0
साक्री तालुक्यातील छडवेल पखरूण शिवारात हॉटेल कमलानंदमध्ये घडली घटना.

धुळे- साक्री तालुक्यातील छडवेल पखरूण शिवारात असलेल्या हॉटेलच्या व्यवस्थापकाला मारहाण करून लूटण्यात आले. त्यानंतर हॉटेलच्या आवारात उभ्या असलेल्या ट्रकमधील चालकावर चाकूने वार करण्यात येऊन त्यालाही लूटण्यात आले. हा प्रकार मध्यरात्री घडला. या घटनेत सुमारे २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबवण्यात आला. या वेळी लुटारूंनी फ्रिजमधील सुमारे दोन किलो मासे, बरण्यांमध्ये ठेवलेेले काजू व इतर वस्तू लुटल्या. या प्रकरणी साक्री पोलिसांत अज्ञात चार लुटारुंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साक्री तालुक्यातील छडवेल पखरूण शिवारात हॉटेल कमलानंद आहे. या हाॅटेलमध्ये पंडित काशिनाथ बैसाणे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. काल बुधवारी रात्री बैसाणे व वेटर रवींद्र ठाकरे नेहमीप्रमाणे कामात होते. या वेळी नेहमीचा ग्राहक असलेला सुरेश नामक चालक ट्रक घेऊन आला. हॉटेलमध्ये जेवण घेतल्यावर सुरेश ट्रकच्या केबिनमध्ये झोपी गेला. दुसरीकडे बैसाणे यांचे हिशेब करण्याचे काम सुरू होते. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चार जण आले. चाकू व सुरा काढून त्यांनी बैसाणे यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांनी गल्ल्यातील रोख रक्कम, फ्रिजमधील सुमारे दोन किलो मासे, बरण्यांमध्ये ठेवलेेले काजू व इतर वस्तू लुटल्या. त्यानंतर चौघांनी त्यांचा मोर्चा ट्रककडे वळविला. त्यानंतर ट्रकमध्ये चढून या टोळीने सुरेश यांच्या डाव्या पायावर चाकूने वार केले. तसेच मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाइल लुटून नेला.

त्यानंतर चौघे पसार झाले. घटनेनंतर साक्री पोलिसांना याविषयीची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी आले. या घटनेत सुमारे २३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबवण्यात आला. या प्रकरणी पंडित बैसाणे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चौघांविरुद्ध लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे होते लुटारू... 
चौघे लुटारू हे अंदाजे २० ते २२ वर्षे वयोगटातील होते. मराठीमिश्रित हिंदीतून ते बोलत होते. त्यापैकी एकाने लाल रंगाचा शर्ट घातला होता. तर इतरांनी जॅकेट परिधान केले होते. तिघे सडपातळ असल्याची माहिती बैसाणे यांनी पोलिसांना दिली आहे. त्यावरून पोलिसांनी संशयितांचे रेखाचित्र तयार करण्याचीही तयारी दर्शविली आहे.
दोघांना घेतले ताब्यात 
घटनेनंतर पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. शिवाय गुरुवारीही संशयितांचा शोध घेण्यात आला. बैसाणे यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे उशिरापर्यंत विचारपूस सुरू होती, अशी माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली.Crime news in Dhule

Post a Comment

 
Top