0
समतानगरातील सायंकाळची घटना

जळगाव- घरासमोर महिलांना शिवीगाळ करीत असल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने एका युवकाने पिता व पुत्रावर छाती, पोट व बरगड्यांवर चाकूने वार केले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास समतानगरात घडली.

दिलीप सोनू सपकाळे (वय ५०) व विकी दिलीप सपकाळे (वय १७) असे चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत. दोघेे पिता-पुत्र घरात बसलेले होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विशाल नावाचा युवक त्यांच्या घरासमोर आला. या वेळी सपकाळे यांच्या घराजवळ काही महिला थांबलेल्या होत्या. या वेळी विशाल हा सपकाळे यांच्या घरासमोर जोरजोरात शिवीगाळ करू लागला. तो सारखी शिवीगाळ करीत असल्याने दिलीप सपकाळे हे घरातून उठून बाहेर आले. त्यांनी विशाल याला आमच्या घरासमोर शिवीगाळ करू नकोस, असे सांगितले. त्याने सपकाळे यांनाच शिवीगाळ करून वाद घालायला सुरुवात केली. त्यामुळे भांडण वाढत गेले. विशाल याने सपकाळे यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, कंबरेला खोचलेला चाकू काढून विशालने सपकाळे यांच्या पोटावर व दोन्ही बाजूच्या बरगड्यांवर वार केले. विशाल चाकूने वार करीत असताना सपकाळे यांचा मुलगा विकी हा घरातून पळत आला. त्याने भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. विशाल याने त्याच्याही छातीवर चाकूने वार केला. दोघेही जोरजोरात ओरडत असल्याने समतानगरातील नागरिक जमा झाल्याने विशालने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर जखमी पिता-पुत्राला नातेवाइकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ. विजय कुरकुरे यांनी त्यांच्यावर उपचार केले. दिलीप सपकाळे यांच्या पोटावर व दोन्ही बरगड्यांवर चाकूचे खोलवर वार असल्याचे त्यांनी सांगितले.Father-son injured in the attack of weapon

Post a comment

 
Top