0
विभागातील चार जिल्हे, 10 तालुके, 10 तहसीलदार, 10 वार्ताहर आणि आठ तास निरीक्षण

औरंगाबाद- दिवसेंदिवस दुष्काळ तीव्र होत चाललेल्या मराठवाड्यात ही परिस्थिती सुसह्य करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्याची जबाबदारी असलेले प्रशासन किती तत्परतेने काम करते आहे, हे तपासण्याचा प्रयत्न ‘दिव्य मराठी’ने मंगळवारी केला. चार जिल्ह्यांतील १० दुष्काळी तालुक्यांतील तहसीलदार कार्यालयाच्या आवारात १० वार्ताहर कार्यालयीन वेळेत पूर्णवेळ निरीक्षण करीत होते. त्यातून समोर आले ते वास्तव प्रशासनाच्या एकूण कार्यतत्परतेवर प्रश्न निर्माण करणारे तर आहेच; पण या पद्धतीने काम चालले तर दुष्काळ सुसह्य होण्याऐवजी अधिक असह्य होण्याचीच शक्यता अधोरेखित करणारे आहे.

दोघांनीच दिला पूर्ण वेळ :

या पाहणीतून समोर आलेली निरीक्षणे प्रशासनाविषयी निराशा करणारीच आहेत. १० तहसिलदारांपैकी अवघे दोन तहसिलदार सकाळी आणि सायंकाळीही कार्यालयात उपलब्ध होते. कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५ ते ५.४५ अशी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार केवळ एक तहसिलदार सकाळी १० वाजेच्या आत कार्यालयात आलेले आढळले तर दोन तहसिलदार कार्यालयाची वेळ संपायच्या वेळी कार्यालयात होते. बीड जिल्ह्यातील तिनही तहसिलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक असल्याचे सांगून आपल्या कार्यालयाकडे पाठ फिरवली. ते एक मिनीटही कार्यालयात आले नाहीत. बैठक होती निवडणुकीसंदर्भात आणि ती अवघी तीन तास चालली. पण ऐन दुष्काळात किमान तीन तहसिलदारांची त्यामुळे कार्यालयात अनुपस्थिती राहिली.

४ जिल्ह्यांतील १० तालुके
या स्पेशल आॅपरेशनसाठी ‘दिव्य मराठी’ने औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील अनुक्रमे खुलताबाद, कन्नड आणि वैजापूर, अंबड आणि बदनापूर, धारूर, पाटोदा आणि आष्टी तसेच परंडा आणि भूम या तहसीलचा दिवसभर कारभार तपासला. ११ डिसेंबरला सकाळी ९.४५ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रत्येकी एक वार्ताहर या कार्यालयांच्या आवारात थांबून निरीक्षणे नोंदवत होता. हे करताना त्याने कोणालाही आपली ओळख दिली नाही. बाहेरच्या तालुक्यातील असल्यामुळे या वार्ताहरांना स्थानिक पातळीवर ओळखणारेही कोणी नव्हते. काहींनी तहसीलदारांच्या कक्षात आणि कार्यालयातील विविध कर्मचाऱ्यांकडे फिरून आवश्यक माहितीही काढून घेतली.

तहसीलदारच का? :

हे निरीक्षण तहसीलदार कार्यालयातच करण्याचा निर्णय घेण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हे पद दुष्काळात दिलासा देणाऱ्या योजना राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आहे. शिवाय हा दुष्काळ तालुका हे युनिट घेऊनच जाहीर झाला. ग्रामीण भागातील लोकांची गाऱ्हाणी मांडण्यासाठी तहसीलदार कार्यालयांपर्यंतच धाव असते.

अनेकांची फेरी गेली वाया
ज्या ज्या कार्यालयांमध्ये तहसीलदार आलेच नाहीत किंवा येऊनही ज्यांनी वेळ दिला नाही त्या त्या ठिकाणी शेकडो ग्रामस्थांची तहसील कार्यालयाची फेरी किंवा कुणाचा निम्मा, कुणाचा पूर्ण दिवस वाया गेला. त्यात माजी आमदार व शिवसेना नेत्यासह शेतकरी नेतेही होते. सर्वाधिक कुचंबणा वृद्धांची झाली. निराधार साहाय्य व रेशनकार्डसाठी अनेकांच्या फेऱ्या वाया जात होत्या. हे त्यांनीच वार्ताहरांना सांगितले. काही नायब तहसीलदार लोकांना दिलासा देत होते. पण ती मलमपट्टीच ठरत होती. एका गावच्या शिष्टमंडळाची टँकरची तक्रार ऐकून घ्यायलाही तिथे कोणी नव्हते.

कर्मचाऱ्यांचीही अनास्था :

तहसीलदार नाहीत म्हटल्यावर अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांतही मोठी अनास्था होती. बहुतांश कार्यालये दहा-सव्वादहानंतर उघडली. काही ठिकाणी तीनपैकी दोन नायब तहसीलदार फिरकलेही नाहीत. उशिरा येणे, लवकर जाणे, चहा-जेवण या निमित्ताने वेळ घालवणे असे प्रकार होत असल्याचे निरीक्षणही वार्ताहरांनी नोंदवले आहे.Two out of ten tahsildars of the Marathwada region were found in the full time office

Post a comment

 
Top