0
केळीच्या फायबरपासून चलनासाठी लागणाऱ्या कागदाची निर्मिती; देशातील पहिल्या दहा अभिनव प्रकल्पांमध्ये निवड

नागपूर- केळीच्या फायबरपासून (तंतू) चलनासाठी लागणारा कागद तयार करण्यात येत आहे. जळगावच्या ताप्ती व्हॅली केळी प्रक्रिया आणि उत्पादने सहकारी सोसायटीतर्फे केळीच्या खोडापासून मूल्यवर्धित उत्पादने घेण्याचा देशातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. केंद्र सरकारतर्फे निवडण्यात आलेल्या देशातील दहा कल्पक आणि अभिनव प्रकल्पांत या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर याचे सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती ताप्ती व्हॅली केळी प्रक्रिया आणि उत्पादने सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष डाॅ. रमेश चौधरी यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेने (सिरकाॅट) सोसायटीला ८० लाख टन फायबर पुरवण्याचे कंत्राट दिले असल्याची यापैकी ४० लाख टन फायबरचा पुरवठा करण्यात आला असून सिरकाॅटला केळीच्या तंतूंपासून कागदी चलनासाठी लागणारा कागद तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. मुरादाबाद येथे केळीच्या तंतूंचा लगदा तयार करण्यात आला आहे. त्यापासून कागदी चलनासाठी कागद तयार करण्याचे काम म्हैसूर येथील केंद्र सरकारच्या मिलमध्ये सुरू असल्याचे “सिरकाॅट’चे संचालक डाॅ. एस. के. शुक्ला यांनी सांगितले.


केळी उत्पादनात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो. राज्यात ७१ हजार ७२ हेक्टरमध्ये केळी लागवड होते. यातील ५५ ते ६० हजार हेक्टर लागवड एकट्या जळगाव जिल्ह्यात होते, तर उत्पादन ५५ ते ६० लाख दशलक्ष टन इतके आहे. तीन ते साडेतीन लाख लोकांचा उदरनिर्वाह केळी उत्पादनावर चालतो, असे डाॅ. चौधरी यांनी सांगितले.


खोडांमुळे होणारे प्रदूषण टळणार
घड कापल्यानंतर केळीची खोडे शेतकरी कापून बांधावर टाकून देत होते. कालांतराने ते सुकल्यानंतर जाळून टाकत होते. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत होती. पण आता केळीच्या खोडातील पाण्यापासून सेंद्रिय द्रवरूप खत निर्मितीमुळे शेतकरी ते जाळत नाहीत. त्यामुळे प्रदूषणाला आळा बसला आहे. हे द्रवरूप खत २०० ते ३५० रुपये लिटरने विकले जाते. एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे ३८ लाख ५० हजार दशलक्ष टन केळीची खोडे बांधावर फेकून नंतर जाळण्यात येत होती. केळीची खोडे उपटून बांधावर टाकण्यासाठी ३ ते ४ रुपये मजुरी द्यावी लागायची. आम्ही शेतकऱ्याला खोडामागे १० रुपये देतो. एका टनात ३५० ते ४०० खोडे बसतात.

केळीच्या खोडापासून विविध मूल्यवर्धित अॅडेड उत्पादनांची निर्मिती करण्यावर भर
महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बांबू, केळी, अंबाडी, घायपात व नारळाचे उत्पादन घेण्यात येते. या फळझाडांपासून तंतू निर्मिती व तंतूंपासून कापड निर्मितीसह विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. तंतू म्हणजेच फायबरपासून विविध मूल्यवर्धित उत्पादने निर्मिती तसेच प्रक्रिया उद्योग उभारण्यावर भर देण्यात येत आहे. त्या अंतर्गत केळीच्या खोडापासून मूल्यवर्धित उत्पादने घेण्यात येत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून या प्रकल्पासाठी २ कोटी ४२ लाख अनुदान मिळाले असून नाबार्डकडून १ कोटी ५३ लाखांचे कर्ज काढल्याचे डाॅ. चौधरी यांनी सांगितले. याशिवाय नाबार्डने केळीच्या खोडापासून निर्मित वस्तूंच्या मार्केटिंगसाठी २८ लाख रुपयांचे अनुदान दिले आहे.
Making of paper using banana fiber in Nagpur

Post a Comment

 
Top