0
महिलांची झडती घेण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन तस्करांकडून छत्तीसगड आणि तेलंगणा येथील गरीब महिलांचा वापर झाल्याचे उघड

नागपूर- चारचाकी आणि दुचाकी वाहनांमधील कप्पे, टूलबॉक्स, डिझेलच्या टाक्यांमध्ये तयार केलेले स्वतंत्र कप्पे, कापूस अथवा धान्याची पोती, कलिंगड किंवा कोहळ्याचा गर काढून तयार केलेले कप्पे, गॅस सिलिंडर.. शाळकरी मुलांची दप्तराचा दारूच्या तस्करीसाठी या साधनांचा वापर सर्रासपणे केला जात आहे. दारूबंदी लागू असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात तळीरामांची तलफ भागवण्यासाठी तस्करांकडून दारूच्या छुप्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या क्लृप्त्यांमुळे स्थानिक पोलिस यंत्रणाही मेटाकुटीला आली आहे. या पद्धतींमुळे अवैध दारूचा छडा लावण्यासाठी पोलिसांना यापुढेही जाऊन विचार करावा लागत असल्याचा स्थानिक पोलिसांचा दावा आहे.

वर्धा आणि गडचिरोलीपाठोपाठ २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातही महिला संघटनांच्या तीव्र आंदोलनामुळे दारूबंदी लागू करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. मात्र, दारूबंदीच्या पावणेचार वर्षांच्या कालावधीत दारू तस्करांनी कल्पनाही केली नसेल अशा क्लृप्त्या वापरून जिल्ह्यातील तळीरामांची तलफ भागवल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. जिल्ह्यात दारूच्या खेपा येऊ नयेत, यासाठी पोलिस यंत्रणेने जिल्ह्यात येणाऱ्या बहुतेक मार्गांवर तपासण्या सुरू केल्या. मात्र, पोलिस व्यवस्था भेदून तस्करांनी दारूच्या तस्करीसाठी ज्ञात आणि अज्ञात अशा सर्वच पद्धतीचा अवलंब केल्याचे दिसून आले. चारचाकी आणि दुचाकी वाहनांमध्ये छुप्या पद्धतीने दारू वाहून नेण्यासाठी स्वतंत्र कप्पे तयार करण्यात आल्याची असंख्य प्रकरणे उघडकीस आली. गॅस सिलिंडर, वाहनांच्या डिझेलच्या टाक्या, शाळकरी मुलांची दप्तरे यासह मोठ्या आकाराच्या कलिंगडाचा किंवा कोहळ्याचा गर काढून त्यातील पोकळीचा वापर देखील दारूच्या बाटल्या, पाकिटांसाठी केला जायचा', अशी माहिती दारूबंदीच्या सुरुवातीच्या काळात ती लागू करण्याची जबाबदारी सांभाळणारे माजी पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. नियमित पिणाऱ्यांसाठी ऑर्डरवर घरपोच दारू पुरवठ्याची कुरिअर व्यवस्था देखील पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आली होती', असे दिवाण सांगतात. कापूस अथवा धान्यांच्या पोत्यांमध्ये धान्यासोबतच दारूच्या बाटल्या लपवण्यात आल्याचे प्रकारही आजवर मोठ्या प्रमाणात उघडकीस आले आहेत. महिलांची झडती घेण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन तस्करांकडून छत्तीसगड आणि तेलंगणा येथील गरीब महिलांचा वापर होत असल्याचे प्रकारही उजेडात आले आहेत. बंदीकाळातील जप्त दारूची प्रकरणे, आरोपींची संख्या आणि दारूच्या किमतीचे आकडे देखील चक्रावून टाकणारे ठरले आहेत.


मार्च २०१५ मध्ये दारूबंदी लागू केल्यावर २०१५-१६ मध्ये अवैध दारू विक्रीची ६,७४८ प्रकरणे दाखल झाली. या प्रकरणांमध्ये ८३७५ आरोपी निष्पन्न झाले तर १२ कोटी २९ लाखांची दारू जप्त करण्यात आली. २०१६-१७ वर्षांत अवैध दारूचा महापूर कायम राहिला. तब्बल ७,३४० प्रकरणे दाखल होऊन त्यात ८,२१५ आरोपी निष्पन्न झाले. १६ कोटी ३७ लाखांची दारू जप्त केली गेली.

दरवर्षी प्रकरणांची संख्या साडेसात हजारांवर
२०१७-१८ या आर्थिक वर्षात ८,२४८ प्रकरणे दाखल होऊन ८,५४५ आरोपी निष्पन्न झाले. २३ कोटी १४ लाख रुपये किमतीची दारू जप्त झाली. या कालावधीत दारू वाहून नेणारी दीड हजारांवर दुचाकी आणि साडेतीन हजारांवर चारचाकी वाहनांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. दरवर्षाला दाखल होणाऱ्या दारूबंदी प्रकरणांची संख्या साडेसात हजारांच्या वरच राहिली असल्याचे चंद्रपूरचे सध्याचे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.

तस्करांच्या यादीवर काम; पोलिसांचा दावा
शेजारची राज्ये आणि जिल्ह्यांतून चंद्रपूर जिल्ह्यात दारूचा पुरवठा होतो. पोलिस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना तस्करांनी गाडीने धडक देऊन ठार मारल्याच्या घटनेनंतर चंद्रपूर पोलिसांनी शेजारचे राज्य व जिल्ह्यांतून दारूचा पुरवठा करणाऱ्या किमान ४५ ते ५० तस्करांची यादी तयार केली आहे. या बड्या तस्करांवर स्थानिक पोलिसांच्या मदतीने लगाम घालण्याचे प्रयत्न होत आहेत, असा दावा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी केला.
Vehicle collages, cylinders, diesel tanks, liquor smugglers from Kalingaad

Post a comment

 
Top