0

राजकारण तीन राज्यांतील यशानंतर भाजपकडे कूच करणाऱ्यांचे मन परिवर्तन, विखे-थोरात आता एकत्र येणार का?

नगर- मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड राज्यांतील काँग्रेसच्या यशानंतर भाजपच्या दिशेने आगामी काळात कूच करणाऱ्यांमध्ये मन परिवर्तन झाले असून, अनेक काँग्रेसजनांनी आपला पक्षच बरा, असे म्हणत पक्षाला 'अच्छे दिन' येणार या व आशेवर माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. माघारी फिरणाऱ्यांमध्ये अनेक मोठे व स्थानिक नेते देखील आहेत.

देशात व राज्यात २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेवरून पायउतार झाले होते. सत्ता गेल्यानंतर राज्य व स्थानिक पातळीवर काँग्रेसला मोठी मरगळ आली होती. नेहमी सत्तेत राहण्याच्या सवयीमुळे काँग्रेस नेते सत्ता गेल्यानंतर ही फार काही करू शकले नाही. राज्याची सत्ता गेल्यानंतर पक्षाने राज्याची धुरा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यावर टाकली होती. संपूर्ण राज्याची जबाबदारी सांभाळणारे विखे देखील पक्षावरच नाराज असल्याची चर्चा होती. काही महिन्यांपूर्वी विखे भाजपमध्ये जाणार असल्याच्या देखील वावड्या उठल्या होत्या. मात्र, यावर विखे यांनी शेवटपर्यंत चुप्पी साधत सर्वांनाच संभ्रामात ठेवले होते. विशेष राज्यात जशी काँग्रेसची अवस्था होती, तशीच अवस्था विखे यांच्या जिल्ह्यात देखील काँग्रेसची झाली होती. विखे यांच्याबरोबर दिग्गज नेते म्हणून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही साडेचार वर्षांत संगमनेर सोडून नगर शहरात लक्ष घातले नाही. त्यामुळे सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्ते पक्षापासून दुरावत गेले.

महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या केडगावमधून काँग्रेसचे सहा विद्यमान नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले होते. याच कालावधीत काँग्रेसचे अनेक जण भाजपच्या संपर्कात होते. दिग्गज नेते असतानाही शहर व जिल्ह्यात काँग्रेसची गेल्या साडेचार वर्षांत पूर्णपणे वाताहत झाली. पक्षाच्या वरिष्ठांनीही नगर नको रे बाबा असे म्हणत शहराला वाऱ्यावर सोडले होते. त्यामुळे सर्वसामान्य काँग्रेसजनांची पक्षात राहून मोठी कोंडी झाली होती. महापालिका निवडणुकीत, तर आपली व्यथा कुणापुढे मांडायची? असा प्रश्न देखील अनेकांना पडला होता. मात्र, मरगळ आलेल्या काँग्रेसला मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड राज्यातील यशानंतर नवसंजीवनी मिळणार अाहे.

भविष्यात पक्षाला अच्छे दिन येतील, या आशेने काँग्रेसमधील अनेकांनी आता काँग्रेसचाच झेंडा हाती ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी पुन्हा पक्षाच्या नेत्यांशी संपर्क सुरू केल्याचे समजते. त्यातच महापालिका निवडणुकीत काँग्रेसला कोणत्याही मोठ्या नेत्यांच्या सभा न होता व मोजक्याच जागा लढवूनही चांगले यश मिळाले. त्यामुळे कार्यकर्त्यांत फील गुडचे वातावरण आहे.

गेलेले परत येणारच

काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले हे नक्कीच परत येणार यात काहीच शंका नाही. जनतेला दिलेली आश्वासने भाजपने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे काँग्रेसवर जनतेने विश्वास टाकला हे या राज्यामधील निकालानंतर स्पष्ट झाले आहे. पक्षाला नक्कीच आता चांगले दिवस येतील. दीप चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

Post a comment

 
Top