0
 • Ashti schools in bad condition, beedआष्टी - बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतीची दुर्दशा पाहून शाळा दुरुस्तीसाठी जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी एक कोटी रुपयांचा निधी दिला. तर दुसरीकडे मात्र आष्टी तालुक्यातील दीड हजार लोकसंख्येच्या पांगरा गावात जिल्हा परिषदेच्या पाच शाळा खोल्यांपैकी दोन खोल्यांत गावातील एका महाराजाने आपले बस्तान बसवले आहे. दोन खोल्यांत महाराज पारायण करून भविष्य सांगतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर ज्ञानार्जन करावे लागत असल्याने त्यांचे भविष्य अंधारात चालले आहे. बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार यांच्याच सर्कलमधील ही शाळा आहे. गावच्या सरपंचांनी मात्र शाळेला जेव्हा आवश्यकता वाटते तेव्हा शाळा खोल्या ताब्यात देऊ, असे सांगितले आहे. दरम्यान सीईओंनी या प्रकरणी कारवाईच्या सूचना दिल्याचे सांगितले आहे .
  आष्टी तालुक्यातील पांगरा हे दीड हजार लोकसंख्येचे गाव असून १९५९ मध्ये सुरू झालेल्या जिल्हा परिषद शाळेत आठवीपर्यंत वर्ग असून येथे सहा शिक्षक कार्यरत असून विद्यार्थ्यांची पटसंख्या १०० अाहे. पहिली ते चौथीपर्यंत ४० विद्यार्थी दररोज उपस्थित असतात. शाळेला पाच वर्ग खोल्या असून या खोल्यांची अवस्था बिकट झाली आहे.
  पांगरा या गावातील रामकृष्ण बाबा यांनी पाच वर्षांपूर्वी शाळेच्या पाच खोल्यांपैकी दोन वर्ग खोल्यांत आपले बस्तान बसवले आहे. अनधिकृत कब्जा केलेल्या शाळेत रामकृष्ण महाराज सध्या हरिपाठ, भजन करतात. महाराजांनी तुळशी वृंदावनाचेही बांधकाम केले आहे. महाराजांच्या आध्यात्मिक कार्याला कोणाचा विरोध नसला तरी त्यांनी वर्ग खोल्यात बस्तान मांडल्यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर ज्ञानार्जन करण्याची वेळ आली आहे.
  महाराज म्हणाले, पांगरा गाव भारतात की पाकिस्तानात? 
  शाळेच्या वर्ग खोल्या वापरत असलेल्या रामकृष्ण महाराज यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी पांगरा गाव भारतात आहे की, पाकिस्तानात? राजकारणी मतदानापुरते इथे येतात आणि जातात. कोणालाच गावाच्या विकासाची काळजी नाही. इथले रहिवासी देखील तसेच आहेत, म्हणत पांगरा ग्रामस्थांना नावे ठेवत अधिक बोलण्यास टाळले.
  वरिष्ठांनी पत्राची दखल घेतली नाही 
  महाराज वर्ग खोल्या वापरत असल्याबाबत वरिष्ठ कार्यालयाला वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र पत्राची वरिष्ठांनी दखल घेतलेली नाही. अंबादास शिरसाठ, मुख्याध्यापक, जि.प. शाळा,पांगरा
  वर्ग खोल्या ताब्यात देऊ 
  महाराज शाळेच्या वर्ग खोल्या वापरत आहेत, हे जरी खरे असले तरी ज्या वेळी शाळेला आवश्यकता वाटेल त्यावेळी वर्ग खोल्या शाळेच्या ताब्यात दिल्या जातील. -अशोक मिसाळ, सरपंच पांगरा
  कारवाई केली जाईल 
  महाराज शाळेत राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर ज्ञानार्जन करावे लागत असेल तर हा प्रकार दुर्दैवी अाहे. तत्काळ कारवाई केली जाईल. सविता गोल्हार, जिल्हा परिषद अध्यक्षा, बीड
  कारवाईच्या सूचना देतो 
  एखाद्या शाळेत कोणी अनधिकृतरीत्या राहत असेल तर यावर तत्काळ कारवाई करू. मी आजच शिक्षणाधिकारी यांना कारवाई करण्याच्या सूचना देतो. अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बीड

Post a Comment

 
Top