0
नशीब होते म्हणून वाचलो, नाही तर कर्तव्यावर असताना गेलो असतो


औरंगाबाद- "नेहमीप्रमाणे गस्तीवर होतो. जाफर गेटच्या अलीकडे रविवारच्या बाजाराजवळ मोठ्या संख्येने दोन गट जमले असल्याचा निरोप मिळाला. काहीही विचार न करता गाडी त्या दिशेने वळवली. पोलिस दलातील ३६ वर्षांच्या सेवेत असे अनेक प्रसंग हाताळल्याने आत्मविश्वास होताच. उतरलो तेव्हा दोन्ही गटांत संतप्त लोक होते. काही लोकांच्या हातात लोखंडी सळया होत्या तर काहींच्या हाती शस्त्रे असल्याचेही दिसत होते. यापूर्वी क्रांती चौक पोलिस ठाणे सांभाळल्यामुळे त्या गर्दीत कोण कोण आहे, ते हेरून लोकांना शांत करण्यासाठी चर्चा सुरू केली. तेवढ्यात अंधाराचा फायदा घेत कोणीतरी फरशीचा तुकडा माझ्या दिशेने भिरकावला. तो थेट वेगाने येत माझ्या गळ्यावर फटका मारून खाली पडला. काही कळायच्या आत रक्ताची धार लागली. सोबत असलेले पोलिस निरीक्षक परोपकारी हेदेखील जखमी झाले. मला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. सहकाऱ्यांंनी आणि स्थानिकांनी तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली म्हणून वाचलो. नशीब होते म्हणून वाचलो. नाही तर कर्तव्यावर असतानाच गेलो असतो."

ही आपबीती 'दिव्य मराठी'ला सांगत होते ११ मे रोजी जुन्या शहरातल्या दंगलीत गंभीर जखमी झालेले पोलिस अधिकारी गोवर्धन कोळेकर. दोन्ही गटांना शांत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेले ते पहिले पोलिस अधिकारी. ते जर या ठिकाणी वेळेवर पोहोचले नसते तर दोन्ही गट त्याच ठिकाणी आपसात भिडले असते आणि घडलेला प्रकार अधिक गंभीर झाला असता. ते जखमी झाल्यामुळे काही जमाव बिथरला, इतर अधिकाऱ्यांना घटनेचे गांभीर्य तत्काळ समजले. आठ महिन्यांनंतर कोळेकर जेव्हा या घटनेचा विचार करतात तेव्हा म्हणतात, 'ही समाजातील केवळ विकृती आहे. एरवी एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होणाऱ्या लोकांना अशा वेळी काय होते हे समजत नाही. आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे. कुठलीही अडचण ही संवादाने सुटू शकते. स्वातंत्र्याचा प्रत्येकाने उपभोग घ्यावा, मात्र तो असा नाही. समाजातील मोजक्या लोकांमध्ये असलेली ही विकृती कायमची नष्ट व्हायला हवी. उपचार घेत होतो त्या काळात पोलिस दल, महाराष्ट्र शासन यांच्याकडून मिळालेले सहकार्य मोठे होते. उपचार करणारे डॉक्टर आणि सहृदयींच्या सदभावना मला जीवदान द्यायला महत्त्वाच्या ठरल्या, असे मी मानतो.'

आवाज जाऊ नये म्हणून शहरभर झाल्या प्रार्थना
पूर्वी शहरातील संवेदनशील क्रांती चौक पोलिस स्टेशन सांभाळले, शहर विभागातच सहायक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले गोवर्धन कोळेकर या घटनेत गंभीर जखमी झाले होते. गळ्यावर मोठी जखम झाल्यामुळे श्वासनलिका तुटली. त्यामुळे त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तज्ज्ञ डाॅक्टरांनी तपासणी करून यापुढे कोळेकरांना बोलता येण्याची शक्यता कमी असल्याची भीती व्यक्त केली. ते वृत्त प्रसृत होताच संपूर्ण शहरात त्यांचा आवाज शाबूत राहावा, यासाठी प्रार्थना सुरू झाल्या होत्या.

नियोजित दंगल; पण शहरभर पसरली नाही
रात्री दंगल सुरू झाली त्या वेळी प्रारंभी तो किरकोळ प्रकार असेल, असे सर्वांनाच वाटले होते. सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकरांनाही तसेच वाटले. त्यामुळे ते होते तसेच तातडीने घटनास्थळी गेले. पण हा सर्व प्रकार पूर्वनियोजित असल्यासारखा होता. जाळपोळीचे आणि हल्ल्याचे वृत्त रात्रीच समाज माध्यमांतून सर्व शहरात पसरवले जात होते. पोलिस आयुक्तही त्या वेळी शहरात नव्हते. अशा वेळी कोळेकर आणि त्यांच्यासारख्या शहरातील धाडसी अधिकाऱ्यांनी हा प्रकार हाताळला आणि त्यामुळे दंगल पसरली नाही.
Police Officer Gavardhan Kolekar share his experience

Post a Comment

 
Top