0
  • मुंबई - सरकारने दुष्काळग्रस्तांसाठी जाहीर केलेली मदत त्यांना मिळते की नाही याचा जाब मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचारावा आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी सरकार काय करतेय ते आक्रमकपणे विचारावे, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मंत्र्यांना सोमवारी दिले. तसेच दुष्काळग्रस्त भागाचा आढावा घेऊन मदत करावी, अहवाल द्यावा. अहवालानंतर उद्धव ठाकरे स्वतः दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली.
    सोमवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली होती. सकाळी मुख्यमंत्र्यांबरोबर एका गाडीतून प्रवास केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी दुष्काळावरून सरकारला जाब विचारण्याचे आदेश दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
    बैठकीत ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना दुष्काळग्रस्त गावांचा आढावा घेण्याचे आदेश दिले. अनेक जिल्ह्यांत नागरिकांना भीषण दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागताहेेत. याच दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व मंत्र्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू करावे. सरकारने दुष्काळग्रस्त भागात जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी होतेय की नाही, याची माहिती घ्यावी. त्यासाठी कॅबिनेटमध्ये जाब विचारा, असे आदेश ठाकरे यांनी दिले.Uddhav Thackeray visits drought affected area
    आज राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक 
    शिवसेना मंत्र्यांचा दुष्काळग्रस्त गावांतील आढावा अहवाल आल्यावर उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त गावांचा दौरा करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दुपारी दोन वाजता शिवसेना भवन येथे पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार असल्याचे समजते.

Post a Comment

 
Top