रेमंड कंपनीने ब्रँडिंगसाठी बांधून दिली वाहतूक पोलिस चौकी
अहमदाबाद- अहमदाबादेत एका वाहतूक पोलिस चौकीवर रेमंड कंपनीने केलेली ब्रँडिंग पोलिसांसाठी डोकेदुुखी ठरली आहे. या चौकीत तक्रार देण्यासाठी जसे लोक येतात तसेच आता रेमंड शाॅप समजून कपडे घेण्यासाठी लोक पोलिस ठाण्यात येत आहेत. कारण या पोलिस चौकीला रेमंडने शोरूमप्रमाणे सजवले आहे. पोलिस चौकीवर रेमंड शॉप असा नामफलकही लावला आहे. सीजी रोडवरील ही चौकी कंपनीने शिटीच्या आकारात बांधली आहे. भिंतीवर काचेचे आवरण असून ती शोरूमसारखीच दिसते आहे. एक दांपत्य बुधवारी वाहतूक पोलिस चौकीस रेमंड शॉप समजून कपडे विकत घेण्यासाठी चौकीत शिरले. आत कपडेही नव्हते आणि विक्री प्रतिनिधीही. एका फौजदारास दुकानदार समजून दापत्याने म्हटले, भाईसाहब, आम्हाला कपडे दाखवा. त्यांची मागणी ऐकून फौजदार झेड. आय. शेख गोंधळून गेले. नंतर तेही थट्टेच्या स्वरात म्हणाले, काका, नवे दुकान सुरू झाले आहे, आधी कपडे तर येऊ द्या. दांपत्याने लगेच विचारणा केली, मग सूट तरी दाखवा. फौजदाराने त्यांना बाहेर नेत म्हटले, काका, ही पोलिस चौकी आहे.
बोर्ड पुन्हा लावण्याचे आदेश
फौजदार झेड. आय. शेख यांनी काही दिवसांपूर्वी रेमंड कंपनीद्वारे बांधण्यात आलेल्या पोलिस चौकीवर 'द रेमंड शाॅप' हा शब्द काढला होता. यावर त्याना 'सौजन्य : रेमंड शॉप' असे लिहायचे होते. परंतु डीसीपींनी हेच नाव कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Post a Comment