0
पाथरीत निषेध बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची भाकपची मागणी

परभणी- कर्ज मागणीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियासमोर वारंवार उपोषण, आंदोलने करूनही कर्ज न मिळाल्याने बँकेसमोर कर्जाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या तुकाराम काळे या शेतकऱ्याचा गुरुवारी (दि.१३) मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद शेतकऱ्यांत उमटले. शुक्रवारी (दि.१४) पहाटे तीनच्या सुमारास तुकाराम काळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, संतप्त झालेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन सकाळपासूनच शहरातील बाजारपेठ बंद पाडली. बँक व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाकप व मनसेच्या वतीने करण्यात आली.

स्टेट बँक आॅफ इंडियाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचा नाहक बळी गेला आहे. म्हणून बँक व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व मयत तुकाराम काळे यांच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये मदत देण्यात यावी तसेच मयत शेतकऱ्याच्या पत्नीला बँकेत कायमस्वरूपी रुजू करून घ्यावे, या मागणीसाठी किसान सभा, भाकपा कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी शहरातील बाजारपेठ बंद केली. या मागण्या मान्य न झाल्यास तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरून त्या कुटुंबाला न्याय मिळवून देतील. यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सदरील प्रकरणाला बँक प्रशासन जबाबदार राहील, असे म्हटले आहे.


तहसीलसमोर वाहिली श्रद्धांजली :

दरम्यान, सकाळपासूनच भाकपचे कार्यकर्ते पाथरी तहसील कार्यालयासमोर जमण्यास सुरुवात झाली. मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी तसेच शेतकऱ्यांनी या ठिकाणी शोकसभा घेऊन मयत तुकाराम काळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी पोलिस प्रशासनाला आणि पाथरीच्या तहसीलदार नीलम बाफना यांना दिलेल्या निवेदनावर कॉ. दीपक लिपने, कॉ. विजय कोल्हे, अरुण काळे, कॉ. मुंजाभाऊ लिपने, कॉ. ज्ञानेश्वर काळे,,सुनील पांडुरंग, ज्ञानेश्वर शिंदे, रंगनाथ वाकनकर, नवनाथ कोल्हे, मगर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


पाथरी येथे उपोषणकर्ते शेतकरी तुकाराम काळे यांच्या मृत्युप्रकरणी भाकप कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि.१४) पाथरी तहसीलसमोर श्रद्धांजली सभा घेऊन बँक व्यवस्थापकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.


मनसेकडूनही श्रद्धांजली
दरम्यान घटनेचा निषेध करत मनसे कार्यकर्त्यांनी उप जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत बँक प्रशासनाविरोधात निवेदन दिले. तहसील कार्यालयात मयत शेतकरी तुकाराम काळे, गोपेगावचे आत्महत्या केलेले शेतकरी बाबाराव खेडेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी दीपक लिपने, राकाँ महिला आघाडीच्या कमल राठोड, उषा यादव यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.


सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा
मनसेेच्या वतीने जिल्हाध्यक्ष बालाजी मुंडे, रूपेश सोनटक्के यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन बँकेच्या व्यवस्थापका विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले. या वेळी परभणी शहराध्यक्ष सचिन पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुशीला चव्हाण, रेंगे, अर्जुन टाक, गणेश भिसॆ, शेख यास्मिन, उत्तमराव चव्हाण, दिलीप जाधव, निजलिंगआप्पा तरवडगे, दिलीप डहाळे, चंद्रकांत गवारे, संतोष कुऱ्हाडे, साखरे पाटील, बबन खरात यांची उपस्थिती होती.Market closure from workers in Parbhani

Post a Comment

 
Top