0
चंद्रपूर जिल्ह्यात दुर्गम भागात गाव : जवळपास दोन-अडीच किलोमीटरपर्यंत नाही एकही शाळा

रोके से ना रूके हम|

मर्जी से चले हम

बादल सा बरसे हम।
सूरज सा चमके हम...स्कूल चले हम...


नागपूर- दूरदर्शनवर सर्व शिक्षा अभियानाच्या प्रचारार्थ एकेकाळी गाजलेल्या या गीताने एका पिढीच्या मनात घर केले होते. शिक्षणापासून एकही घटक वंचित राहू नये म्हणून हे सर्वशिक्षा अभियान देशात राबवण्यात आले. यातून अनेक नवसाक्षर घडले आणि आज यातून काही पिढ्या सुशिक्षित, उच्चशिक्षित झाल्या. ज्या जिद्दीतून हे साध्य झाले ती जिद्द आजही कायम आहे. चंद्रपूर जिल्ह्यात फक्त दोन सख्ख्या बहिणींसाठी सुरू असलेली जिल्हा परिषदेची एक शाळा हे अशाच जिद्दीचे प्रतीक आहे. विशेष म्हणजे शाळेसाठी गावातील सुरेश कुळमेथे यांनी जमीन दान दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील आदिवासी बहुल टोमटा येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची संख्या आहे फक्त दोन. त्याही सख्ख्या बहिणी आहेत. या दोघींना शिकवायला एक शिक्षक आहे. दोनच विद्यार्थी असूनही शाळा सुरू कशी, हा प्रश्न अनेकांना पडेल. मात्र, याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे सांगतात, 'शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये ही शाळा सुरू ठेवली.' टोमटा हे दुर्गम आणि अदिवासीबहुल असे अवघ्या १२ घरांचे गाव. सरकारच्या धोरणानुसार एक किमी परिसरातील शाळेत कमी पटसंख्या असलेल्या शाळा समाविष्ट करून विद्यार्थी तिथे एकत्र पाठवण्यात येतात. मात्र टोमटा भागात दोन ते अडीच किमी परिसरात एकही शाळा नसल्यामुळे ही शाळा सुरू ठेवल्याचे जि. प. अध्यक्षांनी सांगितले.

गावकऱ्याने दान केलेल्या जमिनीवरील शाळेत व्रत शिक्षण प्रसाराचे
शाळा सुरू राहावी यासाठी गावातील सुरेश कुळमेथे यांनी जमीन दान दिली. २८ वर्षांपासून शाळा सुरू असून सुरुवातीला २ शिक्षक व २० विद्यार्थी होते. कालांतराने कमी होत गेले. १९९२ मध्ये २ शिक्षक व २४ विद्यार्थी होते. २०११ पासून २ शिक्षक व चार विद्यार्थी होते. सद्यस्थितीत एक शिक्षक व दोन विद्यार्थी आहेत.

आता भाऊ घेणार प्रवेश
वर्ग १ ते ५ पर्यंतच्या टोमटाच्या शाळेची पटसंख्या दोनच आहे. प्राची जीवनदास कुळसंगे ही चौथीत तर तिचीच बहीण समीक्षा दुसरीत आहे. या दोघींना शिकवायला शाळेत आनंदराव मडावी हे शिक्षक आहेत. या बहिणींनी शाळा सोडली तर शाळेला कुलूप लागू शकते, अशी स्थिती आहे. मात्र, अंगणवाडीतील ४ मुलांपैकी समीर कुळसंगे हा पुढील वर्षी जि. प. शाळेसाठी भरतीपात्र ठरत आहे. समीर या दोघींचा लहान भाऊ आहे. तो शाळेत दाखल झाला तर ही तिघे भावंडेच शाळेत असतील.

जपानमध्ये एका मुलीसाठी धावायची रेल्वे
प्रवासीच नसल्याने जपानमधील कामी-शिराताकी नामक रेल्वे स्टेशन संपूर्ण रेल्वे लाईनसह बंद केले जाणार होते. मात्र, 'काना हाराडा' नावाची एक मुलगी येथील ट्रेनमधून एकटीच शाळेत जात असल्याचे तेथील सरकारला समजले. त्यामुळे जपान सरकारने तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत ती रेल्वे बंद न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, तिच्या शाळेच्या वेळेप्रमाणे रेल्वेचे वेळापत्रक ठेवले. २०१६ साली काना हाराडाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच ती रेल्वेसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली.School: one school only two sisters in Tomato village in extremely remote areas

Post a comment

 
Top