आपल्या विचारात मतभेद असल्यामुळे मी आपल्या पदाचा राजीनामा देत आहे.-जिम मॅटिस
- वॉशिंग्टन- अमेरिकेने सिरियामधून सैन्य मागे घेण्याचा निर्णय नुकताच घेतला. यासंदर्भात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांनी राजीनामा दिला आहे. ट्रम्प यांच्या विचारांशी मतभेद झाल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे मॅटिस यांनी दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लिहिलेल्या पत्रात मॅटिस यांनी म्हटले आहे की, तुमच्या विचारांशी सहमत असणारा संरक्षणमंत्री ठेवण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. आपल्या विचारात मतभेद असल्यामुळे मी आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. मॅटिस यांनी राजीनामापत्रात सिरियातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याच्या निर्णयास विराेध केला आहे. त्यांनी ट्रम्प यांच्या परराष्ट्र नीतीवर टीका केली आहे. रशिया आणि चीनसारख्या विराेधी देशांसाठी अमेरिकन मित्रराष्ट्रांचे महत्त्व मॅटिस यांनी विशद केले आहे. त्यांनी आपल्या पत्रात कुठेही ट्रम्प यांचे काैतुक केले नाही. दुसरीकडे ट्रम्प यांनी मॅटिस यांचा राजीनामा म्हणजे सेवानिवृत्ती असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेच्या निर्णयावर प्रतिक्रिया देण्यास नकार
सिरियात संयुक्त राष्ट्राचे विशेष राजदूत असलेले स्टफन डी मिस्तुरा यांनी अमेरिकेच्या निर्णयावरून प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले, सिरियातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे. परंतु राजकीय व लष्करी दाेन्ही बाजूने त्यावर अद्याप प्रतिक्रिया देणे घाईचे ठरले.
Post a Comment