केशवराज विद्यालयातील विद्यार्थ्यांचा रंगला स्नेहमेळावा
लातूर- आता शाळेची ती इमारत नाही, ना तो वर्गही. सगळे वर्गमित्र-मैत्रिणीही कुठे असतील माहिती नाही. तरी, दोन-तीन वर्गमित्रांना कल्पना सुचली आणि ३५ वर्षांपूर्वीच्या दहावी बॅचची ती मुले-मुली एकत्र आणायचे ठरले. मग सुरू झाली फोन नंबर शोधण्याची मोहीम. सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नांनतर तेव्हाच्या सुमारे ८८ विद्यार्थ्यांपैकी ४८ जणांचे फोन आणि माहिती मिळाली आणि सर्वांना ओढ लागली भेटीची...
येथील केशवराज विद्यालयातील १९८३ मध्ये दहावी झालेल्या पन्नाशीतील या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच येथील गायत्री उत्सव कार्यालयात संपन्न झाला. कुणी मुंबई, कुणी पुणे, कुणी औरंगाबादला तर कुणी होते परदेशात. या सर्वांचा मेळ जुळवून सारे एकत्र आले आणि रंगल्या तेव्हाच्या बाकावरच्या आठवणी. ३५ वर्षांनंतर हे सारे भेटत होते. सोबतीला तेव्हाचे शिक्षकही होते.
लातूर येथील संजय अयाचित, उदय पाटील, गिरीश कानडे, मंजुषा उदगीरकर इत्यादींच्या पुढाकारातून पार पडलेल्या या स्नेहमेळाव्यात अप्पाराव कुलकर्णी, प्रफुल्ल कुलकर्णी, मुरलीधर दीक्षित, प्रभाकर जोशी, गोपाळराव कुलकर्णी हे तेव्हाचे शिक्षकही सहभागी होते.
शाळेतील आठवणींनी काही नि:शब्द, काहींचे डोळे पाणावले...
शाळेतील तेव्हाचे दादा-ताई आता ३५ वर्षांनंतर कुणी काका-काकू, तर कुणी आजी-आजोबा झाले आहेत. स्नेहमेळाव्यात एकमेकांना ओळखायचे कसे म्हणून शाळेत ३५-३८ वर्षांपूर्वी काढलेले ब्लॅक-अँड व्हाइट ग्रुप फोटो काही जण घेऊन आले होते. त्या सातवी, आठवीत असताना काढलेल्या फोटोंत स्वत:ला आणि नि:स्वार्थ मैत्रीचा धागा जोडणाऱ्या आपल्या वर्गमित्रांना शोधण्यात सारेच काही वेळ दंग झाले. शिक्षकांनीही शाळेतील आपली प्रार्थना आठवते का, असे विचारत या सर्वांकडून तेव्हाची प्रार्थना म्हणवून घेतली. या स्नेहमेळाव्यात आपला परिचय देऊन शाळेतील त्या गोड आठवणी सांगताना अनेकांचे डोळे पाणावले.

Post a Comment