0

बेड्या पायात असतानाही गायब झालेल्या तरुणाच्या शोधासाठी सतरा दिवसांपासून माळरानावर नातेवाइकांची भटकंती.

  • जालना- वर्षाला साडेतीनशे ते चारशेच्या जवळपास व्यक्ती हरवल्याच्या घटना घडतात. पोलिस ठाण्यांमध्ये केवळ मिसिंगची नोंद होते. मात्र, गायब व्यक्तीचा तपास बहुतांश होत नाही. कालांतराने ही तक्रार अशीच राहते. अनेकदा त्या व्यक्तीचा खून, मृतदेह आढळून आल्यानंतर मिसिंगचा प्रकार उघड होताे. दरम्यान, तक्रार आल्याबरोबरच पोलिसांकडून पारदर्शक तपास झाला तर दुर्घटना टळू शकते, परंतु हे पोलिस प्रशासनाकडून होताना दिसत नाही. दरम्यान, डांबरी शिवारातील विहिरीत १८ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आल्याने पोलिसांच्या तपासाच्या हलगर्जीपणाचा ‘बळी’ समोर आला.


    जिल्ह्यात अठरा पोलिस ठाणे असून या ठाण्यांच्या अंतर्गत ९५८ गावे याअंतर्गत येतात. दरम्यान, दररोज जिल्ह्यात काही ना काही गुन्हे घडत असतात. चोऱ्या, लूटमार, घरफोड्या, वाळूमाफिया, दुचाकी चोरी जाणे या गुन्ह्यांमुळे तर जालनेकर अगोदरच त्रस्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातून बेपत्ता होणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
    विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात हरवलेल्या व्यक्तींमधील बहुतांश महिला, युवती व चाळिशीच्या आतील व्यक्ती असल्याचे दिसून आले आहे. जालना शहरासाठी सदर बाजार, कदीम जालना पोलिस ठाणे, तर शहराच्या अवतीभोवती असलेल्या खेड्यांसाठी तालुका, कदीमसह त्या-त्या तालुक्यांचे पोलिस ठाण्यांतील पोलिस कार्यरत आहेत, परंतु यात बोटावर मोजण्याइतकेच पोलिस ठाणेच तपास पारदर्शक करीत असल्यामुळे गायब झालेल्या घटनांच्या बाबतीत काही पोलिस ठाणे तपास लावण्यात येत आहेत. मात्र, काही पोलिस ठाण्यांचे अत्यंत हलगर्जीपणाचा तपास करीत आहेत. दरम्यान, वर्षाला तीन हजारांच्या जवळपास गुन्हे घडतात. परंतु चालू वर्षात तर पाच हजारांपेक्षा जास्त गुन्हे घडले.
    १७ दिवसांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यातून तरुण बेपत्ता
    भूतबाधा झाल्याच्या संशयावरून उपचारासाठी बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी दरबारात नेलेला युवक त्या ठिकाणाहून बेपत्ता झाला. याबाबत रायपूर पोलिस ठाण्यात तक्रार देऊन तब्बल सतरा दिवस उलटूनही कोमलसिंग सुरतसिंग राजपूत (२८, रेलगाव, ता. भोकरदन) या तरुणाचा शोध लागलेला नसल्याने नातेवाइकांकडून राना-वनात त्याचा शोध घेतला जात आहे. 

    उपचारासाठी नेण्यात आल्यानंतर कोमलसिंग याला सैलानी दरबारात ठेवण्यात आले. दरम्यान, त्याचे आई-वडील चहा घेण्यासाठी बाजूच्या हॉटेलमध्ये गेले असता कोमल या ठिकाणाहून बेपत्ता झाला. नातेवाइकांकडे चौकशी केली असता कुठेच हा तरुण आढळून आलेला नाही. रेलगाव येथून दररोज आठ ते दहा दुचाकी रोज त्याला शोधण्यासाठी जात आहेत. अख्खा सैलानी, चिखली परिसरातील डोंगरदऱ्या पिंजून काढल्या.
    दररोज विविध ठिकाणी जाऊन दुचाकींवरून तपास
    कोमलसिंग राजपूतचा शोध लागत नसल्यामुळे नातेवाईक दररोज दुचाकींवरून विविध ठिकाणी जाऊन शोध घेत आहेत. परंतु सतरा दिवस उलटूनही शोध लागत नसल्याने कुटुंब धास्तावले आहे. -रूपाली राजपूत, रेलगाव.
    तक्रार दिल्यापासून युवतीचा मृतदेह विहिरीत होता पडून
    परतूर तालुक्यातील बाबूलतारा येथील मनीषा अण्णासाहेब पोळे (१७) ही युवती १ नोव्हेंबर रोजीपासून घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे वडील अण्णासाहेब पोळे यांनी दिली होती. दरम्यान, या घटनेत सहायक पोलिस निरीक्षक एम. एल. पवार यांनी मुलीच्या घरांच्या शेजाऱ्यांशी काही प्रमाणात चर्चा केली. परंतु नंतर त्या मुलीचे नातेवाईक हेच सहकार्य करीत नसल्याचे कारण दाखवून या गंभीर गुन्ह्याकडे दुर्लक्ष केल्याने तक्रार दिल्यापासून त्या मुलीचा मृतदेह सोमवारी आढळून आला. यातूनही पोलिसांचे दुर्लक्षपणाचा कळस दिसून येत आहे.
    सदरील तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक एम. एल. पवार यांच्याकडे सोपवण्यात आला होता. पोलिस तपासामध्ये संबंधित मुलगी राहत असलेल्या शेजारील जबाब घेण्यात आले. या जबाबामध्ये काहींनी तिला शेताकडे जात असल्याचे जबाबात म्हटले. शेजारील एका व्यक्तीचा फोन घेऊन कुणाला तरी फोन केल्याची माहिती मिळाली. काही दिवस अनेक मोबाइल, चुलत मोबाइलचे रेकॉर्ड सुद्धा पोलिसांनी मागवून घेतले. परंतु यात काहीच निष्पन्न झाले नाही. मुलीच्या नातेवाइकांनी या तपासात सहकार्य नसल्याचे तपास अधिकारी पवार यांनी सांगितले. दरम्यान, मुलीच्या गावापासून जवळच असलेल्या शिंगाडे पोखरी येथे सोमवारी तिचा कुजलेला मृतदेह आढळून आला.
    असा करावा लागतो तपास :
    तक्रार झाल्यानंतर घटनास्थळ पाहणी, जाण्या-येण्याचे पुरावे, संपर्कातील असलेल्यांची माहिती संकलित करून तपासाला वेग द्यावा लागतो. परंतु पोलिस प्रशासनाकडून बेपत्ता झाल्याची नोंद झाल्यानंतर संथगतीने तपास करण्यात येत अाहे.
    बेपत्ता झालेल्यांचा तपास करण्याच्या पोलिसांना सूचना 
    ^बेपत्ता झालेल्यांचा तपास करण्याच्या बाबतीत पोलिसांना सूचना केलेल्या आहेत. याबाबत तपासाचे प्रमाणही बऱ्यापैकी आहे. ज्या पोलिस ठाण्याचा तपास योग्य नसेल त्यांना सूचना करू. -एस. चैतन्य, पोलिस अधीक्षक, जालना.

Post a Comment

 
Top