0
धान्याचा काळाबाजार अज्ञात व्यक्तीविरुद्ध महसूल विभागाची पोलिसांत तक्रार

परतवाडा- रेशनच्या धान्याचा काळाबाजाराच्या संशयावरून संशयित रशीद टोपली याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा अहवाल पोलिसांना सादर केल्यामुळे चिडलेल्या अज्ञात व्यक्तीने फोनवरून पुरवठा निरीक्षकाला पाहून घेण्याची धमकी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी अचलपूरचे पुरवठा निरीक्षक श्रीकांत मोयगे यांनी परतवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे पारदर्शी असलेल्या पॉस मशीन देऊनही रेशनच्या धान्याला पाय कसे फुटले, असा प्रश्न निर्माण झाला असून, कारवाया करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महसूल विभागाचे निरीक्षण अधिकारी पी. के. भगत व पुरवठा निरीक्षक श्रीकांत मोयजे यांनी रशीद अशरफ टोपली याच्या बैतुल मार्गावरील धान्य गोदामावर धाड टाकून सुमारे ४० क्विंटल गहू, १४२ क्विंटल तांदूळ, २१ कट्टे तुरदाळ, वजनकाटा, शिलाई मशीन, सुतळी, शिलाई धागा आदी साहित्य जप्त केले होते. सदर धान्य रेशनचे असून काळ्याबाजारातून रशीद टोपली यांनी साठवणूक केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. दरम्यान याप्रकरणाची पुरवठा विभागाने चौकशी केली. सदर गहू कृषी उत्पन्न बाजार समितीतून अडते ब्रिजेश कुमार जयप्रकाश शर्मा व राजेशकुमार अग्रवाल, नरेंद्रकुमार अग्रवाल संतोषकुमार जैन, सत्यनारायण पुरोहित, प्रकाशचंद अग्रवाल, संदिप अग्रवाल, रमन शर्मा, काठोडे ट्रेडर्स आदी परतवाड्यातील व्यापाऱ्यांकडून खरेदी केल्याचे पुरवठा विभागाच्या चौकशीत रशीद टोपली यांनी सांिगतले व बिलाच्या झेरॉक्स सादर केल्या होत्या. तांदुळाची खरेदी गोंिदया येथील आर्य ट्रेडिंग कंपनीकडून खरेदी करण्यात आल्याचे सांगून त्याची बिले सादर केली होती. तुरडाळीची खरेदी गोपाल अॅन्ड गोपाल ट्रेडिंग कंपनीकडून खरेदी करण्यात आल्याचे सांिगतले. परंतु तुरडाळीच्या खरेदीचे बिले सादर केली नाही. त्यामुळे गोपाल अॅन्ड गोपाल कंपनीचे मालक राम तिवारी यांना याबाबत विचारणा केली असता रशीद टोपली यांना दुकानातून कोणतेही धान्य विकले नसल्याचे सांिगतले. त्यामुळे रशीद टोपली यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचे चौकशीत समोर आले. त्याचप्रमाणे रिकामा बारदाणा, शिलाई मशीन, वजन काटे, चाळणी आदी संशयास्पद साहित्यही गोदामात आढळून आले होते. चौकशीत रशीद टोपलीच्या संपूर्ण व्यवहारावर संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे सदर धान्य सार्वजनिक वितरण प्रणालीचे असून काळा बाजार करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याची दाट शक्यता चौकशी अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.बाजार समितीतही दोन वेळा आढळला साठा 
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतही दोन वेळा अवैध धान्यसाठा आढळून आला होता. याप्रकरणी व्यापाऱ्याचा परवानाही निलंबित केला होता. दरम्यान अचलपूर-परतवाडा शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धान्य साठा सापडत असल्यामुळे जुळे शहर धान्याच्या काळ्याबाजाराचे केंद्र ठरले असल्याची चर्चा व्यापारी वर्गात सुरू आहे.

पॉस मशीन कुचकामी! 
सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना पॉस मशीन दिल्या आहेत. त्यानंतरही रेशनच्या धान्याचा काळाबाजार दिसून येत असल्याने पॉस मशीन कुचकामी ठरल्या की काय?, असा प्रश्न नागरिकांडून उपस्थित केला जात आहे.

गोदामावर तीन वेळा धाडी 
रशीद टोपली यांच्या गोदामावर आतापर्यंत तीन वेळा धाडी टाकून अवैध धान्यसाठा जप्त केला. परंतु पुरवठा विभागाला धान्य सार्वजनिक वितरण प्रणालीचे असल्याचे सिद्ध करता न आल्याने टोपली कारवाईतून बचावले आहे. दरम्यान, टोपली यांचा धान्याचा व्यवहार संशयास्पद असल्याचे निष्पन्न होत असले तरी पुरवठा विभागास धान्य रेशनचे असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे.

तक्रारीवर कार्यवाही सुरू 
अज्ञात व्यक्तीने पुरवठा निरीक्षकांना दिलेल्या धमकीची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली आहे. पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. सदानंद मानकर, ठाणेदार, परतवाडा

Post a comment

 
Top