0
भारतीय अर्थव्यवस्थेच्या पायाभूत बाबींवर विश्वास ठेवणाऱ्या देशांतर्गत गुंतवणूकदारांमुळे आजचा भांडवल बाजार मजबूत आहे.

२०१८ मध्ये भारतीय शेअर बाजार विक्रमी उंचीवर पोहोचला. सरते वर्ष कमोडिटींच्या उसळलेल्या किमतींपासून ट्रेड बॅरिअर, डगमगता रुपया, बँकिंग व गैर बँकिंग क्षेत्रातील अनिश्चितता या सर्वांचे साक्षीदार ठरले. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत पाहिल्यास बीएसई ६ टक्के वाढला. भारतीय अर्थव्यवस्थेच्या पायाभूत बाबींवर विश्वास ठेवणाऱ्या देशांतर्गत गुंतवणूकदारांमुळे आजचा भांडवल बाजार मजबूत आहे. यावर्षी देशांतर्गत गुंतवणूकदारांनी १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असे विक्रमी शेअर्स खरेदी केले. त्या तुलनेत विदेशी गुंतवणूकदारांनी ३४,००० कोटी शेअर्स खरेदी केले. माझ्या मते, २०१९ हे वर्षही अस्थिर असेल. पण भारतीय भांडवल बाजारांसाठी सकारात्मक बाब म्हणजे देशांतर्गत गुंतवणूकदार सतत खरेदी करत आहेत. तसेच भारतीय अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. यामुळे व्यावसायिक उत्पन्नात मदत मिळेल. तसेच लोकसभा निवडणुकीमुळे पुढील आर्थिक वर्षाला हातभार लागेल. पण जीडीपी, औद्योगिक उत्पादनाचे आकडे, व्याजदर इत्यादी जागतिक मॅक्रो इंडिकेटर, कच्च्या तेलाच्या किमती आणि रुपयाचे मूल्यही प्रमुख भूमिका निभावतील.
सकल अर्थप्रणालीवर परिणामांचे कारक: या वर्षी फ्रान्सला मागे सारत भारत हा जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. तसेच पुढील काही वर्षे ही वेगाने विस्तारणारी प्रमुख अर्थव्यवस्था असेल, अशी अपेक्षा आहे. २०१९ मध्ये ७ ते ७.५ टक्के जीडीपीची अपेक्षा अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कर आणि दिवाळखोरीच्या कायद्यात सुधारणा स्थिर झाल्यानेही अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची आशा आहे. कारण यामुळे असंघटित आर्थिक व्यवहार संघटित कक्षेत येतील. भांडवल बाजारांच्या संदर्भाने पाहिल्यास सरकारने अवलंबलेल्या धोरणांमुळे महागाई सामान्य राहिली असून, पायाभूत सुधारणा, उद्योगपूरक वातावरण आणि मुक्त एफडीआय व्यवस्थेमुळे भांडवलात मोठा प्रवाह आला. त्यामुळे भारत ही गुंतवणुकीसाठी योग्य बाजारपेठ बनण्यास मदत झाली. हे स्थिर मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर २०१९ मधील भांडवल बाजारासाठी चांगले संकेत आहेत.

लोकसभा निवडणूक : २०१९ ची लोकसभा निवडणूक राजकारणासोबत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची आहे. निवडणुकीच्या वर्षात सरकारी खर्च वाढतो. आर्थिक व्यवहारांवर सकारात्मक परिणाम होतात. मुख्य रस्ते, रेल्वे, स्वस्त घरे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदत यांसारख्या प्राथमिक व पायाभूत सुविधांना सरकारने गती दिल्यास सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक वाढेल. या खर्चामुळे उपभोक्त्याच्या हाती आणखी पैसा येण्याची शक्यता आहे. यामुळे क्रयशक्ती वाढेल व अखेरीस अर्थव्यवस्था व भांडवली बाजारास फायदा होईल.
व्यावसायिक उत्पन्न : भारतीय आर्थिक वृद्धी व व्यावसायिक उत्पन्न सध्या योग्य मार्गावर येत असून यामुळे अल्प व मध्यावधी व्यावसायिक उत्पन्नवाढीस मदत मिळेल. आरबीआयनुसार, २०१७ मध्ये गैर वित्तीय सार्वजनिक कंपन्यांचा एकूण महसूल ११.३ टक्के वाढला. जीएसटी लागू झाल्याने व्याज, कर, अवमूल्यन इत्यादींमुळे उत्पन्न वाढेल.
व्यापार युद्धाचा फायदा : विशाल देशांतर्गत बाजार पाहता भारत नेहमीच गुंतवणूकदारांना आकर्षित करणारा ठरला. अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा भारतावर चांगला परिणाम होईल. कारण चीनमधील महागाई व नफ्याचा अभाव पाहता कंपन्या दुसरे पर्याय अवलंबतील. उत्पादन निर्मिती क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीस आकर्षित करण्याची संधी आहे. एकूणच, छोट्या गुंतवणूकदारांसाठी सल्ला असा की, त्यांनी कमी किमतीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक न करता त्याचा सखोल अभ्यास करावा. पैसा वाढवण्याचे आमिष दाखवणाऱ्यांना बळी पडू नये.Article about Indian stock market

Post a Comment

 
Top