांवर शेकडो भंगार वाहने पडून आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा, तर दुसरीकडे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य शासनाच्या गृह विभागाने रस्त्यावर पडून असलेली भंगार वाहने जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन भंगार वाहने उचलण्याची मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्येक प्रभागासाठी एक अशी नऊ पथके तयार करण्यात आली होती. त्यात महापालिका अधिकाऱ्यांसह वाहतूक पोलिस, आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या नेतृत्वाखाली पथकांनी सकाळी दहापासून प्रत्येक रस्त्यावर असलेली वाहने उचलण्यास सुरुवात केली. त्यासाठी दोन क्रेन आणि ट्रक देण्यात आले होते.

आरटीओ, पोलिस घेणार निर्णय

वाहनांच्या जप्तीची मोहीम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा वाहनांच्या मालकांना आवाहन केले जाणार आहे. त्यानंतरही कोणी वाहने घेण्यास समोर आले नाही तर या वाहनांचे काय करायचे, याबाबत पोलिस व आरटीओ विभाग निर्णय घेणार आहेत.

कारवाईचा खर्च पाहून पोलिस, मनपा आयुक्त निश्चित करणार दंड
तीन दिवस चालणाऱ्या या मोहिमेत जमा होणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी किती खर्च लागला याची सर्व माहिती घेऊन संबंधित वाहनधारकांना किती दंड लावायचा याचा निर्णय मनपा आयुक्त आणि पोलिस आयुक्त घेतील. तसेच यापुढेही ही मोहीम राबवली जाणार आहे.

दंड भरावा लागणार

जप्त करण्यात आलेली सर्व वाहने गरवारे स्टेडियमवर जमा करण्यात येत आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या मोहिमेत जमा होणाऱ्या वाहनांची आरटीओचे अधिकारी तपासणी करणार आहेत. त्यानंतर वाहन मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज यांनी दिली.
News about Aurangabad Traffic Police

Post a Comment

 
Top