0
खरिपाच्या सर्व गावांची अंतिम आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी

बोधेगाव : अत्यंत कमी पाऊस झाल्याने खरीप पिके हातातून गेली. दुबार पेरणीची पिकेही न जगल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याने संपूर्ण शेवगाव तालुकाच दुष्काळी म्हणून शासनाने जाहीर केला. महसूलकडून शनिवारी चालू खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार शेवगाव तालुक्यातील खरीप हंगामाच्या बोधेगावसह ३४ गावांची अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाल्याने येथील दुष्काळी स्थितीवर आता अधिकृत 'सरकारी मोहोर' उमटली.

शासकीय नियमानुसार १५ डिसेंबरला खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी जाहीर केली जाते. यापूर्वी महसूल प्रशासनाने नजर अंदाज आणेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याचे दाखवल्याने शेतकरी संतापले होते. याबाबत सर्वप्रथम दैनिक दिव्य मराठीने 'पीकस्थिती चांगली नसताना आणेवारी अधिक दाखवली' अशा आशयाचे वृत्त प्रसारित करत शेतकऱ्यांचा आवाज शासन दरबारी मांडला होता. सुधारित आणेवारी जाहीर करण्याच्या दिवशी (३१ ऑकटोबर) 'सुधारित आणेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष' असे वृत्त प्रसारित करून शेतकऱ्यांचे लक्ष असल्याचे दाखवून दिल्याने प्रशासनाने त्या गावांची सुधारित आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे जाहीर केले. दरम्यान, तहसीलदार विनोद भामरे यांनी शनिवारी खरीप हंगामातील सर्वच्या सर्व ३४ गावांची २०१८-१९ या वर्षाच्या खरिपाची अंतिम आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे जाहीर केले. त्यानुसार त्या गावांची अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाल्याने दुष्काळी स्थितीवर सरकारी मोहोरच उमटवली.


शेतकऱ्यांचे आता नुकसान लक्ष मदतीकडे!
दुष्काळ जाहीर करून जनावरांना चारा, पिण्याचे पाणी, हेक्टरी मदत आणि हाताला काम देण्याच्या आग्रही मागणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठीच्या विविध शासकीय योजनेच्या लाभासाठी ही आणेवारी महत्त्वाची मानली जाते. अखेर खरीप हंगामाची अंतिम आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे जाहीर केल्याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे आता दुष्काळी मदतीकडे लक्ष लागले आहे.

शेवगाव तालुक्यातील गावांची अंतिम आणेवारी
अधोडी ४२, आंतरवाली बुद्रूक ४२, आंतरवाली खुर्द शे ४२, बेलगाव ४२, बाडगव्हाण ४२, बोधेगाव ४३, चेडेचांदगाव ४२, दिवटे ४३, गोळेगाव ४३, हसनापूर ४६, कोळगाव ४५, कोनोशी ४२, लाडजळगाव ४२, माळेगाव ने ४६, मंगरूळ बुद्रूक ४६, मंगरूळ खुर्द ४६, मुरमी ४३, नागलवाडी ४२, नजीक बाभूळगाव ४५, राक्षी ४२, राणेगाव ४२, सालवडगाव ४५ , सुळे पिंपळगाव ४२, सोनेसांगवी ४३, शिंगोरी ४३, शोभानगर ४३, शेकटे बुद्रूक ४२, शेकटे खुर्द ४२, सुकळी ४२, थाटे ४६, ठाकूर निमगाव ४६, वाडगाव ४६, वरखेड ४२, सेवानगर ४३ या गावांचा यामध्ये समावेश आहे. अंतिम आणेवारी जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकेले.
drought declared by government

Post a comment

 
Top