0

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात विशेषत: उत्तर महाराष्ट्रात २२ डिसेंबरपर्यंत थंडीची लाट राहील.


नाशिक/ अाैरंगाबाद | काश्मीरमधील हिमवर्षाव, दक्षिणेत आलेले चक्रीवादळ व उत्तरेकडून वाढलेला वाऱ्याचा वेग यामुळे महाराष्ट्रात दाेन- तीन दिवसांपासून पारा घसरला. बुधवारी उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट हाेती. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व धुळे येथे ६.० अंश सेल्सियस असे नीचांकी तापमान नोंदले गेले. निफाड येथे ६.६, तर नाशकात ७.९ सेल्सियसची नोंद झाली. मराठवाडा, प. महाराष्ट्र, विदर्भातही पारा ८ अंशांवर घसरला हाेता.


उत्तर महाराष्ट्रात बुधवारी किमान व कमाल तापमानात कमालीची घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. जिल्ह्यात सिन्नर येथे ६.० अंश सेल्सियसची नीचांकी तापमानाची नोंद झाली असून त्याखालोखाल निफाड येथे ६.६, तर नाशिक शहरात ७.९ अंश सेल्सियसची नोंद झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा थंडीने गारठला आहे. नगदी पीक असलेल्या द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे, तर दुसरीकडे गहू आणि हरभऱ्याला पोषक वातावरण असल्याने या उत्पादकांमध्ये समाधानाचे चित्र आहे. तसेच थंडीचा कडाका हा केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे. बुधवारी धुळे जिल्ह्यात नीचांकी ६.० अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नगरच्या तापमानात घट झाली हाेती.

पारा इतका का घसरला 
- सध्या पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशात थंडीची लाट आलेली आहे. तेथून वाहणारे थंड वारे उत्तर महाराष्ट्रात आल्याने धुळे, नाशिक जिल्ह्यातही पारा घसरला.

- सीकर@०.५ : बुधवारी पूर्व राजस्थानातील सीकर येथे देशातील सर्वात नीचांकी ०.५ अंश सेल्सि. तापमान नोंदले गेले.

- भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात विशेषत: उत्तर महाराष्ट्रात २२ डिसेंबरपर्यंत थंडीची लाट राहील.

रब्बी पिकांना फायदा, द्राक्षांना मात्र तडे 
- या थंडीमुळे गहू, हरभऱ्याला पाेषक वातावरण निर्माण झाले अाहे. नाशिक व साेलापूर जिल्ह्यातील द्राक्षांना मात्र तडे गेले अाहेत.

- कृषी महाविद्यालयात ५.० नाेंद : धुळे कृषी महाविद्यालयात मात्र ५.० अंश सेल्सियस किमान तापमानाची नाेंद झाली अाहे. 
- दिल्ली उत्तर भारतातील धुक्यामुळे भुसावळकडे येणाऱ्या ११ रेल्वे गाड्या विलंबाने धावत अाहेत, तर एक पॅसेंजर रद्द करावी लागली.

थंडीची लाट म्हणजे 
पठारी भागातील एखाद्या ठिकाणचे किमान तापमान १० अंश सेल्सियसपेक्षा कमी असेल तसेच पर्वतीय भागातील ठिकाणचे तापमान शून्य अंशांच्या खाली असेल आणि त्या ठिकाणचे किमान तापमान सरासरीपेक्षा ४.५ ते ६.५ अंशांनी घसरले असेल तर तेथे थंडीची लाट आली, असे मानले जाते. एखाद्या ठिकाणचे प्रत्यक्ष किमान तापमान ४ अंश सेल्सियसपेक्षा कमी असेल तर थंडीची लाट मानली जाते.

द्राक्षांच्या फुगवणीवर परिणाम 
नाशिक जिल्ह्यात दिंडोरी, निफाड, नाशिक, चांदवड आणि सिन्नर तालुक्यात द्राक्षांचा हंगाम जोरात आहे. काही ठिकाणी द्राक्ष काढणीला आले आहेत. थंडीच्या कडाक्यामुळे जमिनीवर ऊब कमी होत असल्याने झाडांची मुळे अन्नघटक शोषण करण्यासाठी कमकुवत ठरतात.

जैविक घटकांचा वापर हितकारक 
किमान तापमान हे ८ अंशच्या आत असल्यास झाडाच्या मुळांद्वारे द्राक्षाला अन्नपुरवठा खंडित होतो. परिणामी फुगवण कमी होणे, भुरीचा प्रादुर्भाव, द्राक्षांच्या देठाजवळ तडे जाण्याची शक्यता असते. त्यामुळे द्राक्ष झाडांना जैविक घटकांचा वापर करणे हितकारक ठरेल.

थंडीमुळे गहू, हरभऱ्याला १५ % लाभ 
१० अंश सेल्सियसपर्यंत तापमान सलग ३० दिवस राहिल्यास त्याचा गहू आणि हरभरा पिकाला लाभ होतो. थंडीमुळे पडणाऱ्या दवाचा या दोन्ही पिकांना लाभ होत असून १० ते १५ टक्के अधिक उत्पादन मिळते.

- कल्याण देवळाणकर, कृषिवेत्ता राहुरी कृषी विज्ञान केंद्र

विदर्भही ‘थंडा’वला; गडचिराेली, गाेंदिया, भंडाऱ्यात वादळी वारे, पाऊस
बंगालच्या उपसागरात आलेल्या वादळामुळे नागपूरसह विदर्भात थंडी कमी झाली होती. बुधवारी नगापुरचे तापमान ९.६ अंशांवर होते. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने हुडहुडी वाढल्याने विदर्भ गारठला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली, तर विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, भंडारा तसेच चंद्रपूर येथे वादळी पाऊस झाला.


हिमालयात हिमवृष्टी झाल्यानंतर मैदानी प्रदेशातील पाऱ्यात झपाट्याने घसरण होते. विदर्भात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून थंडी वाढली होती. मात्र, बंगालच्या उपसागरात आलेल्या वादळानंतर तापमानात बदल झाले. त्यामुळे वाढलेल्या थंडीचा जोर कमी झाला होता. गेल्या दोन दिवसांत ढगाळ वातावरण असले तरीही गारठा कमी झाला नाही. थंडी वाढल्याने गरम कपड्यांची विक्री तेजीत आहे.

भंडाऱ्यात पडले धुके 
बुधवारी पहाटे जिल्ह्यात सर्वत्र दाट धुके दाटून आले होते. गेल्या दाेन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे भंडारा जिल्ह्यात थंडीचा जोर वाढल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि वाढलेल्या थंडीमुळे पडणारे दवबिंदू हे गहू आणि हरभरा या पिकांच्या वाढीसाठी पोषक आहेत.

दाट धुक्यामुळे ११ रेल्वेगाड्यांना विलंब
प्रतिनिधी | भुसावळ 
दिल्ली अाणि उत्तर भारतात पडत असलेले धुके अाणि थंडीमुळे त्या भागातून येणाऱ्या गाड्यांना धुक्याचा व थंडीचा फटका बसत अाहे. यामुळे या रेल्वे गाड्या त्यांच्या नियाेजित वेळेपेक्षा विलंबाने धावत अाहेत. वारंवार उशीर हाेणाऱ्या रेल्वे गाड्यामुळे प्रवासी त्रस्त हाेत अाहेत. हुडहुडी भरणाऱ्या थंडीत प्रवाशांना गाडीची वाट पाहत थांबावे लागत अाहे. अनेक प्रवासी गाडीची प्रतीक्षालयात थांबून वाट पाहत आहेत. थंडीचे दिवस असल्याने रेल्वे रुळांना तडे पडत असल्याने रेल्वे गाड्याही कमी वेगात चालवल्या जातात. त्यामुळे त्या गाड्या विलंबाने धावत अाहेत. विलंबाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये झेलम एक्स्प्रेस दोन तास, सचखंड एक्स्प्रेस एक तास, गाेवा एक्स्प्रेस अर्धा तास, पाटणा सुपर एक्स्प्रेस तीन तास, गाेदान एक्स्प्रेस ३ तास, काशी एक्स्प्रेस २ तास, भागलपूर कुर्ला एक्स्प्रेस ३.३० तास, कर्नाटक एक्स्प्रेस अर्धा तास, गीतांजली एक्स्प्रेस ३.३०, कामायनी एक्स्प्रेस २.३०, ताप्तीगंगा एक्स्प्रेस ५ तास या गाड्या विलबंाने धावत अाहेत.

नागपूर पॅसेंजर अचानक रद्द 
भुसावळ स्थानकावरून सायंकाळी ७.३० वाजता सुटणारी भुसावळ-नागपूर पॅसेंजर बुधवारी अचानक रद्द करण्यात अाली. रेल्वे प्रशासनाकडून एक दिवस अगाेदर जाहीर न केल्यामुळे ग्रामीण भागातून अालेल्या प्रवाशांना पुन्हा घरी जावे लागले. अचानक पॅसेंजर रद्द झाल्याने प्रवाशांनी स्थानकावर गाेंधळ केला. रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली. नागपूरकडून भुसावळ जंक्शनवर दुपारी ३.३० वाजता येणारी पॅसेंजर रद्द झाल्याने तीच पॅसेंजर सायंकाळी ७.३० वाजताही गेली नाही.


मराठवाड्यामध्ये १५ जानेवारीपर्यंत थंडीची तीव्रता
मराठवाड्यातही गेल्या दाेन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला अाहे. परभणीचे किमान तापमान ९.६ अंश सेल्सियसपर्यंत खाली घसरले. परभणी शहरावर पहाटे ४ ते ९ वाजेपर्यंत धुक्याची चादर पसरली होती. उत्तर भारतातील हिमवृष्टीमुळे महाराष्ट्रात थंड वारे वाहत आहेत. डिसेंबरअखेरीस व १५ जानेवारीपर्यंत थंडीचीही लाट कायम राहण्याची शक्यता आहे. मध्यंतरी थोड्याफार प्रमाणात तापमान स्थिर राहील. मात्र, थंडीची तीव्रता कायम राहील, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. नांदेड जिल्ह्यात बुधवारी सकाळी या मोसमातील सर्वात नीचांकी ८.५ से. तापमानाची नोंद करण्यात आली. मंगळवारी रात्री तर जिल्ह्यावर सायंकाळपासूनच धुके दाटले होते. भारतीय हवामान खात्याचे जिल्ह्याचे निरीक्षक बाळासाहेब कच्छवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा वर्षांपूर्वीच्या हिवाळ्यात जिल्ह्यात सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. तेव्हा तापमानाचा पारा ५.५ से. पर्यंत खाली घसरला होता. यावर्षी आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद बुधवारी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. बुधवारी लातूर जिल्हाही धुक्यात हरवून गेला. उस्मानाबादचे या मोसमातील सर्वात नीचांकी म्हणजे ११.३ अंश सेल्सियस नोंदले गेले. औरंगाबाद जिल्ह्यातही बोचरी थंडी जाणवत आहे. बीड आणि जालना जिल्ह्यातही थंडीचा कडाका जाणवला.

लहान मुलांना साथीचे अाजार
हिंगोली जिल्ह्यातही या वर्षातील सर्वात कमी तापमान नोंदले गेले. बुधवारी जिल्ह्याचे किमान तापमान ११ अंश नोंदवले गेले. थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले अाहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना थंडीचा त्रास जाणवत असून त्यांच्यात सर्दी, खोकला, ताप असे आजार बळावले आहेत. शाळांमध्ये लहान मुलांना उन्हामध्ये बसवले जात आहे. 
Cold wave in North Maharashtra

Post a Comment

 
Top