काही बड्या टेक्नॉलॉजी कंपन्यांचे मालक व कंपन्यांकडून वैयक्तिक व जाहीररीत्या फेसबुकची स्थिती ‘बिग टोबॅको’ झाली आहे, अशी टीका होत आहे. दोन वर्षांच्या तुलनेत गेले वर्षभर या टीकेला जोर चढला आहे. फेसबुकमुळे लोकशाहीला धोका असून हे व्यसन झाल्याची टीका सर्वसाधारणपणे केली जात आहे. तंबाखू उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर, तंबाखू हा शरीरास अपायकारक असतो, त्याच्या सेवनाने कर्करोग होतो, अशी टीका केली जाते, तशा स्वरूपाची ही टीका आहे. पण फेसबुकबाबत केवळ याच स्वरूपाची टीका केली जात नाही, तर या कंपनीची गत याहूसारखी होईल, असेही बोलले जात आहे. एक काळ असा होता की, इंटरनेट जगतावर याहू या बलाढ्य कंपनीचे वर्चस्व होते. पण आता या कंपनीचे अस्तित्व राहिलेले नाही.
एक वर्षापर्यंत असे बोलले जात नव्हते. इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, फेसबुक मेसेंजर यामुळे फेसबुकला एक विशाल इंटरनेट प्लॅटफॉर्म मिळाला होता. पण जानेवारीनंतर ही कंपनी कधी वादात, कधी चुकीचे निर्णय घेतल्यामुळे व टीकेमुळे बदनाम होऊ लागली. २०१६मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकांत रशियाचा हस्तक्षेप थांबवण्यात फेसबुकला अपयश आले होते. या कंपनीने ग्राहकांना अंधारात ठेवून सुमारे ९ कोटी ग्राहकांचा डेटा बाहेर विकला होता. त्यानंतर ५ कोटी ग्राहकांची व्यक्तिगत स्वरूपाची माहिती जाहीर झाली होती. गेल्या आठवड्यात न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक बातमी प्रसिद्ध झाल्याने फेसबुकचे संस्थापक झुकेरबर्ग यांना कंपनीच्या दुसऱ्या क्रमांकाच्या अधिकारी शेरील सँडबर्ग यांच्या समर्थनार्थ बोलावे लागले. या बातमीत असे म्हटले होते की, अध्यक्षीय निवडणुकांत रशियाच्या हस्तक्षेपावर निर्बंध आणण्यात फेसबुकच्या कार्यकारी मंडळाला अपयश आले. उलट कंपनीने असा प्रचार करणाऱ्या लॉबीतील व्यक्तींना नोकरीवर ठेवले व शिवाय अशा रिसर्च कंपन्यांकडून काम करवून घेतले ज्या कंपन्या राजकीय प्रचारासाठी काम करत होत्या. या वर्षाच्या सुरुवातीस फेसबुकचे शेअर २७ टक्क्यांनी घसरले. इन्स्टाग्रामचे संस्थापक व असे अनेक महत्त्वाचे अधिकारी आहेत ज्यांनी कंपनीला रामराम ठोकला आहे. त्यात फेसबुकचा बाजारपेठेतला हिस्साही कमी होताना दिसत आहे. वास्तविक फेसबुकची तुलना याहूशी करणे योग्य नाही. कारण याहूने सर्वोच्च स्थानी असतानाही स्वत:चा फायदा दुसऱ्यांना करून दिला नव्हता. शिवाय याहूच्या पुढे शक्तिशाली गुगल कंपनी निर्माण झाली होती. पण आस्ते आस्ते याहूच्या जाहिराती, ग्राहक, कर्मचारी कमी होत गेले.

Post a Comment