0
बीडमधील थरार : महाविद्यालयातून पेपर देऊन बाहेर पडताच डाव साधला

बीड - तीन वर्षांपुर्वी आलेल्या सैराट चित्रपटाने समाजातील एक कटू वास्तव जगासमोर मांडले. प्रेमविवाहाला आजही आपल्या समाजाने पुर्णपणे स्विकारलेले नाही. आजही अनेक ठिकाणी ऑनर किलिंगच्या घटना पाहायला मिळतात. अशीच एक थरकाप उडवणारी घटना बीडमध्ये घडली आहे. सैराट चित्रपटाची आठवण देणा-या या घटनेत तथाकथीत 'प्रिन्स' दादाने प्रेमविवाह केलेल्या बहिणीच्या पतीची भर रस्त्यात हत्या केली आहे. बहिणीने घरच्यांचा विरोध पत्करून प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून भावाने तिच्या प्रियकर पतीस भररस्त्यात चाकूचे सपासप नऊ वार करून ठार केले. एखाद्या सिनेमात शोभावा असा थरार बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता शहरातील आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील नाळवंडी रोडवर घडला. बहिणीने भावाला रोखण्यासाठी धावा केला, आरडाओरड केली. पण अंगात सैतान संचारलेल्या भावाने बहिणीचे कंकू पुसूनच घटनास्थळ सोडले. सुमित वाघमारे (२५, मूळगाव तालखेड, ता. माजलगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. आरोपी बालाजी लांडगे व संकेत वाघ या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.

बीड शहरातील आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्राॅनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेला सुमित वाघमारे याची वर्गातील भाग्यश्री लांडगे हिच्याशी मैत्री झाली होती. याच मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन दोनच महिन्यांपूर्वी त्यांनी प्रेमविवाह केला होता. मात्र या विवाहाला भाग्यश्रीचा भाऊ बालाजी याचा विरोध होता. दरम्यान, भाग्यश्री आणि सुमित यांचा बुधवारी शेवटच्या वर्षातील सातव्या सेमिस्टरची परीक्षा होती. दुपारी २ ते ५ अशी पेपरची वेळ होती. पेपर संपल्यानंतर दोघेही ५.१५ वाजता परीक्षा खोलीतून बाहेर पडले. दुचाकीने ते घराकडे जात होते. महाविद्यालयापासून थोड्याच अंतरावर असलेल्या नाळवंडी रोडवर बालाजी लांडगे कारमध्ये बसून दोघांची वाट पाहत होता. भाग्यश्री आणि सुमित तेथे पोहोचताच बालाजीने त्यांना अडवले. मित्र संकेत वाघ आणि बालाजीने भाग्यश्री आणि सुमित यांना वेगळे करून सुमितच्या शरीरावर धारधार शस्त्राने नऊ वार केले. या वेळी भाग्यश्रीने भावाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण ती कमी पडली. सुमितला रक्ताच्या थारोळ्यात सोडून बालाजी आणि संकेत कारने पसार झाले.

विवाहाला होती घरच्यांची हरकत
तालखेड (ता. माजलगाव) येथील सुमित वाघमारे हा बीड शहरातील त्याच्या मावशीकडे शिक्षणासाठी राहत होता. त्याने बीड शहरातील इंजिनिअरिंग महाविद्यालयात इलेक्ट्राॅनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम निवडला हाेता. या दाेघांच्या विवाहास भाग्यश्रीच्या कुटुंबाकडून विराेध हाेता. त्यांचा विरोध झुगारून दाेघांनी दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता.

तीनच मिनिटांत नऊ वार केले
बुधवारी संध्याकाळी कारने आलेला भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगे हा अादित्य इंजिनिअरिंग महाविद्यालयासमाेरील नाळवंडी राेडवर दोघांची काळासारखी वाट पाहत थांबला होता. हे दाेघे परीक्षा देऊन दुचाकीने महाविद्यालयाच्या बाहेर निघाले. दोघांची दुचाकी नाळवंडी राेडच्या दिशेने वळताच भाग्यश्रीचा भाऊ व मित्र कारमधून बाहेर अाले. त्यांना अडवून तीनच मिनिटांत बालाजी याने धारदार शस्त्राने सुमितवर नऊ वार केले. बालाजी जमिनीवर कोसळताच दोघेही कारने पसार झाले.

रिक्षाचालकाने नेले रुग्णालयात
परिसरातील एका रिक्षाचालकाने सुमित व भाग्यश्रीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सुमितच्या शरीरातून माेठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला हाेता. त्यामुळे रुग्णालयात पाेहोचल्यानंतर डाॅक्टरांनी त्यास मृत झाल्याचे जाहीर केले.

पोलिसांचे दंगल नियंत्रण पथक
या घटनेची माहिती शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरल्याने जिल्हा रुग्णालयामध्ये माेठी गर्दी झाली होती. पोलिस उपाधीक्षक सुधीर खिरडकर यांनी रुग्णालय परिसरात येऊन जमाव नियंत्रणासाठी दंगल नियंत्रक पथकास पाचारण केले. या प्रकरणी पेठ बीड पाेलिस ठाण्यात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुटुंबीयांचा रुग्णालयात टाहाे
सुमीतचा खून झाल्याची माहिती मावशीसह तालखेड येथील कुटुंबीयांना कळताच त्यांनी काही वेळातच जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात सुमीतचा मृतदेह पाहताच त्याच्या कुटुंबीयांनी माेठा टाहाे फाेडला. सुमितचे नातेवाईक व जमाव नियंत्रणासाठी जिल्हा रुग्णालय परिसरात माेठा पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात अाला हाेता.

नाळवंडी राेड झाला सुन्न
बीड शहरातील तेलगाव नाका येथे अादित्य इंजिनिअरिंग महाविद्यालयाला अाहे. नाळवंडी राेडमार्गे महाविद्यालयाकडे रस्ता जाताे. विद्यार्थ्यांची गर्दी तसेच नाळवंडी राेडजवळ तेलगाव नाका चाैक असल्याने येथेही माेठी वर्दळ असते. सायंकाळी साडेपाचला घटना घडल्यानंतर काही मिनिटांतच नाळवंडी राेड सुन्न झाला.

बहिणीने दिली भावाविरुद्ध तक्रार
या प्रकरणी भाग्यश्री सुमित वाघमारे हिने पेठ बीड पाेलिस ठाण्यात बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पतीच्या खून प्रकरणी भाऊ बालाजी लांडगे आणि त्याचा मित्र संकेत वाघ यांच्यावविरोधात तक्रार दिली अाहे. या प्रकरणी पाेलिसांनी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

पाेलिसांचे पथक रवाना
खुनाची घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. याची माहिती पेठ बीड पाेलिसांना कळताच घटनास्थळी व जिल्हा रुग्णालय येथे पाेलिसांनी धाव घेतली. दरम्यान शिवाजीनगर शहर ठाण्याचे अधिकारी रुग्णालय परिसरात दाखल झाले. घटनेचा पंचनामा केला. फरार मारेकऱ्यांच्या शाेधासाठी पाेलिस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी पाेलिस पथके नियुक्त करून ती रवाना केली आहेत.
honor killing in beed, Sister's husband Murder by brother

Post a comment

 
Top