0
खोलीत गेल्यानंतर अवघ्या दीड तासात झाला मृत्यू

औरंगाबाद- डॉ. आकांक्षा देशमुख खून प्रकरणात पाचव्या दिवशी महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिस तपासात बांधकामासाठी परराज्यातून आलेला एक तरुण मजूर घटनेच्या दिवशी सकाळपासून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. काही संशयितांनादेखील ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे पहिल्या दिवसापासून आकांक्षाच्या खोलीपासून काही अंतरावर एक उघडा पत्रा आढळून आला होता. त्यातूनच आरोपी आला असावा, असा संशय तपास पथकातील पोलिसांना आहे.

एमजीएम शिक्षण संस्थेत फिजिओथेरपीचे शिक्षण घेणाऱ्या डॉ. आकांक्षा देशमुख (२२) हिचा मृतदेह मंगळवारी गंगा वसतिगृहातील तिच्या खोलीत आढळला होता. बुधवारी घाटी रुग्णालयातून मिळालेल्या शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. परंतु हा खून की आत्महत्या? यात पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. प्रकरण गंभीर असल्याने सिडको पोलिसांसह पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली. आतापर्यंत ७० पेक्षा अधिक जणांचे जवाब नोंदवण्यात आले. वसतिगृहाच्या मागील बाजूस दुसऱ्या वसतिगृहाचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी परराज्यातून जवळपास ८० ते १०० मजूर आले होते. यातील एक मजूर घटनेच्या दिवसापासून बेपत्ता असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे तो मंगळवारी सकाळपासूनच बेपत्ता असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही संशयितांनादेखील शनिवारी सकाळपासून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासाला वेग आला असून उघड्या पत्र्याच्या दिशेनेच तपास सुरू झाला आहे.

डॉक्टर म्हणाले, खूनच
मृतदेह हलवल्याने आकांक्षाच्या मृतदेहाची स्थिती व घटनास्थळाचे चित्र पोलिसांना पाहता आले नव्हते. त्यामुळे मृत्यू कोणत्या अवस्थेत झाला असेल हे तपासण्यासाठी दुसऱ्या दिवशी घाटीतील डॉक्टरांच्या पथकाला बोलावण्यात आले होते. शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले होेते. परंतु त्यानंतरही पोलिस संभ्रमात असताना डॉक्टरांनीदेखील हा खूनच असल्याचे मत नोंदवले आहे.


मजुराच्या वडिलांना घेतले ताब्यात :

आकांक्षाच्या खुनानंतर बेपत्ता झालेल्या मजुराच्या वडिलांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो कोठे गेला, खून प्रकरणात त्याचा काही हात आहे का, याचा तपास सुरू आहे. तो मजूर सापडल्यानंतरच ठोस माहिती मिळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

खोलीत गेल्यानंतर अवघ्या दीड तासात झाला मृत्यू
आकांक्षाच्या मृत्यूनंतर तत्काळ मृतदेह हलवल्याने पोलिसांना तपासात अडथळा निर्माण झाला. तिचा मृतदेहदेखील कुजण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे तिच्या मृत्यूची नेमकी वेळ कळण्यास अडचणी आल्या. परंतु डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत आकांक्षाचा मृत्यू रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, रात्री ११.३० वाजता आकांक्षा दुसऱ्या मजल्यावरील खोलीत जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यानंतर अवघ्या दीड ते दोन तासांत तिचा खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे.Anaksha murder case MGM college in Aurangabd

Post a comment

 
Top