0
महापालिकेतील प्रकार सहायक अभियंत्यांनी समजूत घातल्याने वादावर पडदा

जळगाव- महापालिकेत अाधीच मक्तेदारांची काेट्यवधी रुपयांची देणी असल्याने नवीन कामांसाठी काेणी पुढे यायला तयार नाही. त्यात झालेल्या कामांच्या बिलासाठी अडवणुकीचा नवीन मुद्दा चर्चेचा ठरत अाहे. २५ कोटींतून मंजूर पुलाच्या कामाच्या बिलावर स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ केल्याच्या कारणावरून गुरुवारी दुपारी १ वाजता मक्तेदाराचा शहर अभियंत्यासोबत वाद झाला. स्वाक्षरी न करताच अभियंता निघून गेल्याने मक्तेदाराने थेट जिन्यात फाइल फेकून दिल्याने वातावरण चांगलेच तापले हाेते.


दाेन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या २५ काेटींच्या निधीतून शहरातील पुलांच्या कामाचा कंत्राट देण्यात अाला हाेता. पुलाचे काम हाेऊन दीड महिना लाेटला अाहे. या कामाचे बिल मिळावे म्हणून मक्तेदार राहुल धांडे हे गेल्या काही दिवसांपासून पालिकेत चकरा मारत अाहेत. लिपिकापासून थेट अायुक्तांपर्यंत स्वाक्षरी हाेऊन अंतिम स्वाक्षरीसाठी फाइल घेऊन मक्तेदार धांडे हे दुपारी १२ वाजता प्रभारी शहर अभियंता डी. एस. खडके यांच्या कार्यालयात गेले हाेते. तासभर प्रतीक्षा केल्यानंतरही खडके यांनी धांडे यांना दालनात बाेलावले नाही. साहेब अाता बाेलावतील तेव्हा बाेलावतील म्हणून प्रतीक्षेत असलेल्या धांडे यांना खडके यांनी बाेलावलेच नाही. दुपारी १ वाजेच्या सुमारास अभियंता खडके हे कार्यालयाबाहेर पडले. या वेळी धांडे यांनी नवव्या मजल्यावरील लिफ्टसमाेर फाइलवर स्वाक्षरी करण्याची विनंती केली; परंतु खडकेंनी अर्जंट बाहेर जात असल्याने सायंकाळी या अशी सूचना केल्याने मक्तेदार धांडे संतापले. काम करूनही बिलासाठी फिरवाफिरव करणे याेग्य नाही म्हणत खडकेंवर राेष व्यक्त केला.

बिलाची फाइल फेकली
विनंती केल्यानंतरही धांडेंकडे लक्ष न देता खडके निघून जात असल्याने वाद वाढला. शुक्रवारी घरी हळीदाचा कार्यक्रम अाहे. पैशांची गरज अाहे. तुम्ही सही केल्यास मला तातडीने बिलाची रक्कम मिळेल अशी विनवणी धांडे करत हाेते; परंतु अभियंता खडके यांनी सायंकाळी स्वाक्षरी झालेली फाईल घेऊन जा असे म्हणत सरळ खालच्या मजल्यावर उतरून गेले. त्यामुळे संतापलेल्या मक्तेदार धांडे यांनी जाेरजाेरात अारडाअाेरड सुरू केली. नाहक अडवणूक केली जात असल्याचा अाराेप करत मक्तेदारांना स्वत:ची बिले काढण्यासाठी फाइल फिरवावी लागते. केलेल्या कामाचे पैसे हवेत अशा भावना व्यक्त करत खडकेंच्या मागे जिना उतरत हातातील फाइल जमिनीवर फेकून देत तीव्र भावना व्यक्त केल्या.

कार्यालयाबाहेर पडल्यानंतर मक्तेदार धांडे भेटले
अाराेप चुकीचे अाहेत. कामाच्या बिलावर सात -अाठ सह्या हाेतात. त्यापैकी चार सह्या शहर अभियंता यांच्या असतात. अातापर्यंत मी तीन स्वाक्षऱ्या केल्या. शेवटच्या स्वाक्षरीला अडवणूक करण्याचा प्रश्न नाही. मी कार्यालया बाहेर पडल्यानंतर धांडे भेटले. तातडीच्या कामासाठी बाहेर जात असल्याने फाईल कार्यालयात जमा करा, सायंकाळी स्वाक्षरी करून घेऊन जा असे सांगितले. परंतु त्यांनी थेट वाद घालत फाईल फेकून दिली. डी. एस. खडके, प्रभारी शहर अभियंता, महापालिका, जळगाव

वादामागे जेसीबीचे कारण असण्याची दाट शक्यता
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईसाठी तातडीने जेसीबीची गरज हाेती. या वेळी धांडे यांनाही त्यांच्या मालकीचे जेसीबी देण्याची सूचना करण्यात अाली. एका दिवशी जेसीबीमध्ये डिझेल कमी असल्याच्या कारणावरून नाराजी व्यक्त करण्यात अाली. बिल मंजूर न करण्यामागेही तेच कारण असल्याची शंका मक्तेदार धांडे यांनी व्यक्त केली. अधिकाऱ्यांना फुकटात जेसीबी हवे अाहे? अामच्या पैशांनी डिझेल कसे भरणार? असा सवालही मक्तेदार धांडे यांनी या वेळी उपस्थित केला.

अभियंता भाेळेंनी घातली मक्तेदार धांडेंची समजूत
बिलाची रक्कम मंजूर न केल्यामुळे संतापलेल्या मक्तेदार धांडे यांनी थेट अायुक्तांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला. या वेळी सुरू असलेल्या अारडाअाेरडमुळे पालिकेच्या तीन, चार मजल्यांवरील कर्मचारी व नागरिकांनी प्रचंड गर्दी केली हाेती. मक्तेदार अभियंत्यावर करत असलेल्या अाराेपांमुळे सर्वच थक्क झाले. या वेळी सहायक अभियंता सुनील भाेळे यांनी मक्तेदार धांडे यांची समजूत काढत त्यांना दालनात घेऊन गेले.
City engineers avoid bill sanction in Jalgoan

Post a Comment

 
Top