0
  • हिंगोली - महापुरुषांचे विचार सोडून तू देवाच्या मागे का लागली, दररोज घरामध्ये देव देव का करीत आहेस? असे म्हणत सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे ५० वर्षीय महिलेला चौघा जणांनी बेदम मारहाण केली. अत्याचाराचा कळस म्हणजे या चौघांनी तिच्या गुप्तांगामध्ये मिरची पूडसुद्धा टाकल्याची धक्कादायक घटना घडली. या संतप्त घटनेमुळे हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सेनगाव पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर तिची वैद्यकीय तपासणी करून याबाबत गुन्हा दाखल केला आहे. संतोष विठ्ठल पंडित, विकास वामन पंडित, वामन महादू पंडित आणि विठ्ठल महादू पंडित अशी या नराधम आरोपींची नावे आहेत.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी महिला सेनगाव तालुक्यातील जयपूर या एकाच गावातील आणि एकाच धर्माचे आहेत. पीडित महिला नेहमी देवाची पूजा करते, देव देव करते या कारणांवरून सदर महिलेला ४ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास संतोष पंडित आणि विकास पंडित यांनी तिच्या घरात घुसून प्रथम चापट- बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आलेल्या वामन पंत आणि आणि विठ्ठल पंडित यांनीही महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर या चौघांनी पीडित महिलेच्या अंगावर चटणीची पूड टाकली. त्यानंतर महिलेच्या अंगावरील कपडे फाडून तिच्या गुप्तांगामध्ये मिरची पूड टाकली, असा आरोप महिलेने केला आहे.Physical torture to women, hingoli
    वैद्यकीय अहवालानंतर गुन्हा दाखल : या घडलेल्या प्रकारानंतर ग्रामस्थांनी सदर महिलेला सेनगाव येथील तालुका ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर हिंगोली येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. पीडित महिलेने हिंगोली रुग्णालयात दिलेल्या जबाबावरून आणि वैद्यकीय अहवालावरून सेनगाव पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध लैंगिक अत्याचार, मारहाण, जिवे मारण्याची धमकी देणे, शिवीगाळ करणे आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच चारही आरोपी पसार झाले आहेत. पोलिस या फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
    प्रतिकार केल्याने मारहाण
    या घटनेबाबत पीडित महिलेच्या मुलाने सांगितले की, आरोपी आणि आम्ही एकाच धर्माचे अाहोत. घरात आमच्या धर्माशिवाय इतर कोणत्याही धर्माच्या देवी-देवतांची पूजा करत नाही. असे असतानाही आरोपींनी आमच्यावर इतर देवांची पूजा करण्याचा आरोप लावून गावातून बहिष्कार टाकण्याची, हद्दपार करण्याची धमकी दिली होती. त्याचा प्रतिकार माझ्या आईने केला असता आरोपींनी तिला अमानुषपणे मारहाण केली आहे.

Post a Comment

 
Top