0
अयोध्या- देशात सध्या अयोध्येतील राम मंदिर बांधकामावरून जोरदार चर्चा झडत आहे. पण काळाच्या ओघात अत्यंत जीर्ण झालेली अनेक मंदिरे सध्या तेथे आहेत. एवढेच नव्हे, तर लहान मंदिरांच्या जमिनी एक तर विकल्या गेल्या आहेत किंवा त्यांच्यावर कब्जा झालेला आहे. दुसरीकडे सतत धार्मिक पर्यटन करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यांच्यासाठीही आवश्यक सोयी-सुविधा येथे उपलब्ध नाहीत. बऱ्याचदा त्यांना जीर्ण मंदिरांतच मुक्काम करावा लागतो.

आता राज्य सरकारनेच अयोध्येतील १८२ जीर्ण मंदिरांची यादी जारी केली आहे. अलीकडेच योगी सरकारने अयोध्येला महापालिका जाहीर केली आहे. महापौर ऋषीकेश उपाध्याय यांनी सांगितले की, जीर्ण मंदिरे आणि भवनांना प्रशासनाद्वारे वेळोवेळी नोटिसा काढल्या जातात. नागरिकांच्या जीविताचे-मालमत्तेचे संरक्षण करण्यास आमचे प्राधान्य आहे. एक तर मंदिरांच्या मालकांनी जीर्ण इमारती स्वत: पाडून टाकाव्यात, अन्यथा प्रशासन त्या बळजबरीने पाडून टाकेल. अनेक मंदिरांना नोटिसा बजावल्या असल्या तरी ती रिकामी करण्यात आली नाहीत.
चतुर्भुजी मंदिराचे महंत बलराम दास म्हणाले की, सरकारही मंदिरांत भेदभाव करते. दिवाळीला जे मंदिर रामासमोर होते त्याची रंगरंगोटी करण्यात आली आहे. याउलट आमचे मंदिर थोडे मागे आहे, ते तसेच सोडून देण्यात आले आहे. कनक मंदिराजवळ वैद्यकी करणारे आर. पी. पांडेय म्हणाले की, श्रीरामाशी संबंधित जवळपास ५ हजार मंदिरे आहेत, पण जातीय राजकारणात अडकलेल्या देशातील राजकीय पक्षांना निवडणुकीच्या वेळीच फक्त श्रीराम जन्मभूमीचे मंदिर आठवते. अयोध्येत पौराणिक महत्त्व असलेली अनेक मंदिरे आहेत, पण आता ती जीर्णावस्थेत आहेत. त्यांची साधी माहितीही कोणी घेत नाहीत.

अयोध्येतील पत्रकार भानुप्रताप यांनी सांगितले की, १८२ जीर्ण मंदिरांची यादी जारी तर झाली आहे, पण प्रत्यक्षात जीर्ण मंदिरे ५०० पेक्षा जास्तच असतील. अयोध्येत जवळपास प्रत्येक घरात मंदिर आहे. ३० ते ३५ वर्षांपासून दुरुस्ती न झालेली २०० मंदिरे आहेत. अयोध्या बाजारात शुक्ल मंदिर आहे. त्याचे बांधकाम १८९२ मध्ये झाले होते. महंतांनी काही चुकीचे करण्याचा प्रयत्न केला तर देव त्याला दंड देतात, असा समज आहे. तेथे १९७९ पासून दुरुस्तीचे कुठलेही काम झालेले नाही. तरीही मेळ्यांत भक्त येऊन मुक्काम करतात आणि येथे भाडेकरूही राहतात. मंदिराचे पुजारी संत प्रकाश शुक्ल यांनी सांगितले की, मंदिर पाडावे एवढे जीर्णही ते झाले नाही. दुसरीकडे, अयोध्येत पर्यटकांची संख्या सतत वाढत आहे. जिल्ह्याचे विभागीय पर्यटन अधिकारी व्ही. पी. सिंह यांनी सांगितले की, "अयोध्येत पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. २०१६ मध्ये एक जानेवारीपासून ३१ डिसेंबरपर्यंत १ कोटी २५ लाख पर्यटक आले होते, तर २०१७ मध्ये १ कोटी ४१ लाख पर्यटक आले. २०१८ मध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत १ कोटी ४५ लाख पर्यटक आले आहेत. डिसेंबरपर्यंत हा आकडा दीड कोटीवर जाईल. तरीही प्रशासनातर्फे भाविकांची राहण्याची पुरेशी व्यवस्था नाही. पर्यटन विभागाचे एक साकेत हॉटेल आहे, तर शरयूच्या किनाऱ्यावर एक प्रवासीगृह आहे. काही प्रकल्प रामायण सर्किट योजनेअंतर्गत आहेत. त्यामुळे भाविक पुन्हा धर्मशाळा, मंदिरांकडे वळतात. मुक्कामाच्या सर्व जागा भरल्या जातात तेव्हा जीर्ण मंदिरांत मुक्काम करण्याशिवाय कुठलाही पर्याय त्यांच्याकडे उरत नाही."

अयोध्येतील संत सभेचे अध्यक्ष कन्हैया दास म्हणाले की, "सध्या संघटनेचे लक्ष राम जन्मभूमीवर श्रीरामाचे मंदिर बांधण्याकडे आहे. भगवान श्रीरामांचे मंदिर तयार होईल तेव्हा सर्व मंदिरांच्या देखभालीची व्यवस्था आपोआप होईल." अयोध्येचे महापौर ऋषीकेश उपाध्याय म्हणाले की, जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. ज्या मंदिरांचे पौराणिक महत्त्व आहे त्यांची व्यवस्था चांगली ठेवण्याची जबाबदारी सरकारने उचलावी, असा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे. त्याबाबतच्या योजनेची घोषणा लवकरच केली जाईल. दुसरीकडे, विहिंपचे अवध प्रांताचे प्रवक्ता शरद शर्मा म्हणाले, " इतर तीर्थस्थळांप्रमाणेच केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने अयोध्येच्या मंदिरांचाही आपल्या योजनांत समावेश करावा, अशी आमची प्रदीर्घ काळापासूनची मागणी आहे. अयोध्येची मंदिरे म्हणजे आपला सांस्कृतिक वारसा आहे. त्यांची देखभाल अवश्य करायली हवी." अयोध्येचे आमदार वेद गुप्ता यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, अयोध्येत जीर्णावस्थेतील मंदिरांची संख्या खूप कमी आहे. त्यांचे यात्री निवास निश्चितपणे जीर्णावस्थेत आहेत. जेथे जाण्यास महंत भाविकांना रोखतात ती स्थाने पाडणे आवश्यक आहेच. मात्र, मंदिरांची संपूर्ण जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांना मंदिरांत कोणाचाही हस्तक्षेप नको असतो, त्यामुळे त्यांची देखभाल होत नाही. ज्या मंदिरांची स्थिती वाईट आहे त्यांच्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी मी सरकारकडे करीन.

धार्मिक महत्त्व असलेल्या ऐतिहासिक मंदिरांची स्थितीही खराब
चतुर्भुजी मंदिराचे महंत बलराम दास म्हणाले की, एकेकाळी रामाच्या पौडीवर चतुर्भुजी मंदिराकडे सर्वात जास्त जमीन होती. या जमिनींवर कब्जा झाला आहे किंवा भाडेकरू आता खोली रिकामी करत नाहीत. आधीच्या महंतांनी घर बनवण्यासाठी जमीन विकली आहे. शुक्ल मंदिराचे पुजारी संत प्रकाश म्हणाले की, ज्यांची स्थिती खराब असेल ती खरेदी करणे किंवा कब्जा करणे याकडेच मोठ्या मंदिरांचे लक्ष असते. मंदिर वाचवण्यासाठी गरीब महंत किंवा पुजारी मंदिर चालवतात. शीशमहल मंदिरातही भाडेकरूंच्या कब्जाचे प्रकरण वादात आहे. एक भाडेकरू तर आपले घर बांधून झाले तरी फक्त रात्री झोपण्यासाठी येतो.

सीतामातेला भेट म्हणून मिळाले होते भवन, तेथे महादेव आले होते
चतुर्भुजी मंदिर : हे मंदिर जवळपास ६०० वर्षे जुने आहे. संत श्री रमता दास यांनी ते बांधले आहे. महंत बलराम दास म्हणाले की, वरचे कुठलेही उत्पन्न नाही. श्रावण मेळा, कार्तिक पौर्णिमा आणि रामनवमी मेळा असतो तेव्हाच काही भक्त दर्शनास येतात. मंदिर जीर्ण झाले आहे, त्यामुळे आता जास्त भक्त येत नाहीत.
शीशमहल मंदिर : येथील कर्त्याधर्त्या सुशीला सिंह म्हणाल्या की, राजा दशरथाने सीतामातेला हे भवन भेट म्हणून दिले होते असा उल्लेख स्कंद पुराणात आहे. आता द्वार जीर्ण झाले आहे. मंदिराचा भाडेकरूंशी वाद सुरू आहे. जीर्ण झाल्याने अनेक नोटिसा आल्या आहेत. मात्र, मंदिराचे स्थान सुरक्षित आहे.
दशरथ यज्ञशाळा : महंत विजय दास यांनी सांगितले की, येथेच राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला होता. या मंदिराला ५०० वर्षांचा इतिहास आहे. ज्या मंदिरांकडे पैसे आहेत त्या मंदिरांनी प्रवेशद्वार, आतील सर्वकाही चांगले केले आहे. त्या मंदिरांच्या संतांची सरकारमधील कर्त्याकरवित्यांशी ओळख आहे.
श्रीरामनिवास मंदिर : मंदिरासमोरील मोठा भाग जीर्णावस्थेत आहे. महंत रामरंग शास्त्री कोपऱ्यातील शिव मंदिर दाखवून म्हणतात की, जेव्हा श्रीरामांचा जन्म झाला होता तेव्हा साधू वेशात ज्योतिषी होऊन भगवान महादेव त्यांचे दर्शन घेण्यास आले होते. मंदिराचा पुढील भाग जीर्ण आहे. मंदिरही २५० वर्षे जुने आहे. भक्त येतच असतात. काही वर्षांपूर्वी मागील भागाची दुरुस्ती झाली होती. लवकरच इतर भागांचीही दुरुस्ती होईल.

२ लोकांच्या मृत्यूनंतर जीर्ण मंदिरांची ओळख पटवणे झाले होते सुरू
श्रावण मेळ्यात १६ ऑगस्ट २०१८ ला लक्ष्मणघाट येथील जीर्णावस्थेतील यादव पंचायती मंदिराचे छत पडले होते. त्याखाली दबून दोन भाविकांचा मृत्यू झाला होता, तर ४ ते ५ भाविक जखमी झाले होते. त्यानंतर पालिका प्रशासनाने आपली कारवाई जोरात सुरू केली. अयोध्येत श्रावण मेळा, कार्तिक पौर्णिमा आणि रामनवमी असे तीन प्रमुख मेळे आहेत. त्यासाठी आलेले बाहेरील भक्त मंदिरांत थांबतात. भाविकांनी जीर्ण मंदिरांत थांबू नये, असे प्रशासनाला वाटते. पण तरीही ज्या मंदिरांनी आपली घरे पाडली नाहीत तेथे भाविक अजूनही थांबतात. मुक्कामासाठी चांगली जागा मिळत नाही हेही त्याचे कारण आहे.Ayodhya: news about 182 of the oldest temples

Post a Comment

 
Top