0
अनिकेतचा मृतदेह घराजवळच जनावरांना पाणी पिण्यासाठी तयार केलेल्या हौदात १५ डिसेंबर रोजी मिळून आला होता

परळी- चांदापूर येथील नऊ वर्षीय अनिकेत गितेचा पाण्याच्या हौदात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दरम्यान, या प्रकरणाला शवविच्छेदन अहवालामुळे कलाटणी मिळाली आहे. त्याचा पाण्यात बुडून नव्हे, तर गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले आहे. परळी ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.

परळी तालुक्यातील चांदापूर येथील अनिकेत जगन्नाथ गिते या नऊ वर्षीय बालकाचा मृतदेह घराजवळच जनावरांना पाणी पिण्यासाठी तयार केलेल्या हौदात १५ डिसेंबर रोजी मिळून आला होता. ३ हजार लिटर क्षमतेचा हा हौद होता. घटना घडली तेव्हा अनिकेतचे कुटुंबीय घरी नव्हते. दरम्यान, या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद सुरुवातीला पोलिसांनी केली होती. मात्र, प्रकरणात सुरुवातीपासून कुटुंबीय आणि पोलिसांनाही हा खुनाचा प्रकार असल्याबाबत संशय होता.

परळी उपजिल्हा रुग्णालयात अनिकेतचे शवविच्छेदन करण्यात आले होते. नुकताच शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. यामध्ये अनिकेतचा मृत्यू पाण्यात बुडाल्यामुळे नव्हे, तर गळा आवळल्यामुळे झाल्याचे कारण देण्यात आले आहे. या अहवालानंतर प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. पोलिसांनी अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. अनिकेतच्या आई, वडिलांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
Aniket Gite's murder case

Post a Comment

 
Top