0
भारतामध्ये वास्तववादी चित्रपटांची लाट ही मृणालदांच्या 'भुवनशोम' (१९६९)मुळे आली.

  • मृणाल सेन यांनी त्यांच्या चित्रपटातून सरळ कथन कधीही केलं नाही. दृश्य गोठवणं, कट्स, जंपकट्स, अचानक पडद्यावर येणारी अक्षरं, अशा तंत्रामधून ते प्रेक्षकांना धक्का द्यायचे. त्याचं कौतुक झालं, तसंच 'कला नसलेली क्लृप्ती व तांत्रिक वैचित्र्य' असं म्हणून त्यांची हेटाळणीही केली गेली. ती टवाळी मृणालदा यांनी उपाधीसारखी स्वीकारली. सेन यांच्या कलागुणांचा अतुल देऊळगावकर यांनी घेतलेला वेध.....
    भारतामध्ये वास्तववादी चित्रपटांची लाट ही मृणालदांच्या 'भुवनशोम' (१९६९)मुळे आली. अनेक तरुण दिग्दर्शकांना अभिव्यक्ती सापडली. 'भुवनशोम'चा हा झंझावात सगळे मान्य करतात. १९६९ मध्ये देशभर बेकारीचा असंतोष उसळला होता. नक्षलवाद्यांनी सशस्त्र क्रांतीची ललकारी ठोकली. या अशांत पर्वाचं चित्रण मृणालदांनी 'इंटरव्ह्यू', 'कलकत्ता-७१', 'पदातिक', 'कोरस' या चित्रपटातून केलं. 'कलकत्ता-७१' मध्ये तर दारिद्र्याचं विश्लेषण करून 'शत्रूला ओळखा व पेटून उठा' असं आवाहन केलं. कोलकात्यामध्ये त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. चित्रपटगृहांत बंगाली प्रेक्षक उत्स्फूर्तपणे 'जुगजुग जिओ मृणाल सेन!' अशा घोषणा द्यायचे. असं प्रेम इतर कुठल्याही दिग्दर्शकाच्या वाट्याला आलं नाही. चित्रपट समीक्षक मात्र 'जुजबी विश्लेषण', 'कला नव्हे प्रचार' अशी टीका करायचे. कित्येक समीक्षकांनी सत्यजित राय यांना कलावादी, तर मृणाल सेन यांना जीवनवादी ठरवून टाकलं होतं.
    १९७५ मध्ये त्यांनी 'मृगया'मधून मिथुन चक्रवर्तीकडून अभिनय करून घेतला. निवेदनाकरिता अमिताभ बच्चन यांचा आवाज वापरला. त्यानंतर अमिताभ यांनी त्यांच्या चित्रपटात भूमिका करण्याची इच्छा अनेक वेळा बोलून दाखवली. मृणालदांचं 'तुमच्यासाठी साजेसे व योग्य पात्र दिसताच सांगेन' हे उत्तर ठरलेलं होतं. 'मृगया'नंतर त्यांना धर्मेंद्र व हेमामालिनी यांची भूमिका असणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी ७५ लाख रुपये मानधन देऊ केले होते. सेन यांनी नकार देताना यत्किंचित विलंब लावला नाही.
    १९७९ मध्ये 'एक दिन प्रतिदिन' आला. 'अकालेर संधाने' (दुष्काळाच्या शोधात )-१९८०, 'खारिज' (बंद केलेला खटला)-१९८२, 'खंडहर' (भग्नावशेष) -१९८३ या चित्रपटांमधून मृणालदांमध्ये झालेला कायापालट स्पष्ट जाणवतो. आता ते चित्रपटातून 'शब्देवीण संवाद' साधू लागले. सखोल आणि परिपक्व मानवी दर्शन होऊ लागले, असं त्यांचे टीकाकारही मानू लागले. थेट आवाहन करणाऱ्या स्वतःच्या चित्रपटाबद्दल मृणालदा म्हणाले, "मला वाटतं, त्या काळात माझ्या चित्रपटात आक्रस्ताळेपणा, गोंगाट असायचा. ओढूनताणून आशावाद होता. असं म्हणून मी सुटका करून घेत नाही. असंतोषाचं वारं जोरात होतं, मी मनानं त्यात पूर्णपणे गुंतलो होतो. शिवाय सगळ्या घटनांबाबत आपण आशावादी असलंच पाहिजे, असा अट्टहासही त्यात होता. १९७९ पासून मी स्वत:ला खरवडायला लागलो. सतत स्वत:ला तपासणं कमालीचं त्रासदायक आहे. हे, स्वत:चे केस धरून, आरशासमोर उभं करत स्वतःचा झाडा घेण्यासारखं आहे. त्यातूनच स्वत:ला आणि आजूबाजूच्यांना समजावून घेण्याचा प्रयत्न आहे. आता काळ्या पांढऱ्यात काही काढता येत नाही.''
    'खंडहर' मध्ये वरवर पाहिलं तर प्रेमकथा आहे आणि तशी अनेकांनी टीकाही केली. पण तिथंच न थांबता आणखी खोल गेलो तर .. आपलं जगणं त्यात दिसेल. आपली वास्तवाला सामोरं जाण्याची हिंमत नसते म्हणून आपण अतिवास्तवात (फँटसी) जगू पाहतो. वास्तव घटनेपासून दूर जाऊन कल्पनेत वा स्वप्नात वावरतो. 'खंडहर' मधील मोडकळीला आलेल्या घरातील आई (गीता सेन) व मुलगी (शबाना आझमी) या दोघींचीही एकच आशा आहे, लहानपणी लग्न झालेला नवरा कधी तरी येईल. हाच त्यांच्या जगण्याचा आधार आहे. तो नवरा त्या हवापालटासाठी आलेल्या छायाचित्रकारात (नसिरुद्दीन शहा) पाहतात. ही दुबळी आशा त्यांना अजूनच दुबळी करते. शेवटी त्याचं लग्न झालंय हे समजल्यावर ती आशा मरते. त्यातूनच त्यांना उभारी मिळते. आईलाही मुलीचं लग्न हवंही आहे आणि नकोही. धरवत नाही आणि सोडता येत नाही, अशी दोघींचीही अवस्था आहे. भास्कर चंदावरकरनं अप्रतिम संगीत दिलेल्या चित्रपटांपैकी हा एक आहे. चित्रपटातील भाव संगीतामुळे अधिक सघन कसे होऊ शकतात, याचा तो उत्तम नमुना आहे.
    'खारिज' या चित्रपटात, मुलाला सांभाळण्यासाठी; एक मध्यमवर्गीय जोडपं गडी म्हणून मुलगा आणतात. एका रात्री प्रचंड थंडी पडल्यावर तो जिन्याखालची नेहमीची जागा सोडून स्वयंपाकघरात झोपायला जातो. शेगडीची ऊब घेऊन झोपतो त्यात ताे मृत हाेताे मात्र झोपडपट्टीवासीय विरुद्ध मध्यमवर्गीय असं वातावरण पेटतं. शेवटी मुलाचे वडील अंत्यसंस्कार करून येतात. मालकाला भेटायला निघतात. नमस्कार करून निघून जातात. त्यानं थप्पड मारावी असं तुम्हाला वाटतं, कारण तुमचा पश्चात्ताप, अपराधीपणाची भावना हलकी होईल. तुम्ही मध्यमवर्गीयाच्या जागी स्वत:ला समजता. हे चापट मारणं दाखवता आलं असतं, ते क्रांतिकारकही वाटलं असतं, पण ते वास्तव झालं नसतं.'' हा चित्रपट पाहून नोबेलने सन्मानित गॅब्रियल गार्सिया मार्क्वेझ मृणालदांना म्हणाले, "अफलातून! हादरवून टाकलंस.''
    राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सन्मान 
    चार चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार, चार उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पुरस्कार 
    मॉस्को, बर्लिन, कान्स, शिकागो व कैरो चित्रपट महोत्सवात १२ पुरस्कार 
    १९७९ सोव्हिएत युनियन कडून 'नेहरू सोविएत लँड अॅवॉर्ड' 
    १९८१ पद्मभूषण 
    १९८५ फ्रान्स सरकारकडून 'कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स' सन्मान 
    १९८९ ते २००३ राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नेमणूक 
    २००० रशियन फेडरेशनकडून 'ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप' 
    २००५ दादासाहेब फाळके सन्मान.
    मृणाल सेन यांचे चित्रपट 
    १) रातभोर १९५५ 
    २)नीले आकाशेर नीचे १९५८ 
    ३) बैशे त्रावण १९६० 
    ४) पुनश्च १९६१ 
    ५) अबाशेषे १९६३ 
    ६) प्रतिनिधी १९६४ 
    ७)आकाशकुसुम १९६५ 
    ८) माटीर मनिषा १९६६ 
    ९) भुवनशोम १९६९ 
    १०) इंटरव्ह्यू १९७० 
    ११) इच्छापूरण १९७० 
    १२) एक अधूरी कहानी १९७१ 
    १३) कलकत्ता 71 १९७१ 
    १४) पदातिक १९७३ 
    १५) कोरस १९७४ 
    १६) ओका उरी कथा १९७७ 
    १७) परशुराम १९७८ 
    १८) एक दिन प्रतिदिन १९७९ 
    १९) अकालेर संधाने १९८० 
    २०) चलच्चित्र १९८१ 
    २१) खारिज १९८२ 
    २२) खंडहर १९८३ 
    २३) तस्वीर अपनी अपनी १९८४ 
    २४) जेनेसिस १९८६ 
    २५) दस साल बाद १९८६ 
    २६) एक दिन अचानक १९८६ 
    २७) महापृथ्वी १९९१ 
    २८) अंतरीन १९९३ 
    २९) आमार भुवन २००२Article about 'Mrinal Sen'

Post a Comment

 
Top