0
घातपाताचा संशय शवविच्छेदनावरून वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तासभर तणाव

जळगाव- घरात झोक्याच्या दोरीला गळफास लागलेल्या अवस्थेत एका युवकाचा मृतदेह आढळला. दरवाजे उघडे असल्यामुळे तसेच तरुणाचे दाेन्ही पायाचे गुडघे जमिनीवर टेकलेले असल्याने हा घातपात असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला. हरीविठ्ठलनगरात शनिवारी सकाळी ७ वाजता हा प्रकार उघडकीस आला. संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. हा तरुण मित्रांच्या लग्नासाठी जळगावी आला होता.

दीपक भरत गावंडे (वय २६, रा. हरिविठ्ठलनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. जामनेर तालुक्यातील करमाळ येथील मूळ रहिवासी असलेले गावंडे कुटंुबीय काही वर्षांपासून हरीविठ्ठलनगरात राहतात. तर २२ नोव्हेंबर २०१८पासून ते नंदुरबार येथे राहण्यासाठी गेले होते. दीपक याचा मोठा भाऊ नीलेश, वहिणी दोघे शिक्षक असल्यामुळे सर्व कुटुंबीय नंदुरबार येथे कायमस्वरुपी राहण्यासाठी गेले होते. दीपक हा आरटीओ कार्यालयात वाहनचालक म्हणून काही दिवस काम करीत होता. दरम्यान, ताे देखील नंदुरबार येथे गेला होता. १८ डिसेंबर रोजी दीपकचा मित्र नवल याचे लग्न असल्यामुळे तो दोन दिवसांपासून जळगावी आला होता. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत त्याने नवलच्या लग्नपत्रिका वाटप केल्या. रात्री हरीविठ्ठल येथील घरात एकटाच झोपण्यासाठी गेला होता. यानंतर शनिवारी सकाळी ७ वाजता शेजारी राहणारा एक लहान मुलगा पाण्याची मोटार मागण्यासाठी दीपककडे गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घरात झोक्यासाठी बांधलेल्या दोरीने त्याचा गळा आवळलेला होता. दोन्ही पायाचे गुडघे जमिनीवर टेकलेले होते. गळ्यावर गळफासाचे दोन व्रण दिसून येत होते. तसेच घराचे दोन्ही दरवाजे उघडेच होते. या परिस्थितीमुळे दीपक सोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. रामानंदनगर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला होता. दुपारी ४.३० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अरुण पाटील तपास करीत आहेत.

दीपक अविवाहित, तणावात नव्हता
दीपक हा सधन कुटुंबातील अविवाहित युवक होता. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा ताण-तणाव नव्हता. आत्महत्या करावी? असे कोणतेही ठोस कारण नव्हते. त्यामुळे त्याने आत्महत्या केली नसून घातपात झाला आहे, अशी शक्यता कुटुंबियांनी व्यक्त केली. दुपारी १.४५ वाजता दीपकचे आई-वडील, भाऊ व इतर नातेवाईक रुग्णालयात पोहाेचले. त्यांनी धुळ्यातील वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्याची मागणी केली होती. या मुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. अखेर वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय बिरासदार यांनी समजूत काढल्यानंतर जळगावातच शवविच्छेदन करण्यात आले.

आईचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश
दीपकची आई आशाबाई ह्या दुपारी रुग्णालयात पोहचल्या. आजारी असल्यामुळे त्यांच्यावर जळगावात उपचार करण्यात आले. आजारपणामुळे त्यांना उभे राहता येत नव्हते. तशाच अवस्थेत त्यांनी रुग्णालय गाठले. मुलाचा मृतदेह पाहताच त्यांनी प्रचंड आक्रोश केला. त्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले होते. आपल्या आजारपणात दीपकने खूप कष्ट घेऊन सुश्रूशा केली होती, असे त्यांनी आक्रोश करताना सांगितले.

मित्रांनाही धक्का
मित्राच्या लग्नासाठी दीपक जळगावात आला होता. लग्नात एन्जॉय करण्याच्या तयारीत सर्व मित्र होते. दीपक पत्रिका वाटप करीत होता. उत्साहाचे वातावरण असताना अचानक त्याच्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच दीपकच्या मित्रांनी रुग्णालयात गर्दी केली होती. अनेकांना अश्रू अनावर झाले होते.Suspicious death of a youth in Jalgoan

Post a comment

 
Top