0
अपार्टमेंटसमोर उभी करण्यात आलेली कार चोरटय़ांनी ढकलून नेऊन पळविल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री नानावाडी येथे घडला आहे. सदर प्रकारामधील चोरटय़ांची छबी सीसीटीव्हीमध्ये सामोरी आली आहे. शहरातील वाढत्या चोरीच्या प्रकारांबाबत पोलीस यंत्रणेने दक्षता घेण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे.
मराठा कॉलनीतील एमराल्ड कॉर्नर अपार्टमेंटसमोर हा चोरीचा प्रकार घडला आहे. अपार्टमेंटमधील रहिवासी नारायण सावंत यांच्या मालकीची असणारी प्रिमियर पद्मिनी कार चोरटय़ांनी पळवून नेली आहे. शुक्रवार रात्री सदर कार (क्र. केए 22 एम. 0451) चोरटय़ांनी ढकलून बाहेर काढली आणि पळविली असल्याचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
शनिवारी सकाळी हा चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर नारायण सावंत यांनी टिळकवाडी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. आसपासच्या परिसरात कारचा शोध घेण्यात आला. मात्र कारचा शोध लागला नाही. चोरटय़ांनी कार चोरीचा हा नवा फंडा अवलंबिला असल्यामुळे नागरिकांतून सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.

Post a Comment

 
Top