राष्ट्रीय लोक समता पार्टीने (रालोसपा) रालोआ सोडल्यानंतर लोक जनशक्ती पार्टीकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
- पाटणा- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांत वाद निर्माण झाला आहे. जागावाटपाचा हा तिढा असून तो सोडवण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री तथा जदयूचे अध्यक्ष नितीश कुमार शुक्रवारी नवी दिल्लीला रवाना झाले आहेत. ते बिहारचे माजी मुख्य सचिव अंजनी कुमार सिंह यांच्या मुलीच्या विवाह समारंभाला हजेरी लावतील. मात्र, त्यांचा दिल्लीत दोन-तीन दिवसांचा मुक्काम राहणार आहे.राष्ट्रीय लोक समता पार्टीने (रालोसपा) रालोआ सोडल्यानंतर लोक जनशक्ती पार्टीकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. भाजपचे नेते आता लोजपच्या नेत्यांची मनधरणी करू लागले आहेत. या दरम्यान नितीश कुमारही शुक्रवारी सायंकाळी दिल्लीला रवाना झाले होते. लोजप रालाेआच्या प्रमुख घटक पक्षांपैकी आहे. त्याबद्दल कोणीही संशय घेण्याचे कारण नाही. मुख्यमंत्री दिल्लीत येणार म्हटल्यावर चर्चा होणे स्वाभाविकच आहे. विवाह समारंभाला हजेरी लावण्याचा त्यांचा कार्यक्रम नियोजित आहे, असे जदयूचे ज्येष्ठ नेते के. सी. त्यागी यांनी सांगितले. दुसरीकडे लोजप प्रमुख रामविलास पासवान, त्यांचे पुत्र चिराग पासवान यांनी गुरुवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचीही भेट घेतली होती. बिहारच्या राजकारणात भाजपचा मार्ग कठीण दिसू लागला आहे. भाजप २००५ नंतर बिहारच्या सत्तेवर आले होते. तेव्हा भाजपने धाकट्या भावाची भूमिका ठेवली होती. मात्र, लोकसभेच्या तोंडावर बिहारमधील आघाडीच्या घटक पक्षांनी आघाडीला सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून आघाडीतील वाद चव्हाट्यावर आले आहेत. हिंदुस्तानी आवाम मोर्चाने (हम) भाजपची साथ सोडली. त्यानंतर नितीश कुमार यांचा पक्ष भाजपच्या सोबत होता. राष्ट्रीय लोकसमता पार्टी नाराज झाली. अशा स्थितीत भाजप कमकुवत होत आहे. रालाेआतील बळकट घटक पक्ष मानला जाणाऱ्या लोजपनेही रालोआ सोडण्याची धमकी दिली आहे.अर्थमंत्री जेटलींकडे सोपवली जबाबदारी
बिहारमधील आघाडीच्या घटक पक्षांतील जागावाटपाचा तिढा सोडवण्याची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. जेटली बिहारचे पक्ष प्रभारी आहेत. शुक्रवारी उशिरा भाजप-लोजपसोबत नितीश कुमार यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजपने आघाडी टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे संकेत दिले आहेत.लोजपला आघाडीकडून नेमके काय हवे?
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्र यादव व चिराग पासवान यांच्यात गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. सूत्रांच्या मते चिराग यांनी बिहारमधून पक्षाला सात जागांची मागणी लावून धरली आहे. त्याचबरोबर वडील रामविलास पासवान यांच्यासाठी राज्यसभेची एक जागा मागितली आहे. त्यावरच आघाडीतून बिघाडी दूर होण्याची चिन्हे आहेत.
Post a Comment